प्रेम कर भिल्लासारखं...

    दिनांक :09-Feb-2020
समिधा पाठक
पौगंडावस्थेतून तारुण्यात पदार्पण करताना अनेक भावनांची जाणीव होते. मनाच्या भावविश्वाशी निगडीत अशीच एक भावना म्हणजे- ‘प्रेम!’ ‘सोळावं वरीस धोक्याचं!’ असं म्हटल्या जातं. त्याचं कारण बहुदा असं असावं, की- मुलं शाळेच्या शिस्तबद्ध चौकटीतून कॉलेजच्या मोकळ्या व स्वच्छंद हवेत येतात. या वयात नवे स्वप्नं बघावीशी वाटतात. नव्या इच्छा व आकांक्षा पूर्ण करण्याचा हुरूप असतो. तारुण्यात पदार्पण करताना शरीरासोबत मनातही बदल होतात. मन ढगांवर बसून उंच उडू लागतं. सगळं आकाश पायाखाली असल्यासारखं वाटत. जग किती सुंदर आहे, याचा अनुभव येतो. तारुण्यात जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो. ‘तिच्या’ व ‘त्याच्या’मध्ये एक नातं निर्माण होतं. कवी, शायर, लेखक यांनी प्रेमाचं वर्णन आपापल्या प्रकारे केलेलं आहे. प्रेमाला वेगवेगळ्या उपमा दिल्या आहेत. गुलजार म्हणतात- ‘शायर बनना बहुत आसान है, बस एक अधुरे इश्क की डिग्री चाहीये!’ पण प्रेम म्हणजे नक्की काय, किंवा प्रेमाची ठराविक व्याख्या आजवर कोणीही सांगू शकलेलं नाही. कारण प्रेम ही एक भावना आहे आणि भावनेची अनुभूती प्रत्येकाच्या चष्म्यातून वेगवेगळी असू शकते. म्हणून या टर्मला आपण जनरलाईज नाही करू शकत. 
 
love _1  H x W:
 
 
फेब्रुवारी महिना म्हणजे-‘सिझन ऑफ लव्ह!’ ‘रोज-डे’पासून तर ‘व्हॅलेंटाईन-डे’पर्यंत प्रेमाचा सप्ताह साजरी करण्यात येतो. प्रेम मिळवणं, प्रेम करणं व प्रेम निभावणं, या वेगवेगळ्या गोष्टी आहे. प्रेम ही कालांतराने अनुभवली जाणारी भावना आहे. एखाद्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, त्यामागचं कारण काय असतं? अपेक्षा? छे! आई-वडील जे मुलांवर प्रेम करतात, त्यात कसली अपेक्षा असते? ते प्रेम निरपेक्ष असतं. दिसणं, वागणं, बोलणं? नाहीे! या कारणांमुळे देखील कोणी कोणावर प्रेम करू शकत नाही. मग कोणते कारण असावे, याचा सहजच विचार करत होते. या प्रश्नाचं उत्तर मला एका चार वर्षांच्या लहान मुलाकडून मिळालं. तो मुलगा त्याच्या बाबासोबत एअरपोर्टवर कोणाला पीक अप करायला आला होता. फ्लाईट कधी लँड होणार, हा प्रश्न तो तिथल्या प्रत्येकाला विचारत होता. मी सहजच त्याला विचारलं, की- ‘‘कोणाची वाट बघतोय्‌? कोण येतंय्‌?’’ तो म्हणाला- ‘‘माझी आई येतेय्‌. ती कामानिमित्त गेली होती व मी तिला खूप मिस केलं.’’ त्यावर मी त्याला विचारलं- ‘‘का मिस केलं?’’ तो म्हणाला- ‘‘कारण मी तिच्यावर खूप प्रेम करतो.’’ मी पुन्हा विचारलं- ‘‘तू तिच्यावर प्रेम का करतोस?’’ या प्रश्नाचं त्यानं इतकं समर्पक उत्तर दिलं- ‘‘कारण ती माझा प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. मी बॅड बॉय झालो तरी ती माझ्यावर खूप प्रेम करते!’’ मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.
 
 
कोणी चांगलं दिसतं, कोणाचा आवाज छान असतो, कोणी हुशार असतं, कोणी सुंदर असतं, कोणी श्रीमंत असतं, तर कोणामध्ये हे सगळे गुण असतात. पण या गोष्टींचं फिल्टर प्रेमात लावता येत नाही. कारण प्रेम हे अनकंडिशनल असतं. अटी व नियम लागू झालेत तर त्याला प्रेम नाही, ‘कॉन्ट्रॅक्ट’ म्हणावं लागेल. प्रेमात सर्वांत महत्त्वाचं असतं- एकमेकांना समजून घेणं. म्हणूनच खरं प्रेम कायम राहतं. प्रेमाचे बंध आयुष्यभरासाठी असतात व ते बंध प्रेमात पडलेल्यांना पुढे नेतात. बंधनात अडकवत नाहीत किंवा मागे खेचत नाहीत.
 
