आनंदवनातील रुग्णसेवेचा परीघ...

    दिनांक :07-Feb-2020
|
• डॉ. प्रशांत खुळे
 
 
‘‘अजिंठा, वेरूळ, खजुराहोच्या भग्न शिल्पांची फुटलेली नाके आणि तुटलेले हात, सौंदर्यास्वाद घेत भरभरून पाहणार्‍या ज्या चक्षूंना कुष्ठरोगाच्या जीवाणूमुळे भग्न झालेल्या जिवंत मानवी देहातले मूळचे शिल्प मात्र दिसत नाही, त्यांना निरोगी म्हणावे कसे?’’ झडलेल्या बोटांमध्ये निर्मितीचे स्वप्न बघणार्‍या बाबा आमटेंना 1949 साली पडलेला हा प्रश्न, आजही समाजात कलुषित मनाची रोगी माणसं बघितली की खरा वाटतो. आनंदवनातील आरोग्यसेवेचे मूळ या प्रश्नात सापडते. 

anad_1  H x W:  
 
 
बाबांकडे डॉक्टरकीची डिग्री नव्हती. पण, डॉक्टर म्हणून काम करण्याच्या, समाजाला रोगमुक्त करण्याच्या अफाट इच्छेतून आनंदवन या सेवाश्रमाचा जन्म झाला. आज येथे बाबांची तिसरी पिढी आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या सेवारूपी समिधा बघितल्या, की बाबांचा ‘नफिनिश्ड्‌ अजेंडा’ पूर्ण होईल, याचा विश्वास वाटतो. आनंदवन सुरू झाले तेव्हा चंद्रपूर जिल्हा सरकारच्या कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमात समाविष्ट नव्हता. त्यामुळे बाबा वरोरा व आसपासच्या परिसरात रुग्णांचा शोध घेत पायपीट करायचे. औषधाची पिशवी आणि सोबत जेवणाचा डबा घेऊन ते रुग्णांवर उपचार करीत. आनंदवनापासून तीस मैल परिघात बाबांनी 11 उपचार केंद्रं सुरू केली. आज हा सेवाविस्तार कितीतरी रुंदावला आहे. बाबांचे स्वप्न केवळ कुष्ठरुग्णांच्या किंवा अपंग-अंधांच्या पुनर्वसनाचे नव्हते, तर प्रत्येक माणसाला न्याय, निरोगी, समृद्ध आणि कार्यपूर्ण आयुष्य जगता यावे यासाठी प्रयत्न करण्याचे होते. कुष्ठरोगी, अंध-अपंग, बेरोजगार, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब याबाबत बाबा व्यापक विचार करीत.
 
 
आजमितीला आनंदवनात साईबाबा रुग्णालय, कुष्ठरोग रुग्ण विभाग, अत्याधुनिक एक्स-रे युनिट, पॅथॉलॉजी आणि दंतरोग विभाग आहेत. कुष्ठरुग्णांना होणार्‍या वेगवेगळ्या आजारांवर इथे उपचार केले जातात. दरवर्षी, पद्मश्री तात्याराव लहाने आणि त्यांच्या सहकारी डॉ. रागिनी पारेख, जे. जे. रुग्णालय, मुंबई, यांच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेत असत. पुढे ‘लहानुबाबाची यात्रा’ म्हणून हे शिबिर नावारूपाला आले. महाराष्ट्रासह लगतच्या राज्यातील रुग्ण या शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घेत असत, मात्र शासनाच्या जाचक अटींमुळे हा सेवायज्ञ आज थांबला आहे. कुष्ठरुग्णांना येणारी विकृती आणि त्यावरील उपचार हे आनंदवनातच व्हावे, असे डॉ. विकास आमटे यांना सतत वाटत असे. यातूनच, मूळचे नागपूरचे आणि नंतर इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले डॉ. अश्विन पावडे आणि त्यांच्या पत्नी डॉ. व्हिव्हियम या प्लॅस्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन दाम्पत्याने आनंदवनात सर्जरी कॅम्प सुरू केला तो केवळ इथल्या रुग्णांसाठी आणि आनंदवनात कठीण सर्जरी व्हायला सुरुवात झाली. यामुळे रुग्ण बरे झाल्यानंतर आपापल्या घरी परत जाऊ लागले. आज आनंदवनात 1276 एवढे कुष्ठरुग्ण आहेत, तर अंध-अपंग, कर्णबधिर यांची संख्या 3 हजाराच्या वर आहे. या सर्वांना रुग्णसेवा नि:शुल्क दिली जाते. जे उपचार आनंदवनात शक्य नाहीत, त्याकरिता कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे येथे रुग्ण पाठविले जातात आणि त्याचा संपूर्ण खर्च महारोगी सेवा समिती करते. हे सांगताना आनंदवनाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पोळ यांचा ऊर भरून येतो.
 
 
डॉ. भारती आमटे यांच्याकडे साईबाबा रुग्णालयाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, लहान मुलांमधील आजारासह, अंध व अपंग रुग्णांच्या तपासण्या त्या करतात. डॉ. भारती यांच्या पुढाकाराने सुरू झालेले नवचैतन्य कृत्रिम अवयव निर्मिती केंद्र हे अनेकांच्या आयुष्याला उभारी देणारे ठरले आहे. अद्ययावत हेल्थ एटीएम मशीनने रुग्णांच्या 18 तपासण्या त्वरित होणे शक्य झाले असून, आनंदवन हे येत्या काळात ‘मेडिकल पार्क’ म्हणून उभे राहील, असा आशावाद बाळगायला हरकत नाही.
 
 
आनंदवनातल्या रुग्णसेवेचा हा पसारा आता कुष्ठरोगाच्या पल्याड कात टाकतोय्‌. केवळ कुष्ठरुग्णांची सेवा एवढीच ओळख या सेवाश्रमाची असू नये, तर समाजातील वंचितांचे ते आधार केंद्र ठरावे, याकरिता आनंदवनातील कार्यकर्ते सतत छोटे-मोठे प्रयोग करताहेत. या कार्यकर्त्यांसह आनंदवनाबाहेरील बाबांच्या विचारांशी नाळ जुळलेली असंख्य मंडळी या सेवाकार्याचा सेतू पुढे नेताना दिसत असून, त्यामुळेच त्याचा परीघ असा चौफेर विस्तारायला आरंभ झाला आहे...