समज आणि गैरसमज

    दिनांक :13-Mar-2020
|
• डॉ. शरद सालफळे
 
 
आपल्याला आपल्या आजाराबद्दल सारे काही समजते, असा पुष्कळांचा गैरसमज असतो. डॉक्टरांच्या कक्षात येवून आपल्या तक्रारी असे पेशंट सांगतात. स्वत:च स्वत:च्या आजाराचं निदानही करून टाकतात आणि काय काय तपासण्या करायच्या तेही तेच सांगून टाकतात. डॉक्टरांचे काम हलके करून टाकतात, म्हणजे डॉक्टरांना फक्त ‘प्रिस्क्रीप्शन’ लिहून देण्याचेच काम उरते! खरे तर, मनुष्य स्वभावाबद्दल आणि त्याच्या आजाराबद्दल अजून बरेच संशोधन व्हायचे आहे. त्यामुळे प्रॅक्टीस करणारे डॉक्टर्सही प्रांजळपणे कबूल करतात की, आमच्या पॅथीमध्ये अजूनही खुप संशोधन व्हायचे आहे. थोडे झाले आणि बहूत काही व्हायचे आहे, हे मान्य करायला डॉक्टरांना काही कमीपणा वाटत नाही. प्रस्तूत लेखांत पेशंट्‌सचे आपल्या आरोग्याबद्दल खुप काही गैरसमज असतात, त्यातला डॉक्टरला सारे काही समजते हा एक गैरसमज. डॉक्टराला बरेच काही समजते, तरी सर्वकाही समजते असे नाही. दोन सारख्याच आजाराचे पेशंट असलेत, तरी दोघेही ठराविक वेळातच दुरूस्त होतील, असा अंदाज बांधता येत नाही. दोन सिरीयस पेशंट्‌स असलेत, तरी त्यांचे भाग्य वेगवेगळे असते. तेव्हा डॉक्टर हा दैववादी असतो असे नाही, पण तरी तो देवावर विश्वास ठेवतो. कारण देवच चमत्कार घडवून आणू शकतो, डॉक्टर नाही.
 
 
doc _1  H x W:
 
 
आजकाल इंटरनेटवर सारी काही माहिती मिळते आजाराबद्दलचे सारे ज्ञान इंटरनेट सांगते, ते सारे प्रत्येक पेशंटला लागू पडतेच, असे नाही. त्यात रोगांची लक्षणे आणि त्या लक्षणांवरून निदान असे डॉक्टर्स ठरवितात. त्या निदानासाठी (डायग्नोसिस) डॉक्टर्स काही तपासण्या करून घेतात आणि त्याप्रमाणे औषध योजना करतात. इंटरनेटमधून माहिती घेणारे पेशंट्‌स व त्यांचे नातेवाईक समोर बसलेल्या डॉक्टरकडे संशयाने पाहतात.
 
 
बरेचसे पेशंट व त्यांचे नातेवाईक डॉक्टरकडून सार्‍या तपासण्या करून घेण्याचा आग्रह करतात कारण त्यांना ह्या तपासण्यांबद्दल माहिती मिळालेली असते. खेड्यातून आलेला पेशंटसुद्धा एक्सरे काढून घ्या, सोनोग्राफी करून घ्या, असा हट्ट धरतात. साधी डोकेदुखी असली की सिटी स्कॅन करून घ्या म्हणतात. ह्या सार्‍या तपासण्यामधून पुष्कळदा काहीच निष्पन्न होत नाही. वास्तविक डॉक्टरच ठरवितो, कुठल्या रोगाला कुठल्या तपासण्या आवश्यक आहेत. पण कधी पेशंट्‌सचा हट्ट पुरवावा लागतो. एकीकडे डॉक्टर्स फार तपासण्या सांगतात ही ओरड असते, तर दुसरीकडे तपासण्यांचे चार्जेस आम्ही भरतो, तुमचे काय जाते? असा युक्तीवाद असतो. सार्‍या तपासण्यांमधून डायग्नोसिस लिहूनच येते असा काहींचा गैरसमज, तर एवढ्या तपासण्या करूनही डॉक्टरला काहीच गवसले नाही, असा काहींचा समज.
 
 
काही पेशंट सारे सांगितलेले आज्ञाधारक मुलासारखे ऐकून घेतात व त्याप्रमाणे तपासण्या करून घेतात. लिहून दिलेल्या औषधीही घेतात. काही जण डॉक्टरांच सर्व ऐकून घेतात आणि स्वत:च्या मनासारखं करतात. काही पेशंट गिर्‍हाईकांसारखं मार्केिंटग करतात. चार डॉक्टरांना दाखवून तपासून घेतात व त्यांना जे सोयीचे वाटते, त्या डॉक्टरचे औषध घेतात. तात्पर्य, व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात तेच खरे.
 
 
एकेकाळी अनेक गैरसमजांवर आणि अंधश्रद्धांवर आधारलेलं औषधीशास्त्र आज समजलेल्या कारणांवरून तयार करण्यात आलं आहे. कंटाळा येईपर्यंत जगण्याची मुभा या शास्त्राने दिली आहे. मात्र, पेशंटचे सहकार्य मिळाले, तर डॉक्टरचे काम सुकर होईल. डॉक्टरांच्या तपासण्या, प्रयोगशाळेतल्या तपासण्या ह्या पेशंटच्या ट्रीटमेंटसाठीच असतात व ट्रिटमेंट ही पेशंटला बरे करण्यासाठी असते, हा विश्वास असला की बरेचसे समज आणि गैरसमज नक्कीच दूर होतील.
9422136067