विश्वनाथन आनंदलाही कोरोनाचा फटका

    दिनांक :16-Mar-2020
|
बर्लिन,
पाच वेळा विश्वविजेता ठरलेला भारताचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद करोनाच्या धसक्यामुळे जर्मनीतच अडकला आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुमारे ११२ देशांमध्ये झाला आहे. भारतातदेखील करोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशवासीयांना खबरदारी बाळगण्यास सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत विमान उड्डाणांच्या मर्यादेमुळे विश्वनाथन आनंद याचा जर्मनीतील मुक्काम वाढला असून त्याने स्वत:ला सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे.

viswanathan anand_1  
 
 
विश्वनाथन आनंद हा बुंडेसलीगा बुद्धिबळ स्पर्धेसाठी जर्मनीत गेला होता. त्याचे परतीचे विमान १६ मार्चचे होते, पण विमान उड्डाणांच्या मर्य़ादेमुळे आनंदला जर्मनीत थांबावे लागले. सध्या जगभरात दहशत माजवणाऱ्या करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच देश खबरदारी घेत आहेत. करोनाचा फटका बसलेले देश शक्य त्या मार्गाने आपल्या देशातील करोनाचा प्रादुर्भाव नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अनेक देशांनी आपल्या देशातून बाहेर जाणारी आणि बाहेरून देशात येणाऱ्या विमान उड्डाणांच्या संख्या मर्यादित ठेवल्या आहेत. तसेच अनेक देशातील विमाने रद्द करण्यात आली आहेत. त्याचाच फटका विश्वनाथन आनंदला बसला असून नाईलाजाने त्याला जर्मनीतील आपला मुक्काम वाढवावा लागला आहे.
 
“सध्या जगात करोना व्हायरस ज्या प्रकारे पसरतो आहे, त्यावरून एक सिद्ध होते की प्रत्येकाने योग्य खबरदारी घ्यायला हवी. आनंद जर्मनीत आहे. तेथील विमान उड्डाणांवर असलेले निर्बंध आणि प्रवाशांना देण्यात आलेल्या सूचना यामुळे एका जागी राहणे हेच हिताचे आहे. अधिक प्रवास करून स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा जेथे आहात तेथे सुरक्षित राहणे अधिक योग्य आहे”, अशी माहिती आनंदची पत्नी अरूणा हिने दिली.