बा उद्धवा!

    दिनांक :08-Feb-2020
 
मुंबई वार्तापत्र
नागेश दाचेवार
एकतर्फी प्रेमातून तसेच वासनेच्या बरबटलेल्या आवेशातून कित्येकींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, तर एक प्राणास मुकली. राज्यातल्या औरंगाबाद, िंहगणघाट, मुलुंड, मीरा-भाईंदर, पनवेल, इस्लामपूर, दादर, लातूरसारख्या ठिकाणी महिला व तरुणींना जिवंत जाळणे, विनयभंग आणि हत्या करण्यासारख्या घटना घडत आहेत. एवढेच नव्हे, तर गृहमंत्री ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आहेत त्यांच्याच पक्षाच्या सांगलीतील दोन नेत्यांचे खून अलीकडेच झाले आहेत; तर मुख्यमंत्री असलेल्या शिवसेना पक्षाच्यादेखील नेत्याची हत्या याच सांगलीत झाली. राज्यातील अन्य भागातल्या गुन्हेगारीची आकडेवारी बघितली तर ती भयावह आहे. अशा पद्धतीची राज्यातल्या गुन्हेगारीची परिस्थिती गंभीर असताना, संपूर्ण राज्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असताना, राज्याचे गृहमंत्री कुठलेही तारतम्य न बाळगता वायफळ बयाणबाजी आणि कुरघोडी करण्यात व्यग्र दिसताहेत. त्यामुळे बा उद्धवा! काय चाललंय्‌ तुझ्या राज्यात, कायद्याचा धाक राहिलाय का? असे म्हणण्याची वेळ आता आली आहे.
गृहमंत्र्यांचे गाव असलेल्या नागपुरातील महापौरावर, अधिवेशन काळात भारी भक्कम सुरक्षाव्यवस्था असताना प्राणघातक हल्ला होतो. सरकारातल्या दोन वजनदार मंत्र्यांना धमक्या येतात. अशा पद्धतीने जर महिलांवर अत्याचार आणि दिवसाढवळ्या नेत्यांवर हल्ले, हत्या आणि धमक्या येण्यासारखे प्रकार मागील सरकारच्या काळात, म्हणजे फडणवीसांच्या काळात झाले असते, तर याचा किती गाजावाजा केला गेला असता. त्या वेळी राज्याची कायदा व सुरक्षा कशासाठी धोक्यात आली असती, तर केवळ गृहमंत्रिपद हे स्वतःकडे ठेवून, शिवसेनेला देण्यास फडणवीसांनी नकार दिल्याच्या कारणामुळे. आम्ही पाठीत खंजीर खुपसणारी औलाद नाही. सरकारमध्ये असलो तरी उघडपणे बोलणार, असे उघड माथ्याने फिरून सांगणारे, मुखपत्रातून रकानेच्या रकाने भरवणारे आता मात्र मूग गिळून गप बसलेले दिसत आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी गृहमंत्रिपददेखील सोडलं, इथपर्यंत ठीक आहे. मात्र, फडणवीस सरकारमध्ये असतानाचा तो उघड माथ्याने बोलनेवाला बाणादेखील सोडला. आज राज्याची कायदा व सुव्यवस्थेची दयनीय स्थिती बघितल्यानंतर, तुम्हाला बोलावेसे आणि त्या तुमच्या उपकृत संपादकाला लिहावेसे वाटत नाही. की, कावीळ झाल्यावर सारं काही पिवळं दिसते त्याप्रमाणे नजरेस सत्तेचा मोतीिंबदू झाल्याने अंधुक दिसते, की सारंकाही हिरवंगार दिसत आहे? कारण, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबत राहिल्यास कुणाच्या हाताला लकवा मारतो, कुणाला बुद्धिभेद होतो. त्यामुळे यावेळी जर मोतीिंबदू झाला असल्यास त्यात नवल वाटण्यासारखे काही नाही.

