राष्ट्रीय उत्पन्न

    दिनांक :02-Mar-2020
|
 
भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची पहिली परिगणना विख्यात नेते दादाभाई नवरोजी यांनी 1876 मध्ये 1867-68 या वर्षासाठी केली. वस्तू व सेवाकर्मे यांचे उत्पादन, ही राष्ट्रीय उत्पन्नामागील मूलभूत कल्पना आहे म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करावयाचे म्हणजे वस्तू व सेवाकर्मे यांच्या प्रवाहाचे मापन करावयास पाहिजे, असे त्यांनी म्हटले तसेच यासाठी जे माप वापरायचे ते असे असले पाहिजे की, त्यामुळे निरनिराळ्या वस्तू व सेवाकर्मे यांची माणसाला असलेली गरज आर्थिक दृष्टिकोनातून मोजली गेली पाहिजे. मानवी गरजा भागविण्यासाठी वस्तू व सेवाकर्मे यांचे उत्पादन करणे हे देशातील अर्थव्यवस्थेचे प्रमुख कार्य आहे. उत्पादनाची क्रिया होत असताना त्याचबरोबर उत्पादक घटकाना उत्पन्न आणि उत्पादनाचा उपभोग, भांडवली वस्तूंचे संचयन अशा प्रकारे उपयोग किंवा व्यय होत असतो. उत्पादन, उत्पन्न आणि उत्पादन व्यय असे हे तीन प्रवाह राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहाची तीन स्वरूपे आहेत.


gdp 2 march_1  

यांपैकी कोणत्याही स्वरूपातील वर्ष किंवा इतर हव्या असलेल्या कालखंडातील एकूण प्रवाह म्हणजे त्या वर्षातील किंवा कालखंडातील राष्ट्रीय उत्पन्न होय. बाजारात प्रचलित असलेल्या किंमती या गरजांचे सापेक्ष महत्त्व कार्यक्षमतेने दाखवू शकतात, या आधारविधानावर त्यांच्या द्वारा हे मोजमाप करता येते आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या कल्पनांचे आकडे पैशामध्ये असतात परंतु, हे आकडे मूलत: वस्तू व सेवाकर्मे यांच्या वास्तव प्रवाहांचे मापन करीत असतात, ही गोष्ट सतत ध्यानात ठेवली पाहिजे. भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नाची परिगणना करण्यासाठी मुख्यत्वे उत्पादन आणि उत्पन्न प्रवाह या पद्धतींचा उपयोग केला जातो. उत्पादन प्रवाहाचा उपयोग अर्थव्यवस्थेतील कृषी, वन, मत्स्योद्योग, खाणी, दगडखाणी, संघटित क्षेत्रातील कारखाने यांसारख्या वस्तूंची निर्मिती करणार्‍या विभागांसाठी, वसतिस्थानांच्या मालकीपासून होणारे उत्पन्न, शीत भांडारे आणि अनियमित तसेच घरगुती वस्तुनिर्मिती उद्योगांसाठी केला जातो. घरगुती उद्योगांसाठी ही पद्धत फक्त आधारभूत वर्षासाठीच वापरली जाते. चालू वर्षाच्या आकडेवारीसाठी यावरून काही अप्रत्यक्ष अंदाज पद्धती लावून अंदाज केले जातात. वीज, गॅस, पाणीपुरवठा, वाहतूक, दळणवळण, वखार साठवण, बँक आणि विमा व्यवहार, स्थावर मालमत्ता, सेवावृत्तीचे उद्योग, प्रशासन आणि संरक्षण, इतर सेवा, घाऊक आणि फुटकळ (किरकोळ) व्यापार, हॉटेले आणि उपाहारगृहे यांसाठी उत्पन्न प्रवाह पद्धती वापरली जाते. बांधकामासाठी उत्पादन आणि उत्पादन व्यय प्रवाह अशा दोन पद्धतींचा संयोग केला जातो. या कामासाठी दरवर्षी कृषिमंत्रालयाने केलेले पिकांविषयींचे अंदाज, पंचवार्षिक पशुधन संगणना, उद्योगधंद्यांची वार्षिक पाहणी, भारतीय खाण विभाग, कोळसा-नियंत्रक, पेट्रोल आणि ऊर्जा मंत्रालये यांच्याकडून उत्पादन किंमती आणि निविष्टी यांसंबंधीची माहिती, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मिळणारी बँकिंग आणि वित्तीय तसेच अधिदान शेष यांविषयीची आकडेवारी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांकडून मिळणारी आकडेवारी, शासकीय खात्याचे वार्षिक लेखे आणि व्यापारी माहिती व सांख्यिकी महा-निदेशक यांच्याकडून मिळणारी आयात-निर्यातीची आकडेवारी वापरली जाते.


