वेल्डिंगचे डोळ्यांवर होणारे परिणाम

    दिनांक :14-Mar-2020
|
डॉ. यादव गावळेे
 
 
आपल्या आयुष्यात फर्निचर आणि तत्सम वस्तूंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कितीतरी लोखंडी वस्तूंचा वापर आपण दैनंदिन जीवनात करत असतो. या वस्तूंचे ते मूळ स्वरूप मात्र नाही. कच्च्या लोहधातूपासून या वस्तू बनविल्या जातात. लोखंडी वस्तू बनविणार्‍या कारखान्यात अनेक मजूर काम करित असतात; पण त्यांचं जीवन कायम धोक्यात असतं. 

velding_1  H x  
 
 
विशेषकरून त्यांचे डोळे. कारण लोखंडापासून वस्तू तयार करित असताना ‘वेल्डिंग’ची गरज असते. वेल्डिंग करत असताना गरम धातूच्या असंख्य ठिणग्या उडत असतात. या ठिणग्या डोळ्यात गेल्यास डोळ्याला गंभीर दुखापत होत असते. ठिणगी गरम असल्यामुळे ती डोळ्याच्या बाहेरील पारदर्शक पडद्यावर म्हणजेच कर्णिकेवर रूतून बसते आणि मग रुग्णाला वेदना सुरू होतात. डोळ्यांत वाळूचे कण असल्याचा भास होतो. पापण्यांची अतिमात्रेत उघडझाप होत असते. डोळे पिकलेल्या उंबराप्रमाणे लालबुंद होतात. अश्रूस्राव तर थांबतच नाही. सतत डोळे पुसत राहावे लागते. सतत डोळे पुसल्याने पापण्याही लाल होतात, सूजतात. प्रकाशाकडे बघवत नाही. रोगी बेचैन होतो. वारंवार डोळे चोळण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु, असे करू नये. पाण्याने डोळे धुतले तरी रुतून बसलेला ठिणगीचा कण बाहेर निघत नाही. अशा वेळेस त्वरित नेत्रविशारदास भेटणे अगत्याचे आहे. स्वत: होऊन ठिणगीचा कण बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नये. अशा प्रयत्नाने तो कण अजून खोलात जात असतो. नेत्रविशारद असे कण खास संज्ञानाशक औषध डोळ्यात घालून विशेष उपकरणाने काढत असतात. नंतर 3 ते 5 दिवसांची आवश्यक विश्रांती घ्यावी लागते.
 
 
अशा धोक्यापासून वाचण्यासाठी वेल्डिंगचे काम करणार्‍यांनी डोळ्यांवर काळा चष्मा घालूनच काम करावे. तसेच एका हातात विशिष्ट प्रकारचा काळ्या रंगाचा मोठा काच डोळ्यांसमोर पकडूनच वेल्डिंगचे काम करावे. जेणेकरून ठिणगी डोळ्यात जाणार नाही व वेल्डिंग करत असताना निर्माण होणार्‍या तीव्र प्रकाशाने डोळ्यांना इजा पोहोचणार नाही. अन्यथा वेल्डिंगच्या तीव्र प्रकाशाने डोळ्यांच्या आतील पडद्यावर सूज येते व ‘त्मजपदपजपे’ सारखा भयंकर रोग निर्माण होतो; ज्याने दृष्टी जाऊ शकते. अशी काहीही लक्षणे दिसल्यास त्वरित नेत्रविशारदास भेट द्यावी.