mumbai warta 8 feb_1 
मुंबई हे महिलांसाठी देशातील सुरक्षित शहर, हा लौकिक लवकरच इतिहासजमा होण्याच्या वाटेवर आहे. कारण छेडछाड, विनयभंग, भयानक अॅसिड हल्ला, अल्पवयीन बालिकांवरील बलात्कार, लोहमार्गावरील धावत्या गाडीच्या डब्यातील असहाय तरुणींवर बलात्काराचा प्रयत्न, अशासारख्या घटना सातत्याने घडत असतात. महिलांसाठी मुंबई सुरक्षित राहिली नाही, हे कटु असलं तरी वस्तुस्थिती झाली आहे. खरंतर बलात्काराची भावना ही विकृतिजन्य वृत्ती आहे. कळसाला पोहोचलेली स्वार्थी वृत्ती आणि महिलांनी स्वत:हून घ्यावयाच्या सावधगिरीचा व खबरदारीचा अभाव, हे सर्व घटक कमीअधिक प्रमाणात याला जबाबदार तर आहेतच, पण या दुर्दैवी घटना घडल्यानंतर दोषी नराधमांना कठोर शासन करण्यासाठी जी संवेदनशीलता दखविण्याची गरज आहे ती आज बघायला मिळत नाही. आज गुंडांना पोलिसांचा धाक वाटेनासा झाला आहे. केवळ प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्यात राजकीय मंडळी व्यग्र दिसते. गृह खातं फडणवीसांकडे असेल, तर गुन्ह्यांमध्ये वाढ होणार आणि शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडे असेल तर घट होणार, असे काहीही गुन्ह्यांच्याबाबतीत घडत नसते, सरकार कुणाचेही असो. कारण ही विकृती आहे. या आजारावर वेळीच उपचार करण्याची गरज असते. अशा आजारांना कारणीभूत असणार्‍या रोगजंतूंना अर्थात विकृत मानसिकतेला ठेचून काढण्याची नितांत आवश्यकता असते. अशा या विषारी मानसिकतेच्या सापाचे तोंड ठेचायला गृहमंत्री खमक्या लागतो. स्वतःची खुर्ची आणि स्वार्थ सांभाळण्यापेक्षा अशा सामाजिक समस्या कशा हद्दपार करता होतील, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, आपण काय करत आहोत, तर आपले प्राबल्य असलेल्या एखाद्या संस्थेला जमीन मिळविण्यासाठी निर्णय घेण्याची घाई, स्वतःच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठीची मंत्र्यांची चढाओढ, बंगले आणि कार्यालयाच्या नूतनीकरणासाठीची भाऊगर्दी, विकास कामांना केवळ राजकारणासाठी स्थगिती, बालहट्टासाठी मेट्रो कारशेडला स्थगिती देऊन, अभ्यासाठी समिती स्थापन केल्यांनतर समितीचा अहवाल न स्वीकारण्याचा हट्ट, कोरेगाव-भीमा ज्यातून राज्याला काहीही एक मिळणार नाही अशा नको त्या प्रकरणात नाक खुपसणं, जस्टिस लोया प्रकरण उकरून काढणं, बुलेट ट्रेन सुरू करायची िंकवा नाही यावर अभ्यास करायचा, शिवजयंती तिथीप्रमाणे की, इंग्रजी तारखेप्रमाणे साजरी करायची, मुंबईत रात्री बार सुरू ठेवायचे की नाही, चंद्रपुरात दारूबंदी उठवायची की काय करायचे, तीन कोटी वृक्षलागवडीची चौकशी करायची, फोन टॅिंपगसारखे नसलेले प्रकरण उकरून काढायचे... अशा पद्धतीचे प्राथमिकतेचे विषय या सरकारने हाती घेतले आहेत. त्यामुळे कोणत्याही थराला जाऊन खुर्चीवर तुटून पडणार्‍या आजच्या सत्ताधार्‍यांना आता शेतकर्‍यांना 25 हजार मदत, कर्जमुक्ती आणि राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेसारख्या विषयांपेक्षा स्वहित महत्त्वाचे वाटू लागले असल्याचे दुर्दैवी चित्र अल्पकाळात या राज्यात पाहायला मिळत आहे.
त्यामुळे उद्धवा तुझे राजकारण, तुझे सरकार आणि तुझ्या प्राथमिकता, याचं राज्यातील जनतेला काही देणंघेणं नाही. जनतेला हवं आहे योग्य सोयी सुविधा आणि मोकळ्या हवेत श्वास घेता येईल असं भयमुक्त वातावरण. स्वतःच्या राजकीय इच्छा-आकांक्षा आणि दिलेली वचनं पूर्ण करत असताना, राज्यातील जनतेला यातील काही देऊ शकत असल्यास जनतेवर उपकारच होईल...

9270333886