‘शब्द निवडोनि बोलावा’

    दिनांक :15-Mar-2020
|
संजिव लाभेे
 
आपल्या मराठी माणूस ना नवजात शिशूचे नाव ठेवताना विचार करीत, ना दुसर्‍याला नावे ठेवताना! जे मनात येईल ते त्यावेळी करून मोकळा होतो. एका माणसाने आपल्या मुलाचे नाव ठेवले ‘रुधिर’ आणि मुलीचे नाव ‘रक्ताक्षी’! मी त्याला विचारले, काय रे बाबा, तुझे लाल रंगावर किंवा लाल पंथावर फार प्रेम आहे का? तो म्हणाला असे का विचारता? मी म्हटले, मुल मुलीची नावे अशी का ठेवली लाल वर्णाची? तो म्हणाला नावे मीच ठेवली माझ्या एका मित्राच्या मुलाचे नाव रुचिर आहे. त्यात थोडा बदल करून मी ‘रुधिर’ ठेवले रुचिर आणि सुधीर यांचे कॉम्बीनेशन. माझ्या बहिणीचे नाव मीनाक्षी आहे एका नटीचे सोनाक्षी आहे तर मुलीचे रक्ताक्षी ठेवले काय बिघडले? रुधिर म्हणजे रक्त, हे काय नाव झाले? आणि अक्ष म्हणजे डोळा आणि मीन म्हणजे मासा. माशाचा आकार किती सुंदर, चमकदार असतो तसे सुंदर डोळे असणारी ती मीनाक्षी आणि रक्ताक्षी म्हणजे काय? रक्तासारखे डोळे असणारी की डोळ्यात सतत रक्त असणारी लाल डोळ्याची क्रोधिष्ट. 
 
bala _1  H x W:
 
 
आपण नाव ठेवताना विचार करीत नाही तसे आपण बोलत नाही. सामान्यपणे शब्दाचा अर्थ भाव संदर्भ याबाबत गंभीरपणे विचार करीत नाही व त्यातून बर्‍याचदा गंमतीशीर व क्वचित गंभीर गोष्टी उद्भवतात. गेल्या पिढीतील एक शिक्षक तरुण भारत मधून बरेच लिहायचे म. पु. गाडे ! त्यांनी सांगितला किस्सा आठवतो. ते ज्या वर्गाचे वर्गशिक्षक होते त्या वर्गात महिनाभर एक मुलगा आला नाही. जेव्हा तो आला त्यावेळी त्याच्या डोक्यावर केस नव्हते. चेहरा सुतकी, वर्ग शिक्षकांनी सहज विचारले. काय रे, कोठे गेला होतास? पोरगा उत्तरला ‘काशी’ला! त्यांनी विचारले ‘काशी’ला कशाला त्यावर तो म्हणाला आईची खूप दिवसाची काशीला जायची इच्छा होती. अनायसे वडील वारले मग आम्ही अस्थी शिरवायला प्रयाग काशी जाऊन आलो. त्याचे उत्तर ऐकून ते अवाक झालो. हसावे का रडावे त्यांना कळेना. अनायसे वडील वारले? शिक्षकांना ‘अनायसे’चा अर्थ माहीत असल्याने त्यांना काही वाटले. पण, त्या अबोध बालकाच्या मनाला काहीच वाटले नाही.
 
 
समर्थ रामदास स्वामी म्हणायचे ‘शब्द निवडून बोलावा’ शब्दाला केवळ रुपच नसतं तर त्याला अर्थ असतो, भाव असतो आणि तो संदर्भानुसार बदलत असतो. मराठी ही अत्यंत लवचिक भाषा आहे. लववावी तशी लवते म्हणून मराठी बोलणार्‍यांनी समजून आणि सावध राहून बोलायला हवे. ‘शब्द सम्हाले बोलिये। शब्द को हाथ न पाव। एक शब्द मरहम करे तो दुजा करे घाव’ आणि शरीराला झालेली जखम किंवा घाव कालांतराने बरा होतो पण मनाला झालेली जखम किंवा घाव बरा होत नाही. दीर्घकाळ राहतो म्हणून जीभ सांभाळावी लागते. आपल्याकडे म्हणतात न ‘जीभेला हाड नसते.’ तुझ्या जीभेला काही हाड बिड आहे का? इतका ‘हार्ड’ का बोलतो, सारखं हाड, हाड काय करतोस?
 
 
असाच एक किस्सा आठवतो. एका मुलाने निबंधात आपल्या वडिलांच्या नावाच्या मागे कै. असे लिहिले. त्याला बोलावून विचारले तुझे वडील आहेत न? तो हो म्हणाला, ‘‘मग तू आपल्या वडिलांच्या नावामागे ‘कै’ का लिहिले?,’’ तर तो म्हणाला ‘आमच्या घरी जेवढे थोर पुरुषांचे फोटो आहेत. त्या प्रत्येक फोटोच्या खाली त्यांच्या नावामागे ‘कै’ लिहिले आहे. माझे वडीलही माझ्यासाठी थोरच आहेत. शिक्षकांना हसावे की रडावे कळेना. ते म्हणाले ‘तुला कै’चा अर्थ माहित आहे का? तो म्हणाला नाही. पण थोर-मोठे, पूज्य आला असावा. मग त्याला त्यांनी कै-कैलासवासी हे सांगून तो मृत व्यक्तीच्या नावामागे लावतात हे सांगितले.
 
 
आता किस्स्याचा भाग सोडला तरी किती लोक असे आहेत की जे शब्दाचे नीट अर्थ समजून घेऊन योग्य ठिकाणीच ते वापतात. मोठी माणसे सुद्धा बडे बडे देश मे छोटी छोटी घटना होती है असे म्हणतात. मराठी माणसाने तरी मराठीच्या बाबतीत असे म्हणू नये. मराठी आपली मातृभाषा म्हणजे दुसरी आईच आहे तिचे सौंदर्य व प्रतिष्ठा आपण जपलीच पाहिजे, त्यासाठी म्हणायचे व पाळायचे देखील...
9422141840