अझरबैजानमधील दुर्गा मातेचे प्राचीन मंदिर

    दिनांक :17-Mar-2020
|
अवंतिका तामस्कर
 
अझरबैजान या 95 टक्के मुस्लिम जनता असलेल्या देशात 300 वर्षांहूनही अधिक प्राचीन असे दुर्गा मातेचे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे अखंड ज्योती आहे व दरवर्षी येथे साधारण 15 हजारांहून अधिक भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येतात. येथे तेवत असलेल्या अखंड ज्योतीमुळे त्याला टेंपल ऑफ फायर असेही संबोधले जाते. 

mandir _1  H x  
 
 
हिंदू धर्मात अग्नी पवित्र व पूजनीय मानला गेला आहे व अग्नीचे वेगळेच महत्त्वही आहे. त्यामुळे या दुर्गा मंदिरात तेवणारी ज्योती साक्षात भगवती असल्याची भावना भक्तगणांत आहे. या मंदिरात प्राचीन त्रिशूळही आहे. मंदिराच्या भितींवर गुरुमुखी भाषेतील लेख आहेत. या मंदिराची वास्तुकलाही प्राचीन आहे. शेकडो वर्षांपूर्वी या मार्गाचा वापर भारतीय व्यापारी करत असत व त्यापैकीच कोणीतरी हे मंदिर बांधले असावे, असे सांगितले जाते. मात्र इतिहास असे सांगतो, हरियाणातील मानदा गावाचे बुद्धदेव यांनी हे मंदिर उभारले. मंदिरात असलेल्या शिलालेखात उत्तमचंद व शोभराज यांनीही या मंदिर उभारणीत योगदान दिले असल्याचे उल्लेख आहेत. या मार्गाचा वापर करणारे व्यापारी येथे दर्शनासाठी थांबत असत व जवळच असलेल्या ओवर्‍यात आराम करून पुढे जात असत, असे सांगितले जाते.
 
 
इराणमधूनही काही लोक येथे पूजा करण्यासाठी येत असत. येथे कायमस्वरूपी पुजारी होते, मात्र ते 1860 सालापासून येथून निघून गेले त्यानंतर कोणीही पुजारी येथे वास्तव्यास आलेले नाहीत. अझरबैजान सरकारने 1975 साली या मंदिराचे स्मारक बनविले व 1998 मध्ये युनेस्कोला हे जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर करण्यासाठी त्याचे नामांकन पाठविले. 2007 साली ही ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित केली गेली आहे.