संजय गोखले
जंगलात पळस फुलला की सर्वदूर केसरी लाल रंगाची उधळण होते. या तेजस्वी लाल रंगामुळे या वृक्षाला इंग्रजीत ‘फॉरेस्ट लेम’ असे रास्त नाव दिले आहे. होळीचा सण जवळ आल्याची नांदी हे वृक्ष देतात. सर्वात जास्त उत्साहात होळी साजरी करणारे राज्य उत्तर प्रदेश; याचे राज्य पुष्प पळस आहे. पळसाच्या फुलांपासून नैसर्गिक रंग बनवून होळी खेळण्याचे दिवस इतिहासजमा झाले आहेत. फाल्गुनी पौर्णिमेला हा सण साजरा होतो, त्यामुळे भोजपुरी भाषेत या सणाला फगवा िंकवा फाग (फाल्गुनचा अपभ्रंष फाग) असे नाव आहे. गोवा येथे या सणाला शिमगा नाव आहे. ‘धाकटो शिमगो’ शेतकरी साजरा करतात तर ‘व्हाडलो शिमगो’ सर्वसामान्यजन साजरा करतात. गोव्यात शिमग्याला मासेमारीच्या नौका फुलांनी सजवण्याची पद्धत आहे. बंगालमध्ये हा सण डोल जात्रा नावानी साजरा होतो. डोल म्हणजे झुलवणे, सणाच्या दिवशी राधा आणि कृष्ण यांना सुंदर सजावट केलेल्या पाळण्यावर बसवून झुलवतात. स्त्रिया हा पाळणा झुलवताना कृष्णस्तुतीची सुंदर गाणी म्हणतात. पंजाबचे निहंग सिख हा सण ‘होला मोहल्ला’ नावाने साजरा करतात. या वेळेस विविध मार्शल आर्टस्चे चित्तथरारक प्रदर्शन करण्यात येते. शिखांचे दहावे गुरू (दशमेश), गुरू गोिंवद िंसह यांनी इ.स. 1701 मध्ये ही परंपरा सुरू केली. आनंदपूर साहिब आणि किरतपूर साहिब इथे होला मोहल्ला सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. मध्यप्रदेश राज्यात भांग आणि ठंडाई मनसोक्त प्राशन करून हा सण साजरा होतो. उत्तराखंडमध्ये आजही नैसर्गिक रंग वापरून होळी खेळतात.

भगवान श्रीकृष्ण यांच्या पावन स्पर्शाचा आशीर्वाद असलेल्या ब्रज भूमिची होळी सगळ्यात वेगळी आहे. भगवान श्रीकृष्ण यांच्या रसिकतेची परंपरा जोपासणारी ब्रज भूमी. वृंदावन, मथुरा, नंदगाव आणि राधेची नगरी बरसाना या पवित्र भूमीने कृष्णाच्या अनेक लिला पाहिल्या आहेत. बरसानाची लठ्ठमार होली हे इथले मोठे आकर्षण आहे. अनेक देशी परदेशी पर्यटक या होळीचा आनंद घेण्यासाठी बरसाना येथे येतात.
होळीच्या दिवशी नंदगावचे पुरूष बरसाना येथे होळी खेळण्यास येतात. बरसानाच्या महिला पाच फुटी भरीव बांबूच्या तेल पाजून मजबूत केलेल्या काठ्या घेऊन त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होतात. पुरूष फक्त ढाली घेऊन गावात येतात. गावात प्रवेश केल्यावर रंग उडवून त्यांचे स्वागत होते आणि नंतर महिला; पुरूषांवर लाठीने हल्ला चढवतात. पुरूष ढालीने आपले रक्षण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु चौफेर हल्ला झाल्यामुळे लाठीचा प्रसाद खावाच लागतो. या हल्ल्याला घाबरून पुरूष पळ काढतात. कवी सुरेश भट यांच्या ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी’ या गीताच्या अगदी विरुद्ध दृष्य बघायला मिळते. इथे हरी पळत सुटताना दिसतात. काही पुरूष स्त्रियांच्या तावडीत सापडतात, त्यांना ‘प्रसाद’ खाऊन झाल्यावर स्त्रियांचा वेष घातला जातो आणि मग त्यांना स्त्रियांसारखे नाचून स्त्रियांना रिझवावे लागते. भरपूर लाठी प्रसाद खाऊन पुरूष, नंदगावी परततात. रात्री हळदीचा शेक घेऊन बरे होतात. पुढच्या वर्षी परत स्त्रियांकडून हा गोड मार खाण्यासाठी मनाची तयारी करतात. बरसानाच्या राधारानी मंदिरात आपण हा ‘प्रसाद वितरण’ कार्यक्रम बघू शकतो.
