‘कोरोना’चे आर्थिक भय!

    दिनांक :16-Mar-2020
|
• डॉ. वर्षा गंगणे
 
कोरोना विषाणू (कोविड-19) आणि त्याचे परिणाम यामुळे संपूर्ण जग हादरले आहे. कोरोनाचा अंतिम परिणाम मृत्यू असल्यामुळे एक भयाचे सावट जगात निर्माण झाले आहे. या जीवघेण्या विषाणूमुळे जगाची अर्थव्यवस्था प्रभावित झाली असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाय शोधण्याचे तातडीचे प्रयत्न व खबरदारी घेतली जात आहे. चीनमधून जगभर पसरत असलेला या विषाणूने जगभरात 93,524 संसर्गबाधित रुग्ण असून त्यापैकी 3,203 चा मृत्यू झाला आहे. एकट्या चीनमधे 80,282 रुग्ण असून 3000 च्या वर मृत्यूची नोंद करण्यात आली आहे (4-3-2020 रोजी) चीनशिवाय इतर देशांत 13,242 रुग्ण असून 222 चा मृत्यू नोंदला गेला आहे. हे आकडे रोज वाढत चालले आहेत, ही चिंतेची व गंभीर बाब आहे .
 
 
bsd_1  H x W: 0
 
 
26 फेब्रुवारी 2020 रोजी अमेरिकेतील ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ॲण्ड प्रिवेंशन’ या संस्थेच्या संचालिका डॉ. नॅन्सी मेसोनियर यांनी कोरोना विषाणूच्या प्रसाराबद्दल धोक्याचा इशारा दिला होता. आतापर्यंत यामुळे हजारो लोकांचा बळी गेला आहे. भारतातदेखील इतर देशांमधून येणार्‍या लोकांमुळे कोरोना विषाणू भारतात आले असून ते पसरत आहेत. सीमेलगतच्या राज्यातील बंदरं, विमानतळं, जंक्शन तसेच मोठ्या गर्दीच्या ठिकाणी याचा प्रसारा अधिक दिसून येत आहे. आतापर्यंत चीनपाठोपाठ हा विषाणू दक्षिण कोरिया, इटली, इराण,जपान, फ्रांस,जर्मनी, स्पेन, अमेरिका, सिंगापूर, हॉंगकॉन्ग, स्वित्झरलँड, मलेशिया, थाइलँड, ऑस्ट्रेलिया, बहरीन, ब्रिटन, कुवेत, इराक, भारत, इस्राइल, संयुक्त अरब अमिराती फिलीपाईन्स या देशांत पसरला आहे. यावर अनेक देशांतून विविध शंका व चर्चा समोर येत आहेत त्यापैकी ‘कोरोना व्हायरस, की बायोवेपन’ ही एक आहे. या विषाणूवर औषधे किंवा लस उपलब्ध नसल्यामुळे जागतिक आरोग्य संस्था देखील चिंतित आहे. लोकांमध्ये असलेले भीतीचे वातावरण कमी करण्याचे प्रयत्न व सावधगिरीच्या उपायांसाठी धोरण आखणे व राबवणेे ही आज प्रत्येक देशाने घेतलेली भूमिका आहे.
 
 
भारतात आसमानी-सुलतानी संकटे, बँकांचे घोळ, मंदीची चाहुल यासारख्या प्रश्नांनंतर कोरोनाचे संकट एक आव्हान आहे. भारतीय तापमानात कोरोना विषाणू 2 ते 5 मिनिटांपेक्षा अधिक काळ तग धरु शकणार नाही, असा कयास लावला जात आहे. पण वर्तमान स्थिती लक्षात घेता अवेळीचा पाऊस, ढगाळ वातावरण, दमट हवा, वादळ, कोरोनाच्या प्रसाराला साथ देत आहे की काय? असा नवीन प्रश्न विचार करायला लावणारा आहे. परिणामांपेक्षा त्याची भयावहता हाच सर्वत्र चर्चेचा व चिंतेचा विषय आहे.
 
