कलिंगडाच्या मुख्य जातींविषयी माहिती

    दिनांक :18-Mar-2020
|
महाराष्ट्रात कलिंगड हे पीक उन्हाळी हंगामात घेतलं जातं. या पिकाची लागवड जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात केली जाते. त्या शिवाय बागायती पीक म्हणून काही ठिकाणी रब्बी हंगामात कलिंगडाची लागवड केली जाते. अलीकडे मुंबईच्या बाजारात जवळ जवळ नऊ महिने कलिंगडे उपलब्ध असतात. कलिंगडाचे पीक यशस्वी होण्यासाठी लागवडीसाठी सुधारित किंवा संकरित जातींची निवड फार महत्त्वाची असते. त्यापैकी काही जातींची माहिती या ठिकाणी देत आहोत. 

kalingad _1  H  
 
  1. शुगर बेबी : महाराष्ट्रात या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याची फळं मध्यम आकाराची, तीन ते पाच किलो वजनाची असतात. फळांचा रंग गर्द हिरवा असून गर गर्द लाल रंगाचा, खुसखुशीत असतो. उत्तम गोडी, उत्कृष्ट चव आणि मध्यम आकार यामुळे ही जात सर्वात जास्त लोकप्रिय आहे. मर रोगाचा प्रादुर्भाव असलेले विभाग सोडून या जातीची लागवड करावी.
  2. आसाही यामाटो : ही जपानी जात मध्यम अवधीत तयार होते. याची फळे सात ते आठ किलो वजनाची असतात. सालीचा रंग फिक्कट हिरवा, गर गुलाबी रंगाचा, गोड असतो. याचं प्रति हेक्टरी 250 ते 300 क्विंटल उत्पादन मिळतं.
  3. दुर्गापूर मिठा : ही जात कृषी संशोधन केंद्र, दुर्गापूर येथे विकसित करण्यात आली आहे. या फळांच्या सालीचा रंग फिक्कट हिरवा असतो. फळांचं वजन सहा ते सात किलो असतं. तसंच फळांची साल जाड असल्यामुळे ती जास्त काळ टिकून राहतात.
  4. अर्का माणिक : ही जात भारतीय फलोद्यान संशोधन संस्था, बंगळुरू इथं विकसित करण्यात आली. याची फळं लांबट, फिक्कट हिरव्या रंगाची असून वर गर्द हिरव्या रंगाचे पट्टे असतात. फळांचा रंग गर्द गुलाबी असून अत्यंत गोड असतो. फळांचे सरासरी वजन सहा ते आठ किलो असते. ही जात भुरी, केवडा रोगांना प्रतिकारक आहे. ही साठवणूक, वाहतुकीस उत्तम आहे. यात साखरेचं प्रमाण 12 ते 13 टक्के असते. यापासून 300 ते 350 क्विंटल उत्पादन मिळतं.