भारतीय स्त्री जीवन : काल-आज-उद्या

    दिनांक :12-Mar-2020
|
सर्वेश फडणवीस
 
वैदिक काळात भारतात एक तत्त्व म्हणून, जीवनाचे एक अंग म्हणून भारतीय स्त्रीला हक्कासाठी लढण्याची कधी गरजच भासली नाही. सर्व हक्कांचे उद्दीष्ट असणारा सन्मान, प्रतिष्ठा आणि गौरव भारतीय स्त्रीला दिला जात होता आणि तिचे जीवन अतिशय समृद्ध होते. स्त्रीचे स्थान हे नेहमीच समाजाच्या विचारशैलीचे, प्रगतीचे आणि सार्थकतेचे निदर्शक राहिले आहे. 

asarcesh _1  H   
 
नुकतेच एक पुस्तक हाती आले. विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा निवेदिता भिडे यांनी स्वामी विवेकानंदांच्या दृष्टिकोनातून भारतीय स्त्रीजीवन या विषयावर (स्वामी विवेकानंदाज व्हिजन ॲण्ड इंडियन वुमनहूड द रोड अहेड) लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा भारतीय स्त्री जीवन : काल, आज, उद्या हा अशोक गंगाधर कुलकर्णी यांनी केलेला मराठी अनुवाद आहे. विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाच्या वाटचालीतील हे एक अप्रतिम पुस्तक आहे. एकूणच भारतीय स्त्री जीवनावर किंबहुना भारतीय स्त्रीच्या वेदकालापासूनच्या बुद्धिमत्तेवर, तिच्यातील शौर्यगुणांवर, तिच्या पातिव्रत्यावर, तिच्या आदर्श मातृत्वगुणांवर, तिच्या युद्धकौशल्यावर, तिच्या संघटनकौशल्यावर जसे अनेकांनी लिहिले, बोलले आहे, तसेच समाजव्यवस्थेत शिरलेल्या काही कुप्रथांमुळे नाडल्या-दडपल्या-उपेक्षिल्या-अवहेरल्या-हिणवल्या गेलेल्या स्त्री-जीवनावरही अनेकांनी लिहिले आहे, त्याविरूद्ध आवाज उठवला आहे, चळवळी उभ्या करून लढे दिले आहेत आणि स्त्री-शिक्षणासारखे महत्त्वाचे विधायक पाऊलही उचलले आहे. स्त्रीजीवन समृद्ध करणारे प्रबोधनात्मक पर्याय स्त्रीसंतांनीही अंगीकारले आहेत. भारतीय समाजव्यवस्थेत महिला दोन टोकांना विभागल्या गेलेल्या दिसतात. याला कारण शिक्षण हे तर आहेच, परंतु शहरी आणि ग्रामीण-आदिवासी जीवनातील टोकाची दरी हेही आहे. परंपरावादी आणि परंपराविरोधी ही ती दोन टोके आहेत. पण पूर्वकालीन समाजजीवनाचा वेध घेण्याबरोबरच वर्तमानातील आव्हाने, महत्त्वाकांक्षा यांचा अभ्यास करत जागतिक परिप्रेक्ष्यातील दृष्टिकोनांचा समन्वय साधत भारतीय विचार-संस्कृती-जीवनाधार यांचा मेळ साधत भविष्यकालीन मार्गांची मांडणी करणे गरजेचे होते, तो एक प्रयत्न हे पुस्तकातील लेखन करते आहे.
 
 
भारतीय विचार, संस्कृती, जीवनाचा आधार, स्त्रियांनी केलेल्या पुराण काळापासून ते आजपर्यंतचा प्रवास, ओलांडलेले महत्त्वाचे टप्पे, आलेले अनेक अडथळे आणि चालू परिस्थितीचे यथार्थ वर्णन या छोटेखानी पुस्तकात वाचायला मिळते. या जागतिकीकरणात आज स्त्री स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नरत आहे. ती अनेक नात्याने गुंफली गेली आहे. पिढ्यान्‌ पिढ्या हा वारसा तिला इतिहासातून मिळाला आहे आणि याचसाठी अनेक रणरागिणी यांचा थोडक्या शब्दातील संदर्भसुद्धा चकित करणारा आहे. ऐतिहासिक संदर्भ पूर्ण नवीन आहे, जो आपण वाचला नाही, असा प्रयत्न निवेदीतादीदी यांनी केलेला आढळतो.
 
 
भारतावर झालेल्या अनेक परकीय आक्रमणांमुळे तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तिच्यावर अनेक बंधने लादली गेली. अधिकार आणि हक्कांसाठी विदेशातील स्त्रीला संघर्ष करावा लागला, पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय स्त्रीला तिचे अधिकार व हक्क मिळत गेले. भावी काळातील भारतीय स्त्री कमावती असो, गृहिणी असो की समाजासाठी पूर्ण वेळ काम करणारी असो, तिला कुटुंब, समाज, राष्ट्र यांच्या विस्तारत जाणार्‍या स्तरांचे आत्मविश्वासाने आणि नैसर्गिक मातृभावनेने नेतृत्व करावयाचे आहे. तिला स्वहितासाठी आणि जगाच्या हितासाठी सेवा-नेतृत्व विकसित करावयाचे आहे ते समर्पित होऊन वाटचाल करताना जाणवते आहे.
 
 
स्वामी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, माता शारदादेवी आणि भगिनी निवेदिता यांनी या विषयाची केलेली मांडणी, त्याला दिलेला चिर पुरातनतेचा त्याचबरोबर नित्य नूतनाचा आणि अत्याधुनिक संदर्भांसह समाजघडणीचा पैलू मोहवून टाकणारा, एक नवी विचारदृष्टी देणारा आहे. स्त्री मुक्तीची नव्हे, स्त्री शक्तीची भाषा करणारी त्यांची मांडणी आहे आणि त्या अनुषंगानेच 1936 मध्ये सुरू झालेली राष्ट्र सेविका समिती 1953 मध्ये स्थापन झालेला श्रीसारदा मठ आणि मिशन 1972 मध्ये विवेकानंद केंद्राने जीवनव्रती या नात्याने राष्ट्रनिर्माणाच्या कार्यार्थ उभी केलेली फळी आणि 1988 च्या सुमारास स्थापन झालेली भारतीय स्त्री शक्ती यांचे या प्रबोधनपर्वातील स्थान खूप मोठे आहे. निवेदितादीदींनी या प्रबोधनपर्वाची केलेली ही मांडणी खचितच नवी दिशा, नवा दृष्टिकोन देणारी ठरणारी आहे आणि याचसाठी हे पुस्तक वाचनीय तर आहेच, परंतु संग्रही असावे असेच आहे.