दिशाहीन तरुणाई...

    दिनांक :09-Feb-2020
डॉ. परीक्षित स. शेवडे
‘‘आता वेळ आली आहे की, आम्ही गैर मुसलमानांना हे सांगावे- आमच्याबद्दल सहानुभूती असेल तर आम्ही सांगतो त्या अटी-शर्तींवर आमच्यासोबत येऊन उभे राहा. आणि आमच्या सोबत उभे राहणार नसला; तर तुम्हाला आमच्याशी काही घेणेदेणे नाही.’’
 
 
‘‘मी आधीही सांगितलं होतं. संघटित असलेले केवळ पाच लाख लोक जरी आमच्याकडे असतील, तरी आम्ही आसामला हिंदुस्तानपासून कायमचा तोडू शकू. चला; कायम नाही तर किमान महिना दीड महिना तरी तोडू.’’
 
 
‘‘रेल्वे आणि रस्त्यांवर एवढा कचरा ओता, अडथळे निर्माण करा की; तो हटवायलाच महिना लागेल. आसामला हिंदुस्थानपासून तोडल्याशिवाय हे लोक आपलं ऐकणार नाहीयेत.’’
 
 
‘‘आसामची मदत करायची असेल; तर आसामचा रस्ता भारतीय सैन्यासाठी बंद करायलाच हवा. त्यांची रसद तोडायला हवी. आपण हे करू शकतो. हा चिकन नेक मुसलमानांचा आहे. ही मुस्लिम अक्सीरियत आहे.’’
 
 
‘‘आसाममध्ये सामूहिक हत्याकांड सुरू आहेत. CAA आणि NRC लागू करून तिथे लोकांना डिटेन्शन कॅम्पमध्ये ठोसले जात आहे.’’ 
 
imar _1  H x W:
 
 
शरजील इमामचे हे तेच विषारी फूत्कार आहेत; ज्यामुळे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमामची पोलिस चौकशी सुरू असून त्यातून बाहेर येणारी माहिती स्फोटक आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, इमामला देशात इस्लामिक राजवट आणायची होती. त्यासाठीच चिथावणीखोर वक्तव्ये करून अराजक माजवणे आणि जागतिक प्रसारमाध्यमांचा केंद्रबिंदू बनणे, ही त्याची आकांक्षा असल्याचे स्पष्ट दिसत होते. इमाम हा कोणी एखाद्या मोहोल्ल्यातील मवाली नसून जेएनयुमधील पीएच. डी.चा विद्यार्थी असलेला आयआयटी पदवीधर आहे. एखाद्या उच्च शिक्षित तरुणाचे विचार इतके विखारी आणि देशविघातक असतील, तर मदरसाशिक्षितांची काय कथा?
 
 
एकीकडे अलिगढ मुस्लिम विद्यापीठात ही देशघातक भाषणे सुरू असतानाच दुसरीकडे, राजधानी दिल्लीतल्या शाहीनबागेतही असेच विषारी फूत्कार सुरू होते. CAA आणि NRC विरोधात जमलेल्या आंदोलनकर्त्यांत एकाची इथपर्यंत मजल गेली की, पोलिसांना पाहिलं की ठोकून काढावं वाटतं! असे विधान त्याने माईकवरून आणि कॅमेरासमोर केले. याच शाहीनबागेत कडाक्याची थंडी आणि गर्दीमुळे निर्माण झालेली अस्वच्छता यामुळे दोन महिन्याच्या निष्पाप बालिकेला आपला जीव गमवावा लागला. याबाबत विचारले असता तिच्या आंदोलनकर्त्या बुरखाधारी मातेने आपल्या निष्काळजीपणाचे खापर थेट केंद्र शासनावर फोडले आणि आपण पुन्हा आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले. झुंडीच्या उन्मादात माणुसकी किती खालच्या पातळीला जाते, याचे आणखी काय उदाहरण हवे? कोणाही मातेला या प्रसंगी मानसिक धक्का बसणे स्वाभाविकच नव्हे, तर अपेक्षितदेखील आहे. इथे मात्र झुंडीची नशा पुन्हा आंदोलनात सहभागी होण्यास भाग पाडत आहे. मग कुठून तरी अवचितपणे कोणी एक रामभक्त गोपाल नामक माथेफिरू अवतरतो, जो थेट पिस्तूल नाचवत शाहीनबागेच्या रोखाने जातो. गावठी कट्‌ट्यातून छर्रे उडवतो, मात्र आजूबाजूला असलेले कॅमेरामन त्याचे शूटिंग करतच राहतात. एक तर हे कॅमेरावाले खूपच शूर असायला हवेत, किंवा फारच मूर्ख असले पाहिजेत, किंवा त्यांना या नाटकाची पटकथा आधीच माहिती असावी. अन्यथा अशा माथेफिरूसमोर उभे राहून कोण बरे शूटिंगकरेल? गोपालचा ज्वर कमी होतो न होतो तोच, कपिल नामक कोणीतरी नेमका हाच उद्योग केला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तो आम आदमी पक्षाचा सदस्य असल्याचे समोर आले आहे. हे तरुण खरेच माथेफिरू आहेत की, कोणीतरी यांचा राजकीय स्वार्थासाठी वापर करून घेत आहे, याचा कानोसा घ्यायला हवा.
 
