समजून घेण्याची वृत्ती

    दिनांक :20-Mar-2020
|
वर्षा  देशपांडे  
 
हल्ली नवं दाम्पत्यात सहनशक्ती, सामंजस्य, दुसर्‍याला समजून घेण्याची वृत्ती अत्यंत कमी होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर समाजात याविरुद्धही उदाहरणे दिसतात.50-60 वर्षे लग्न होऊन झालेत पण आनंदाने एकत्रित राहणारे, सुखाने संसार करणारे, दाम्पत्यही दिसतात. ते कसे एकत्रित राहतात, त्यांच्या कौटुंबिक यशस्वी जीवनाचं रहस्य काय, मला जिज्ञासा वाटली आणि मी असिस्टंट डायरेक्टर जनरल (टेलिकम्युनिकेशन) श्री. भास्करराव आणि त्यांच्या पत्नी निशाताई वाघमारे यांना जाऊन भेटले. 13 मे 1955 साली लग्न झाल्यामुळे त्यांच्या लग्नाला 65 वर्षे झालेले. गेल्यानंतर थोड्याफार गोष्टी झाल्या. मी गुगलीच टाकली. ‘‘तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज?’’ त्यावर निशाताई गोड हसल्या आणि आपली कौटुंबिक कहाणी सांगू लागल्या....
  
love _1  H x W:
 
 
‘‘लव्ह मॅरेजची गोष्ट दूरच. मी यांना बघितलेसुद्धा नव्हते. याचा अर्थ हा नव्हे, की- माझा दाखवण्याचा कार्यक्रम झाला नाही. माझ्या काकांच्या मित्राचा हा मुलगा अत्यंत हुशार होता. परिस्थितीने गरीब होता. मात्र काकांनी त्यावेळी विधान केले होते बाबांजवळ की-तुम्ही त्यांच्या आताच्या परिस्थितीवर जाऊ नका. मुलगा हुशार आहे. पुढे खूप प्रगती करेल. बाबांनाही स्थळ पसंत पडले. मात्र मला लग्न करायचे नव्हते. कारण की मला कुटुंबात खूप सदस्य नको होते. सुटसुटीत कुटुंब पाहिजे होतं. वाघमारेकडे मात्र नेमकं उलट होतं. त्यांच्याकडे खूप जणं होते. शिवाय, माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नाचं कर्ज नुकतच फिटले होते. बाबांनी लागलीच कर्जत पडावे, अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. मी आईला म्हटले- मला लग्न नाही करायचं. पण बाबा म्हणाले- होकार आला तर लग्न करायचं आणि नकार आला तर प्रश्नच नाही. मग काय, दाखवायचा प्रोग्रॅम झाला. त्यावेळी मी यांच्याकडे बघितले सुद्धा नाही. मात्र होकार आला. आणि लग्न झाले. यांना त्यावेळी केवळ 110.00 रुपये पगार होता. घरात सदस्य संख्या भरपूर होती. चार दीर, चार नणंदा आणि आई. दोन दिरांचे लग्न झालेले... त्या दोन जावा. असे भरपूर सदस्य होते. हे शंभर रुपये घरात खर्चाला द्यायचे आणि दहा रुपये स्वतःसाठी ठेवायचे. नागपूरला बसने ऑफिसमध्ये जाणे- येणे करावे लागत असे. तेवढेच पैसे महिनाभर पुरवावे लागायचे. माहेरी घरी आई मला स्वयंपाक करू देत नव्हती. इथे आल्यावर मी स्वयंपाक शिकले. मात्र माझा छळ त्यावेळच्या प्रथेप्रमाणे अजिबात झाला नाही, हेही तेवढेच खरे. काही वर्षांनंतर भांड्याला भांडे लागू लागले आणि मग वेगळे राहायचे ठरले. पैसा तर नव्हताच मात्र वाटण्या झाल्या त्या माणसांच्या! माझ्याकडे नणंद, दीर आलेत. मीही त्यांचे मनापासून प्रेमाने आणि कर्तव्यबुद्धीने सर्व व्यवस्थित केले. अशा रीतीने दहा वर्षे लग्नाला झालेत. मी नववी पास होते. मी मॅट्रिक केले. पुढे डीएड केले. मला नोकरी मिळाली. त्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी हे करू शकले. मला हे सायकलवर नोकरीच्या ठिकाणी पोहोचवायचे.
 
