पल्लवी जठार-खताळ
पर्यटकांची खूप पसंती असलेली अंदमान निकोबार ही बेटे जगभरात प्रसिद्ध आहेत. मात्र, पर्यटकनाशिवायही या बेटांची आणखीही आगळीवेगळी ओळख आहे. ही बेटे अनेक मनोरंजक बाबींशी निगडित आहेत. काय आहेत ही वैशिष्ट्ये?
असे मानले जाते की, अंदमानच्या नावाचे मूळ संस्कृत आहे. म्हणजे हनुमान या शब्दाचा हा मल्याळीतला उच्चार आहे. मल्याळीत हनुमानाला हण्डुमन म्हणतात व त्यावरून अंदमान हा शब्द आला आहे. निकोबारचा अर्थ आहे नेकेड लोकांची जमीन. या बेटांवर असलेल्या मूळ आदिवासी जाती बाहेरच्या लोकांबरोबर अजीबात मिसळत नाहीत. अशा 500 जातींचे लोक येथील विविध बेटांवर राहतात.
अंदमान हा एकूण 572 बेटांचा समूह आहे, मात्र त्यातील फक्त 36 बेटांवरच बाहेरचे लोक जाऊ शकतात, तर निकोबार बेटावर पर्यटक जाऊ शकत नाहीत. तेथे फक्त रिसर्चसाठी निवडक लोकांनाच जाता येते. या बेटांवर कासव खूप प्रमाणात आढळतात. त्यात सर्वात मोठे डर्मोचेलेम कोरिअसी या नावाचे कासव जसे सामील आहे तसेच सर्वात छोटे ऑलिव्ह राईडली हे कासवही सामील आहे. भारतीय चलनाच्या 20 रुपयांच्या नोटेवर जे जंगल आहे ते अंदमानातले जंगल आहे.
या बेटांवर व्यावसायिक मासेमारीला बंदी आहे. त्यामुळे येथे मासे त्यांचे पूर्ण आयुष्य जगू शकतात. फुलपाखरांसाठी हे हॅपी आयलंड मानले जाते. कारण येथे विविध प्रकारची व खूप मोठ्या संख्येने फुलपाखरे आढळतात. हे बेट कोकोनट क्रॅबसाठीही प्रसिद्ध आहे. हे खेकडे जमिनीवरील सर्वात मोठे खेकडे समजले जातात. त्यांची लांबी 1 मीटरपर्यंतही असते. हे खेकडे नारळाच्या करवंट्या दातांनी फोडतात. येथील राज्य प्राणी आहे डुगोंग. हा समुद्री जीव अतिशय लाजाळू असतो. या प्राण्याची देशात पाच ब्रिडींग सेंटर आहेत. त्यातील एक अंदमानात आहे.
अंदमानमधील एका बेटावर भारतातला एकमेव जागृत ज्वालामुखी आहे व पर्यटक या बेटावर जाऊन तो पाहू शकतात. दुसर्या जागतिक युद्धात जपानने तब्बल तीन वर्षे अंदमानवर कब्जा केला होता. ब्रिटिश काळात अंदमानची ओळख काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी झाली. येथील तत्कालीन सेल्युलर जेल आजही जतन केला असून तो राष्ट्रीय स्मारक बनला आहे. अंदमानचा 90 टक्के भाग जंगलाने व्यापलेला आहे.
विशेष म्हणजे अंदमान निकोबार भारतात असली तरी ती भारतापेक्षा इंडोनेशियाला अधिक जवळ आहेत. इंडोनेशियापासून या बेटांचे अंतर 150 किमी आहे, तर भारतापासून ते 800 किमी आहे.