 
भारतात कोरोनाचे आर्थिक परिणाम -
 1. आर्थिक विकास दरात एक ते दोन टक्के आणखी घट होण्याची शक्यता आहे.
 2. लघु व कुटीर उद्योगांचे मोठ्ठे नुकसान होण्याची चिन्हे आहेत.
 3. पर्यटन व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 4. विदेशी थेट गुंतवणुकीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
 5. बेरोजगारीत आणखी वाढ होण्याची स्थिती निर्माण होईल.
 6. आपात्कालीन खर्चात तसेच आरोग्यसेवांवरील खर्चात मोठी वाढ अपेक्षित आहे.
 7. शेअर बाजार सावरण्यासाठी अधिक विलंब लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 8. जनमानसात भयाचे वातावरण असल्याने त्याचा उत्पादकतेवर प्रतिकूल परिणाम दिसून येईल.
 9. सीमेलगतच्या रहिवाशांमध्ये अधिक असुरक्षिततेसह बाहेरून येणार्‍या लोकांप्रती द्वेष वाढीस लागण्याची स्थिती निर्माण होईल.
 10. सर्व प्रकारच्या सुरक्षा उपायांवरील खर्चात तातडीने संरक्षणात्मक वाढ करावी लागेल.
कोरोनामुळे देशात अघोषित कर्फ्यू लागल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. आर्थिक प्रश्नांसोबतच कोरोनाच्या काही सामाजिक प्रश्नांकडे देखील गांभीर्याने बघावे लागणार आहे. समाजातील सर्व तळागळातीळ लोकांचा विचार केल्यासच आरोग्यसेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल. कोरोनाची भीती बाळगण्याची गरज नसून प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याची गरज आहे.
 
काही सूचना-
 1. पंतप्रधानांनी लोकांना न घाबरण्याचे आव्हान तातडीने वारंवार करावे.
 2. सीमेबाहेरिल प्रवासांना पायबंद घातला जावा.
 3. लोकसंख्या गणना कार्यक्रम लांबणीवर टाकला जावा.
 4. जमाव किंवा समूहाचे कार्यक्रम रदद् करावेत.
 5. वैयक्तिक जवाबदरीने वागतांना स्वछता, काळजी, परस्पर सहाय्य तसेच समजूतदारपणा सगळ्यांनी दाखवावा.
 6. शासनाने जाहीर केलेल्या धोरणास पाठींबा दिला जावा.
 7. रस्त्यावर थुकणे, शिंकरणे बंद केले जावे, यासाठी जागरूकता व प्रसंगी दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
 8. प्रसारमाध्यमे, गप्पा,चर्चा यावरून चुकीचे निष्कर्ष काढू नयेत.
 9. परदेशांतून येणार्‍यांची तपासणी ताबड़तोब करण्यात यावी.
 10. आत्मबळ व सकारात्मक वागणुकीने कोरोनावर मात करता येईल याचा अधिकाधिक प्रचार स्वयंवागणुकीतून प्रत्येकाने करावा.
 11. हस्तांदोलन टाळा, खोकताना, शिंकताना, जांबई देताना रुमालचा वापर करा.
 12. स्वत:ची रोगप्रतिकारक्षमता वाढविन्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा.
 13. शासनाने आपात्कालीन व्यवस्था निर्माण करावी.
 14. अनावश्यक प्रकल्प रदद् करून कोरोनाग्रस्त लोकांसाठी वळते करावेत.
 15. खाजगी रुग्णालयांना अनुदान देऊन सुविधांनी सज्ज करावे.
 16. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
स्वछतेला अधिक महत्त्व देऊन गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळल्यास कोरोना पासून आपला बचाव करता येईल. पंतप्रधानांनी आवाहान केल्याप्रमाणे- घबराहट को ‘ना’ सावधानी को ‘हां’ कहिए, या विधानाची अंमलबजावणी केल्यास कोरोनाचे भय बाळगण्याचे कारण नाही. एकदा या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात भारताला यश आले, की- अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर आणता येईल . 18 वर्षांपूर्वी 2002- 2003 मध्ये ‘सार्स’ विषाणूमुळे जगात 700 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. हजारो लोक संक्रमित झाले होते. पण, त्यावर मात करून अर्थव्यवस्था पुढे सरकली. त्याचप्रमाणे कोरोनामुक्त भारत लवकरच आपल्यासमोर असेल, फक्त जगतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेली आणिबाणी आणि महामारी यावरील उपायांची गांभीर्याने दखल घेतली जावी.
9422134807