 
मग एक कलाटणी जीवनाला मिळाली. यांची बदली मुंबईला झाल्यामुळे आम्ही 1979 साली मुंबईला गेलो. मुंबईला मात्र मी नोकरी केली नाही. कारण की, माझ्या मिस्टरांची अत्यंत जबाबदारीचे नोकरी होती. ते क्लास वन ऑफिसर झाले होते. यांच्या हाताखाली 35000 लोकं काम करीत होते. ऑफिसच्या किल्ल्या यांच्याजवळ असायच्या. पगारही हेच देत असत. सकाळी आठ वाजता ते जात. रात्री आठला वापस येत. लोकलने प्रवास व्हायचा. त्यामुळे घरात सगळं मी बघायचे. अगदी किराणा, भाजीपाल्यापासून तर मुलांचे संगोपन, शाळा, अभ्यास, आजारपण इत्यादी. असे आम्ही दोघांनी दोन क्षेत्र वाटून घेतले होते. या कारणामुळे नोकरीचं डोक्यातून निघून गेलं. एक आठवण आठवते. मुंबईत एक सारखा पाऊस त्यामुळे लोकल बंद! यांना ऑफिसला जाणे अत्यावश्यक. मग काय अक्षरशः हे सायकलने गेले. कुठून कुठपर्यंत माहिती आहे? अंधेरी ते चर्चगेट! आणि आपले कर्तव्य बजावले. आमच्या दोघांच्याही स्मरणात हा प्रसंग कायम आहे. 1985 यांची बदली दिल्लीला झाली आणि आम्ही मुंबईहून दिल्लीला आलो.
 
 
भास्कर राव म्हणाले- दिल्लीला आमचे दिवस खूप मजेत गेले. मुंबईतील वर्षे त्यामानाने तणावात गेलेत. मी स्वतः अकरावी मॅट्रिकला सातवा मेरीट होतो. पूर्ण प्रांतांमध्ये संस्कृतमध्ये पहिला नंबर होता. त्या वेळेला साठ रुपये मला बक्षीस मिळाले होते. माझे करियर मी घडवले असले, तरी मला मात्र असामान्य बुद्धी माझ्या आईकडून मिळाली आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी मी बीए केले. त्यावेळी अकाऊंटच्या परीक्षा होत त्या दिल्या. 62 साली प्रमोशन झाले. अकाऊंटंट नंतर असिस्टंट सुपरिडंट झालो. आणि 72 साली क्लास वन ऑफिसर झालो. त्या काळातली एक जोरदार आठवण आठवते. एका प्रमोशनच्या वेळी माझ्या ज्युनियरला माझ्या आधी प्रमोशन दिलं. मी काय करावे? पोस्टात गेलो आणि ऑफिसमधील बॉसच्या नावाने टेलिग्राम ठोकून दिला. माझ्या आधी माझ्या ज्युनियरला प्रमोशन दिले आहे. लागलीच मला मेन ऑफिसमध्ये बोलवण्यात आले आणि प्रमोशनची ऑर्डर दिली. त्यावेळी इतका चांगला सरकारी कारभार होता.
 
 
1985 साली दिल्लीला आलो. यावेळेपर्यंत मुलगी आणि मुलगा यांचे लग्न होऊन नातवंडं आले होते. एक समाधान मनाला होते. काटकसरीचा संसार करून नागपूरमध्ये वर्धा रोडला मोठं घर घेतलं होतं, त्यामुळे मन स्वास्थ होते. दिल्लीत जवळच टॉकीज होत्या. सिनेमे बघायचं. दिल्लीजवळचा भाग बघितला. आम्ही भारत िंहडून आलो. दिल्लीमध्ये आमचे वर्ष छान गेले. आमचं मतैक्य असल्यामुळे दोघांनी मिळून छान संसार केला. तसेही त्यावेळी भांडणं होतच नव्हते. कारण की सकाळी आठला गेलेला माणूस रात्री आठला आल्यावर भांडणार केव्हा?
 
 
1989 साली नागपूरला आलो. नातीचे लग्न झाले. पणतू आला. आता रिकामा वेळ बराच असतो, त्यामुळे उडत असतात खटके. पण ते मधुर असतात. कारणही तसेच छोटे-छोटे असतात. निशाला आवडते स्वच्छता. निशा उद्योगी आहे. माझं काम असंच जरा खराब आणि मी आहे आळशी. मग होते कटकट! अशावेळी या कानाने ऐकायच नी दुसर्‍या कानाने सोडून द्यायचं. जास्तीत जास्त- काय म्हणतो मी, जातो आदाशाला.
 
 
निशा म्हणते- खरंच जाणार आहात जसे? आणि दोघेही हसतो. जीवनात मी तिच्या ओंजळीत भरभरून मोती घातले आणि त्यांची सुंदर सुशोभित अशी नात्यांची वीण घालून तिने माळ तयार केली. सासर-माहेरची नाती प्रेमाने जपली. तिने संसार खूप सुंदर केला आणि मी फुलवला. शुभेच्छा देऊन मी तिथून आनंदात बाहेर पडले. असे स्वीट होम सर्वांनीच ठेवायला हवं नाही का?