या परंपरेमागची कथा फार मनोरंजक आहे. होळीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आपल्या मित्रांसोबत होळी खेळायला बरसानाला आले. श्रीकृष्णाने राधेची आणि तिच्या सखींची छेड काढली. रुष्ट झालेल्या राधेच्या सखींनी भगवान श्रीकृष्ण आणि मित्रमंडळावर काठ्यांनी हल्ला चढवला. भगवान मित्रांसकट पळत सुटले आणि नंदगावात येऊनच दम घेतला. त्या प्रसंगाची आठवण म्हणून हा सण आजही साजरा होतो.
ब्रजभूमीत होळीच्या आदल्या दिवशी खेळल्या जाणारी बरसाना गावाची ‘लड्डूमार होली’पण तेवढीच अनोखी आहे. या दिवशी बरसाना गावाचे लोक एकामेकांच्या अंगावर बुंदीचे लाडू फेकून मारतात. बरसाना गावच्या ‘लाडलीजी’ मंदिरात (लाडलीजी म्हणजे बरसाना गावाची लाडकी राधा) हा सण उत्साहात साजरा होतो. या सणामागची कथा पण फार वेगळी आहे. होळीच्या आदल्या दिवशी बरसानाच्या गोपी नंदगावात ग्रामप्रमुख नंद बाबांकडे होळी खेळण्याचे निमंत्रण घेऊन जातात. हे निमंत्रण जरी नंदगावासाठी असले तरी त्यांचा हेतू श्रीकृष्णाने राधा आणि गोपींसोबत होळी खेळण्यास यावे हा होता.
अनुभवी नंदबाबांनी गोपींचा हेतू पटकन ओळखला आणि हसत निमंत्रण स्वीकारले. जुनी परंपरा पाळून नंदबाबांनी आपले पुरोहित पांडेजींना निमंत्रण स्वीकारल्याचा निरोप देण्यास बरसाना गावी पाठवले. पांडेजी बरसाना गावी राधेच्या घरी आले. राधेचे वडील वृषभान आणि आई कीर्तिदा हिला होळीचे निमंत्रण स्वीकार असल्याचा नंदबाबांचा निरोप दिला. वृषभानने पांडेजींचे तोंड गोड करण्यास बुंदीचे लाडू त्यांना दिले, उपस्थित असलेल्या गोपींनी आनंदाच्या भरात पांडेजींच्या गालावर गुलाल लावला. पांडेजींजवळ गुलाल नव्हता, त्यांनी जवळ असलेले पिवळेधमक बुंदीचे लाडू गोपींच्या अंगावर उधळले. ह्या घटनेची आठवण म्हणून बरसाना गावात होळीच्या आदल्या दिवशी लड्डूमार होळी खेळली जाते. होळीच्या बरेच दिवस आधीपासून बरसानाचे हलवाई बुंदीचे लाडू बनवण्यात व्यस्त होतात. कित्येक टनांमध्ये हे लाडू तयार केले जातात. लाडू पॉलिथीनच्या पिशव्यात बांधले जातात, जेणेकरून होळीच्या रंगात िंकवा खाली पडून लाडू खराब होऊ नयेत. हे एकामेकांच्या अंगावर फेकलेले लाडू लोक मोठ्या प्रेमाने प्रसाद म्हणून पोटभर खातात.
विविध सण आणि परंपरा जोपासणारा हा देश जगावेगळा आहे. खरच, देश मेरा रंगीला!
9422810501