प्रेमातील गैरफायदा

    दिनांक :12-Mar-2020
|
नितीश गाडगे
 
प्रेमात आपल्या जोडीदाराचे मन राखण्यासाठी अनेकदा स्वतःच्या मनाविरुद्ध वागावे लागते. स्वतःच्या मनाविरुद्ध वागूनही जर जोडीदाराला आनंद मिळत असेल, तर यातसुध्दा एक वेगळेच समाधान असते. प्रेमात जोडीदाराच्या आनंदासाठी बर्‍याचदा आवाक्याबाहेरच्या गोष्टी करणारे बरेच आहेत, पण प्रेमाच्या नावाखाली एखादी व्यक्ती तुमचा गैरफायदा तर घेत नाही ना ? हे तपासणेही आवश्यक आहे. 

green_1  H x W: 
 
 
बर्‍याचदा भावनेच्या ओघात जाऊन काही गोष्टी केल्या जातात व भविष्यात त्याचा पश्चाताप होतो. या गोष्टी टाळता येणे शक्य आहे. प्रेमसंबंधात गैरफायदा घेणार्‍यांचे काही लक्षणे जाणून घेऊया.
 
 
वारंवार पैश्याबद्दल विचारणे
आर्थिक आवक, मालमत्ता आणि गुंतवणूक या विषयांवरून जोडीदार वारंवार विचारणा करत असेल, तर त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ वेळेत समजून घ्या. भविष्याची काळजी हा त्यामागचा प्रांजळ उद्देश असेल तर हरकत नाही, पण आर्थिक बाजूचा आढावा घेत खिशाला कात्री लावल्या जात असेल तर वेळेत सावध व्हा. तुमची आर्थिक बाजू जमेची असल्याने समोरची व्यक्ती तुमच्यासोबत आहे, याची शक्यता नाकारता येत नाही. या उलट जर जोडीदार आर्थिक गुंतवणूकीचा सल्ला, बचतीचा आणि आर्थिक मिळकतीचा मार्ग दाखविण्यास मदत करत असेल तर त्या व्यक्तीचे तुमच्यावर खरे प्रेम आहे, असे समजावे.
 
  
सतत नाराज होणे
रुसवा-फुगवा हा प्रेमाचाच एक भागच आहे. आपल्या जोडीदाराकडून काही अपेक्षा पूर्ण झाल्या नाही किंवा इतर काही कारणांमुळे भांडण झाले, तर नाराजी किंवा रुसवा नात्यात प्रवेश करतो. ही नाराजी समजुरदारपणाने मिटविली गेली तर नात्यातला गोडवा टिकून राहतो. ही नाराजी घालविण्यासाठी जर प्रत्येक वेळेस समोरच्याला काही ना काही भेटवस्तू द्यावी लागत असेल किंवा खर्चिक गोष्टच करावी लागत असेल तर ही एक धोक्याची घंटा आहे. नाराजीच्या आड गैरफायदा तर घेतला जात नाही ना, याची शहानिशा करणे आवश्यक आहे. महागडी वस्तू किंवा पैसा खर्च केल्याने जाणारा राग आणि सामंजस्याने मार्ग काढून मिटविलेले मतभेद यापैकी कुठल्या मार्गाने तोडगा निघतो याचे आकलन करणे महत्वाचे आहे.
 
 
वारंवार फिरायला नेण्याची आणि हॉटेलमध्ये जेवण्याची मागणी
प्रेमात एकमेकांना वेळ देणे फार महत्वाचे आहे. एकमेकांना वेळ दिल्याने नाते खुलते. एकमेकांना समजून घेण्यासाठी चांगला वेळ म्हणजेच ‘क्वॉलिटी टाइम’ एकमेकांसोबत घालविणे आवश्यक आहे, पण चांगला वेळ घालविण्याचा नावाखाली जोडीदार वारंवार फिरण्याचा किंवा हॉटेलमध्ये जेवणाचा अट्टाहास करत असेल, तर समोरच्या व्यक्तीचा हेतू ओळखा. अनेकांना बाहेरचे खाण्याची आवड असते, पण सतत जर हिच मागणी होत असेल तर मात्र जपून!
 
 
दुसर्‍याशी लगट
नात्याची इमारत विश्वासाच्या पायावर उभारली जाते. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीशी प्रामाणिक असणे हा नैतिक धर्म आहे. थट्टा-मस्करीची सीमा ओलांडून जोडीदार दुसर्‍या कुणाशी लगट करत असेल तर त्याच्या हेतूंवर अवश्य शंका घ्या.
 
  
मित्र आणि कुटुंबापासून दूर राहण्यास सांगणे
आयुष्य घडविण्यात आणि बिघडविण्यात मित्रांचा वाटा मोठा असतो.अव्यवहारी आणि चूकीच्या कामात सहभागी असणार्‍यांना आयुष्यात थारा न देणे हेच योग्य आहे. अडचणीत मदत करणार्‍या आणि वाईट गोष्टींपासून दूर ठेवणार्‍या मित्रांना आयुष्यात कायमच महत्वाचे स्थान द्यावे. अशावेळी तुमचा जोडीदार चांगल्या मित्र-मैत्रीणींपासून आणि तुमच्या परिवारापासून तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर हे योग्य नाही.
 
 
आत्मसन्मान
प्रत्येक व्यक्तीला आत्मसन्मान हा असायलाच पाहिजे. आत्मसन्मान नसणार्‍याला समाजात कुणीच मान देत नाही. प्रामाणिक हेतूंचा किंवा विचारांचा आदर हा व्हायलाच पाहिजे. बर्‍याचदा एकमेकांचे विचार न पटण्यासारखे प्रसंग नात्यात येतात. अशा प्रसंगी समोरच्याला हिन दर्जाची वागणूक दिली जात असेल किंवा चार-चौघात तिचा अपमान केला जात असेल, तर हे नातं महत्वाचे नाही हे समजून घ्या.