यांशिवाय वेगवेगळ्या नमुना पाहण्या, कृषिमंत्रालयाचे लागवड-खर्चाचे अभ्यास, लघुउद्योगांच्या लघु-उद्योग विकास आयुक्तांच्या पाहण्या इत्यादी माहितीचाही उपयोग केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नात विचारात घेतले न जाणारे उत्पादन म्हणजे जे उत्पादन अविक्रेय असते ते. उदा., घरोघरी होणारा स्वयंपाक किंवा कुटुंबीय अथवा मित्रमंडळी यांसाठी केलेले खाद्यपदार्थ, शिवलेले कपडे, केलेल्या विणकामाच्या किंवा इतर जिनसा, घरच्या सायकली, स्कूटर, इतर यंत्रांची किंवा इतर दुरुस्तीची कामे इत्यादी परंतु अविक्रेयतेचा निकष लावताना दोन महत्त्वाच्या अपवादांची दखल घेतली पाहिजे. एक म्हणजे कुटुंबियांसाठी जरी केलेले असले, तरी मूलतः विक्रेय असलेले उत्पादन विचारात घेणे आवश्यक आहे. या दृष्टीने शेतकर्‍यांनी पिकविलेल्या अन्नधान्यादी पिकांतून कुटुंबियांसाठी राखून ठेवलेला भाग, कोळशाच्या खाणीतून कर्मचार्‍यांना विनामूल्य देण्यात येणारा कोळसा इ. प्रकारचे उत्पादन विचारात घ्यावे लागते. दुसरा अपवाद शासन पुरवीत असलेल्या प्रशासकीय, संरक्षण, न्याय इ. प्रकारच्या सेवा आणि विना-नफा तत्त्वावर चालणार्‍या खाजगी संस्थांनी पुरविलेल्या शैक्षणिक, वैद्यकीय, संशोधनात्मक इ. सेवा यांचा. या सर्व जरी अविक्रेय असल्या, तरी त्यांचे राष्ट्राच्या जीवनातील महत्त्व लक्षात घेता त्यांचा उत्पादन परिगणनेत समावेश करणे आवश्यक आहे. त्यांना बाजारभाव नसल्यामुळे त्यांचे मूल्य त्यांच्यावर केल्या जाणार्‍या खर्चाइतके धरले जाते.
भारतासारख्या विकसनशील देशात आर्थिक विषमता अधिक प्रमाणात आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या विषम विभागणीला थोड्याबहुत प्रमाणात भांडवलशाही किंमत-यंत्रणा, तर बर्‍याच अंशी भांडवलशाहीच्या आधारभूत संस्था कारणीभूत झालेल्या आहेत. समाजातील मालमत्तेच्या विषम विभाजनामुळे तसेच निरनिराळ्या व्यवसायांमध्ये आणि उद्योगधंद्यांमध्ये कामगारांना व मजुरांना प्राप्त होणार्‍या कमीअधिक उत्पन्नामुळे आर्थिक विषमता निर्माण झाली आहे.
• सीए अभिजित केळकर
9422126890