मेहनत

    दिनांक :09-Feb-2020
चंद्रशेखर पंडित
7875174002
 
जो बुरे वक्त को बदलने की ख्वाईश दिल में पाल लेते है, अपनी मेहनत से वो अपनी किस्मत की लकीरे बदल देते है। अशाप्रकारे एका हिंदी कवीने मेहनत या शब्दाचे महत्त्व आपल्या कवितेतून सांगितले आहे. मेहनत हा फारसी भाषेतील असा उत्कृष्ट शब्द आहे की, त्याच्यासमोर त्याला समानार्थी असणारे संस्कृत, इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेतील शब्द फिके पडतात. मेहनत हा शब्द व्यक्तिमत्त्व विकास करण्याकरिता, नेतृत्वगुण प्राप्त करण्याकरिता काय करणे आवश्यक आहे, हे सांगणारा शब्द आहे. मेहनत हा शब्द आपण अनेकदा वापरतो. रोज प्रचंड मेहनत पैसे कमविण्याकरीता घेत असतो. पण, त्याचा योग्य अर्थ माहीत नसल्यामुळे या शब्दाचा पूर्ण फायदा आपल्याला होत नाही. खरेतर पैसे कमविणे हा मेहनत या शब्दाचा अर्थच नाही. हा अर्थ आपण बराच पातळ करून वापरतो. मेहनत हा गुण विकसित करणारा शब्द आहे. 
  
mehnat_1  H x W
 
मेहनत हा शब्द फारसी भाषेतील मिहनत या शब्दाचा अपभ्रंश आहे जो मिह या शब्दापासून बनला आहे. मिह= सरदार, महान, श्रेष्ठ. (संदर्भः उर्दू-हिंदी शब्दकोश, महम्मद मुस्तफाखॉं ममद्दाहम) नत हा प्रत्यय असून ज्या शब्दासोबत हा जोडला जातो त्याची क्रिया दाखवितो. जसे जमानत या फारसी शब्दाची व्युत्पत्ती जमा+नत अशी आहे. जेव्हा आपण एखाद्याची जमानत घेण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये जातो तेव्हा तिथे काही रक्कम जमा करावी लागते किंवा रक्कम जमा करण्याचे आश्वासन देणारे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. म्हणून जमा करण्याची क्रिया म्हणजे जमानत. अशाच प्रकारे मेहनत= मेह+नत= मिह+नत. म्हणून मेहनत म्हणजे सरदार, श्रेष्ठ, महान बनण्याची क्रिया. मेहनत केल्याने आपण सरदार, लीडर, श्रेष्ठ बनू शकतो. जेव्हा आपण सतत मेहनत करत असतो तेव्हा आपले सरदार, लीडर, श्रेष्ठ होण्यामध्ये परिवर्तन होणे सुरू असते. म्हणून जर नेतृत्वाचे गुण स्वतःमध्ये विकसित करावयाचे असतील, तर सतत मेहनत करत राहावी.
 
 
हे सतत मेहनत करण्याचे गुण बहुतांश लोकांमध्ये नसतात. म्हणून बहुतांश लोक नेतृत्व करू शकत नाही. आपण पाहात असाल की, एखाद्या कामाच्या ठिकाणी, कंपनीमध्ये, फॅक्टरीमध्ये कामगार लोक 5-6 वाजता सुटी घेतात. पण, त्यांचे नेतृत्व करणारा त्यांचा बॉस हा कार्यालयातच असतो. उद्या काय काम करावे, कसे करावे, कंपनीचे उद्दिष्ट प्राप्त करण्याकरिता अजून काय करणे आवश्यक आहे याबाबत विचारमंथन, काम करणे सुरू असते. लोकांकडून काम करून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त ज्ञान असणे आवश्यक आहे. काम योग्यप्रकारे कसे करावे, याचे ज्ञानसुद्धा कामगारांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तरच आपण त्यांच्याकडून काम करून घेऊन उत्पादकता वाढवू शकतो. याकरिता सतत जास्त वेळ व काळ मेहनत करणे आवश्यक आहे.
 
 
The Law of Success या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक व व्यक्तिमत्त्व विकास करण्याचे गाढे अभ्यासक डॉ. नेपोलियन हिल यांनी आपल्या वरील पुस्तकात मेहनत करण्याने नेतृत्वगुण विकसित होतात, असे वेगळ्या शब्दांतून म्हटले आहे. Procrastination is a deadly eney of all who would become leaders in any undertaking. (पान क्र.170) Procrastination = आळस, कामातील दिरंगाई, चालढकल, काम लांबणीवर टाकणे, मेहनत करण्याची वृत्ती नसणे. ज्या लोकांमध्ये कामात चालढकल, दिरंगाई करण्याची वृत्ती असते ते नेतृत्व करूच शकत नाही.
••