 
दरम्यानच्या काळात ‘मुंबई प्राईड मार्च’ नामक समलैंगिक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. गेली काही वर्षे समलैंगिक समाजाचा हा मोर्चा नियमितपणे आयोजित केला जातो. या वर्षी मात्र इथेही राजकारणाचा सुळसुळाट होता. ‘Rainbow over भगवा’ लिहिलेले फलक इथे पाहायला मिळाले. भगवा हे हिंदुत्वाचे प्रतीक आहे. हिंदूंनी बृहन्नडा स्वरूपात अर्जुनाला स्वीकारले, शिखंडी-इरावण यांच्या कथा नाकारल्या नाहीत, अर्धनारीनटेश्वर वा महालसा नारायणी या अर्ध स्त्री-पुरुषरूपांना हिंदू पूजतात. फार कशाला, लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांसारख्या एक तृतीयपंथी एका आखाड्याच्या महामहिम आहेत. तरीही भगव्याचा अवमान का? याउलट ज्या अब्राहमिक पंथांनी समलैंगिकता हे पापच नव्हे तर गुन्हा मानून त्याकरता थेट दगडांनी ठेचण्याची शिक्षा सांगितली याबाबत मात्र मौन? अब्राहमिक पंथाचे हे मत आम्ही मांडत नसून साक्षात त्यांच्या धर्मगुरूंनी सांगितले आहे. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत ‘‘ हिंदूंना समलैंगिक समाज मुळीच वर्ज्य नसून ते स्वतःला हिंदू म्हणवत असल्यास आम्हाला त्यांना नाकारण्याचा कोणताही अधिकार वा स्वारस्य नाही,’’ असे मत आम्ही मांडले, तेव्हा नौशाद उस्मान नामक धर्मगुरूंनी समलैंगिकता ही इस्लामनुसार हराम असून त्यासाठी दगडाने ठेचण्याची शिक्षा असल्याचे जगजाहीर केले होते.
 
 
समलैंगिक चळवळीला काळिमा फासणारा आणखी असाच एक तद्दन राजकीय फलक होता. एका फलकावर ‘RSS = राष्ट्रीय समलैंगिक संघ’ असे लिहिले होते. हे वाचून हसावे की रडावे हेच कळे ना! अशा फलकांतून आपणच आपली थट्टा करीत आहोत, हे समलैंगिक समाजाला लक्षात येऊ नये? की, या समाजाचा आडोसा घेत अन्यच काही तत्त्वे आपली इच्छापूर्ती करीत होती? कारण, याच मोर्चात ‘शरजिल तेरे सपने को हम मंझील तक पहुचाएंगे।’चा नारा देण्यात आला. शरजिलचे स्वप्न? देश तोडण्याचे? की इस्लामिक राजवट आणण्याचे? ते कोणाला का बरे पूर्ण करायचे आहे? त्याचा समलैंगिक मोर्चाशी संबंध काय? उलट, ज्या देशाने कलम हटवत समलैंगिकांना दिलासा दिला; त्याचे अखंडत्व, सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी जिवापाड जपणे हेच सयुक्तिक नाही का? तरीही ही घोषणा देण्यात यावी हे दुर्दैव. या प्रसंगी उर्वशी चुडावाला नामक तरुणीसह 51 जणांवर गुन्हा दाखल झाला असून, त्यातील बहुसंख्य फरार आहेत.
 
 
2020 वर्षी भारत जगातील सर्वात तरुण लोकसंख्या असलेला देश असल्याचा लोकसंख्यातज्ज्ञांचा अंदाज होता. वर्ष सुरू होतानाच्या या सार्‍या घडामोडी पाहिल्यावर मात्र या तारुण्याचा काय उपयोग, हा प्रश्न सतावत राहतो.
 
अब भी जिसका खून न खौला खून नही वो पानी है।
जो देश के काम न आये वो बेकार जवानी है।।
 
••