जाणून घ्या 'या' विकाराविषयी...

    दिनांक :13-Mar-2020
|
'डायव्हर्टिक्युलिटिस’ हा पचनसंस्थेशी संबंधित विकार आहे. या विकारातील विविध स्थितींमुळे पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. पचनसंस्थेशी संलग्न असणार्‍या अवयवांनजीक कप्पे निर्माण झाल्याने ही समस्या उद्भवते. अशा कप्प्यांची निर्मिती हे डायव्हर्टिक्युलिटिसमागचं मूलभूत कारण ठरतं. आतड्यांच्या भित्तिकांमधले कमकुवत घटक बाहेरच्या बाजूला वाढल्याने कप्पे निर्माण होतात. हे कप्पे सुजले किंवा त्यात बॅक्टेरियांची वाढ झाली तर जंतूसंसर्ग होऊन डायव्हर्टिक्युलिटिस जडतो.
 
 
डायव्हर्टिक्युलिटिसची लक्षणं सौम्य ते तीव्र स्वरूपाची असू शकतात. ती अचानक दिसू लागतात किंवा हळूहळू विकसित होतात. ओटीपोटातल्या वेदना हे या विकाराचं महत्त्वाचं लक्षण असतं. ओटीपोटाच्या डाव्या बाजूला खालच्या भागात तीव्र वेदना जाणवतात. यासोबतच मळमळ, ताप, उलट्या, सतत लघवीला जावंसं वाटणं, बद्धकोष्ठता आणि जुलाब आदी इतर लक्षणं आहेत. शौचातून रक्त पडणं हे सुद्धा या विकाराचं महत्त्वाचं लक्षण असतं.
 

vikar _1  H x W 
 
आनुवंशिक कारणांमुळे हा विकार जडू शकतो. या विकाराचा 50 टक्के धोका जनुकीय कारणांमुळेदेखील उद्भवू शकतो. म्हणूनच कौटुंबिक इतिहास असेल तर या विकाराविषयी विशेष काळजी घ्यायला हवी. आहारात फायबरचं प्रमाण कमी असल्यास डायव्हर्टिक्युलिटिसला निमंत्रण मिळू शकतं. बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, स्थूलता, धूम्रपान, ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता, विशिष्ट प्रकारच्या औषधांचं सेवन हीदेखील यामागची कारणं असू शकतात. 50 िंकवा त्यापेक्षा कमी वयाच्या पुरूषांना या विकाराचा धोका अधिक असतो. पन्नासपेक्षा जास्त वयाच्या महिलांना पुरूषांच्या तुलनेत या विकाराचा धोका अधिक असतो.
डायव्हर्टिक्युलिटिसच्या निदानासाठी विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. लक्षणं तसंच रूग्णाचा वैद्यकीय इतिहास जाणून घेऊन शारीरिक तपासणी केली जाते. रक्ततपासणी, मूत्रतपासणी, प्रतिमांची तपासणी, गरोदरपणाची चाचणी या माध्यमातून विकाराचं निदान होतं.
 
 
विकाराच्या तीव्रतेनुसार उपचारांची दिशा ठरते. बहुसंख्य प्रकरणांमध्ये फारशी गुंतागुंत नसते. असं असेल तर पुरेसा आराम आणि भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. औषधोपचार, फायबरयुक्त आहार आणि द्रव पदार्थांचं अधिक सेवन आदी पथ्य पाळून या आजारावर नियंत्रण मिळवता येतं. हलका आहार घेतल्याने पचनसंस्थेला आराम मिळतो. रूग्णामध्ये थोडीफार सुधारणा जाणवली की डॉक्टर नेहमीचा आहार सुरू करण्यास सांगतात.उपचारांना सुरूवात केल्याच्या साधारण आठ आठवड्यांनंतर कोलनोस्कॉपी करून या विकाराशी संबंधित शारीरिक समस्यांबाबत सविस्तर माहिती घेतली जाते आणि त्यानुसार उपचाराची दिशा ठरते.