आत्मविश्वास व मेहनतीतून पिकवले ‘सोने’

    दिनांक :18-Mar-2020
|
अविनाश जोशी
 
 
‘शेतीतही सोने पिकवता येतं. त्यासाठी आत्मविश्वास अन्‌ मेहनत करण्याची जिद्द असावी लागते.’ हे उद्‌गार आहेत ढाणकीतील रेशीम उत्पादनातून विक्रमी उत्पन्न घेणारे दत्ता व अनिता सुरोशे या कष्टकरी जोडप्याचे.
 
 
रेशीम उत्पादनात यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी विक्रमी उत्पादन घेण्याची ‘हॅट्रिक’ केली. महिला शेतकरी अनिता सुरोशे यांनी तर रेशीम अळीचे संगोपन जणू काही पीएचडी केल्याप्रमाणेच केले आहे. शेतात राबराब राबणार्‍या या जोडीने रेशीम उत्पन्नाने सोन्याला फिके पाडले आहे. 

kwintal _1  H x 
                                           अनिता सुरोशे व दत्ता सुरोशे रेशीम शेतीत काम करताना 
 
 
रेशीम कोसले दर्जेदार पिकवून तब्बल पन्नास हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळविला. हा भाव सोन्यासारखा वाटतो म्हणूनच याला ‘मातीतील सोने’ असे संबोधले जाते. सुरोशे कुटुंब स्वत:च्या दोनच एकर शेतीत कुटुंबाचा गाडा ओढत होते. ते कठीण झाल्याने दत्ताने ऑटोरिक्षा घेतला. त्यातही काही मिळकत मिळेना. काय करावे, हा गंभीर प्रश्न सतावत होता.
 
 
रीक्षा चालवत असताना एका शेतकर्‍याची रेशीम शेतीची गोष्ट दत्ताने ऐकली. त्यावरून त्याने रेशीम उत्पादनाकडे वळण्याचे ठरवले. त्यांनी रेशीम विभाग अधिकारी महेंद्र ढवळे व मुकुंद नरवाडे यांची भेट घेतली. त्यांनी प्रोत्साहन दिले. दोन एकरात दत्ताला एक क्विंटल रेशीम उत्पादन झाले. 25000 रुपये भाव मिळाला. मेहनतीवर तो महिन्याला पंचवीस हजार कमवायला लागला. त्याचबरोबर मक्त्याने दुसर्‍याची जमीन घेऊन रेशीमशेती करू लागला.
 
 
आज दर महिन्याला पाच क्विंटल रेशीम कोसल्याचे उत्पन्न दत्ता व अनिता सुरोशे घेताहेत. फेब्रुवारी 2020 ची त्यांचे रेशीम विक्री 2 लाख 77 हजार एवढी विक्रमी झाली आहे. यालाच म्हणतात, मातीचे सोने करणे. एका वर्षात पाच एकर तुती लागवडीतून आठवेळा रेशीम उत्पादन घेऊन वार्षिक उत्पन्न 22 लाख रुपये ते कमावत आहेत.
 
 
रेशीम कापडाची मागणी सतत वाढत असल्याने ढाणकी परिसरात मोठ्या प्रमाणात कोसला उत्पादनासाठी तुतीची लागवड सुरू झाली. कोसल्याला बाजारात 30 ते 50 हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळत असल्याने आता शेतकरी तुती लागवड करून कोसला पिकाकडे वळले आहेत. नगदी पीक म्हणून कोसल्याकडे पाहिले जाते. एक एकरात 1 ते 1.25 क्विंटल कोसला उत्पादन घेतल्या जात आहे. कोसला उत्पादनासाठी कृषी विभागाकडून शेतकर्‍यास तुती, टिन शेड, चंद्रिका, तुती कटर, नेट यासाठी अनुदानही देण्यात येते.
 
 
कोसल्याचे उत्पादन परिसरात मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु कोसला विक्रीसाठी शेतकर्‍यास नजीकची बाजारपेठ उपलब्ध नसल्याने हैद्राबाद, बंगळुरू अशा बड्या शहरांतच कोसला बाजारपेठ असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड तुती उत्पादक शेतकर्‍यांना बसत होता. शेतकर्‍यांकडून परिसरात ‘कोसला रिलिंग सेंटर’ची मागणी कृषी विभागास करण्यात आली. त्यामुळे शेतकर्‍यांच्या कोसला पिकास आता हमीभाव मिळू शकतो.
 
 
पारंपरिक शेतीला बगल देत आधुनिक पद्धतीने शेती करणारे दत्ता व अनिता सुरोशे यांनी स्वत:च्या दीड एकरात तुतीची लागवड करून रेशीम उद्योगास सुरवात केली. वाढते उत्पन्न पाहता त्यांनी यदुराज वानखेडे यांच्या शेतात मक्त्याने तुती लागवड करून पहिले उत्पादन अवघ्या 28 दिवसांत 2 लाख 77 हजार रुपयांचे घेतले.
 
 
रेशीम उत्पादनात अग्रेसर असलेल्या ढाणकीची आता सर्वदूर ख्याती पोहोचली आहे. भंडारा जिल्ह्यातील रेशीम व्यापारी खेमचंद सोनकुसरे यांनी दत्ता सुरोशे (9423665615) यांच्या शेतातील रेशीम कोसला खरेदी केला. 2.77 लाख रुपयांचा धनादेश महिला शेतकरी अनिता सुरोशे यांना दिला. केवळ 28 दिवसांतील रेशमाचे उत्पादन पाहता परिसरातील शेतकरी अवाक्‌ झाले आहेत.
रेशीम उद्योगात कृषी अधिकारी महेंद्र ढवळे, प्रादेशिक रेशीम अधिकारी चौगुले, जिल्हा रेशीम अधिकारी, उमरखेडचे वरिष्ठ तांत्रिक सहायक मुकुंद नरवाडे यांचेही मोलाचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभल्याचे कोसला उत्पादक अनिता सुरोशे यांनी सांगितले.
•