 
माणूस सुखासाठी कोणाचा तरी आधार घेत असतो. यालाच काही जण प्रेम म्हणतात. पण प्रेम म्हणजे मांडला तर खेळ, घेतला तर श्वास, ठेवला तर विश्वास, रचला तर संसार आणि निभवलं तर जीवन! एखाद्यासाठी किती त्याग आपण करू शकतो, यावरून प्रेम समजतं. पण काही वेळेला हा त्याग अनिच्छेनं केलेला देखील असू शकतो. म्हणून प्रेम म्हणजे त्याग नव्हे, तर प्रेम म्हणजे- ‘समर्पण!’ पण आज रिलेशनशिपचं लेबल लावणं व काढणं फार सोपं झालंय्‌! स्टेटस्‌ हे सिंगलवरून एंगेज्डवर तर एंगेज्डवरून पुन्हा सिंगलवर एखाद्या पेंड्युलमसारखं फिरतं असतं. कारण- हे प्रेम बहुदा आकर्षणातून निर्माण झालं असतं. आकर्षण बहुतांश वेळी अज्ञानातच होतं. एखादी गोष्ट मिळाली, की- तिचा मोह कमी होतो. आकर्षणातून झालेल्या प्रेमाची देखील हीच वस्तुस्थिती असते. मग ‘इनसेक्युर’ वाटायला लागतं आणि लवकरच ‘ब्रेक-अप’ होतो. कारण तो जोश, ती आत्मीयता आता उरली नसते. मग माझं तिच्यावर किंवा त्याच्यावर खरं प्रेम होतं, याचं स्तवन नऊ दिवस गायचं आणि पुन्हा एका नवीन रिलेशनशिपकरिता रेडी राहायचं. याला खरं प्रेम म्हणता येईल का? नक्कीच नाही! कारण खरं प्रेम सदाबहार असतं. प्रेम ही एखादी कृती नाही तर ती मनाची अवस्था आहे. आजकाल ‘ब्रेक-अप‘ व ‘पॅच-अप’ कधी होतात, हे देखील कळायला मार्ग नाही. या शब्दांना आता भावनिक अर्थ उरलाच नाही, असे म्हणता येईल. मानसशास्त्रीयदृष्ट्या तीन ते चार महिने एकमेकांना समजून घेतल्यानंतरच अंत:करणात प्रेम भावना निर्माण होतात. प्रेमात आजकाल माणसं एकमेकांवर सत्ता गाजवतात. पण खरं पाहायला गेलं तर कोणालाच आपल्या व्यक्तिमत्त्वावर, स्वातंत्र्यावर, विचारांवर आक्रमण केलेलं आवडत नाही. प्रत्येकाला आपली एक स्पेस हवी असते आणि याचं भान नात्यातल्या दोघांनीही ठेवायला हवं. हवी असलेली मोकळीक मिळाली नाही तर प्रेम एखाद्या बेडीप्रमाणे अटकू शकतं. आणि ही बेडी एखादा उखडून टाकतो. तसेच प्रेमात सक्ती करणे योग्य नव्हे. माणूस जसा आहे, तसा स्वीकारणे, ही प्रत्येक नात्याची पहिली पायरी असते.
 
 
प्रेम माणसाला स्वत:च्या पलीकडे पाहायची शक्ती देतं. मग ते प्रेम कुणावरही असो, ते कशावरही जडलेलं असो. मात्र ते खरंखुरं प्रेम असायला हवं! ते स्वार्थी, लोभी किंवा फसवं असता कामा नये.
 
 
खरं प्रेम नेहमीच नि:स्वार्थी असतं. निरपेक्ष असतं. मग ते फुलावरील, प्राण्यावरील, सृष्टिसौंदर्यावरील, आई-बापावरील, प्रियकर-प्रेयसी यांच्यावरील, कुल-शांती-राष्ट्र यांच्यापैकी कुणावरलंही असो. नि:स्वार्थी, निरपेक्ष, निअहंकारी प्रेम हीच माणसाच्या आत्म्याच्या विकासाची पहिली पायरी असते. असलं प्रेम केवळ मनुष्य करू शकतो! वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाती’ कादंबरीतील या ओळी हृदयाला एक आगळं बळ देतातं. खरे खुरे प्रेम मिळवण्याची क्षमता प्रेम दिल्याने, प्रेम वाटल्याने प्राप्त होते. जेवढे तुम्ही केंद्रीत होत जाल, तेवढे तुम्हाला तुमच्या अनुभवांच्या आधारावर हे ज्ञात होत जाईल, की- प्रेम निव्वळ भावनाच नाही तर प्रेम तुमचे शाश्वत अस्तित्व आहे. म्हणून कुसुमाग्रज म्हणतात, की- प्रेम कर भिल्लासारखं, बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. प्रेमाचं क्षितीज अमर्याद असतं. ते कधीच सरत नाही व क्षितिज ज्याचे सरले नाही, त्याला कसलेच भय नाही.
 
••