मद्यपानाचे घातक परिणाम

    दिनांक :20-Mar-2020
|
अतिमद्यपानामुळे यकृतात चरबी जमा होते. यामुळे यकृताच्या पेशी आक्रसतात. या स्थितीला सिर्‍होसिस असं म्हटलं जातं. यामुळे यकृताच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. पण अत्यल्प किंवा अजिबात मद्यपान न करणार्‍या लोकांच्या यकृतात चरबी साठू शकते. याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज(एनएएफएलडी) असं म्हटलं जातं. ही स्थिती सिर्‍होसिसला कारणीभूत ठरू शकते. या विकाराविषयी... 

coco _1  H x W: 
 
 
एनएएफएलडीच्या अनेक प्रसंगांमध्ये सुरूवातीला फारशी लक्षणं दिसून येत नाहीत. पण ओटीपोटाच्या उजव्या बाजूला वरच्या भागात वेदना जाणवणं, थकवा, यकृताचा आकार वाढणं, पोटात सूज येणं, कावीळ किंवा त्वचा, डोळे पिवळे पडणं अशी काही लक्षणं दिसून येतात. एनएएफएलडीचं रूपांतर सिर्‍होसिसमध्ये झालं तर मानसिक ताळतंत्र हरवणं, अंतर्गत रक्तस्राव, शरीरात पाणी साठणं, यकृताची कार्यक्षमता मंदावणं अशी लक्षणं दिसून येतात.
 
 
या विकाराच्या निश्चित कारणांबाबत अजूनही फारशी माहिती नाही. इन्शुलिनला प्रतिकार करण्याच्या शरीराच्या क्षमतेचा या विकाराशी संबध असण्याची शक्यता व्यक्त होते. शरीरातले स्नायू आणि तंतूंना ऊर्जेसाठी साखरेची गरज लागली की इन्शुलिनच्या मदतीने पेशी रक्तातली साखर शोषून घेतात. इन्शुलिनमुळेच यकृत अतिरिक्त साखर साठवून ठेऊ शकतं. पण शरीराने इन्शुलिनला प्रतिकार करायला सुरूवात केल्यानंतर पेशी इन्शुलिनला आधीप्रमाणे प्रतिसाद देत नाहीत. यामुळे यकृतात अतिरिक्त चरबी साठू लागते. परिणामी, यकृत आक्रसायला सुरूवात होते. जगातील 20 टक्के लोकसंख्या एनएएफएलडीला बळी पडते. इन्शुुलिन प्रतिकारामुळे या विकाराचा धोका अनेकपटींनी वाढतो. पण याशिवायही हा विकार जडू शकतो. स्थूल आणि बैठी जीवनशैली असलेल्या लोकांमध्ये इन्शुलिन प्रतिकाराची शक्यता जास्त असते. यासोबत मधुमेह, कोलेस्टेरॉलची उच्च पातळी, ट्रायग्लिसराईड्‌सची उच्च पातळी, स्टेरॉइड्‌सचा वापर, कॅन्सरवरच्या उपचारांसाठी वापरली जाणारी औषधं, आहाराच्या चुकीच्या सवयी किंवा अचानक वजन कमी होणं ही सुद्धा एनएएलएलडीची कारणं आहेत.
 
 
या विकाराची कोणतीही लक्षणं दिसत नसल्याने रक्तचाचणीत यकृतातल्या एंझाईम्सचं प्रमाण वाढलेलं दिसल्यानंतरच निदान केलं जातं. सर्वसाधारण रक्तचाचणीद्वारे या विकाराचं निदान करता येऊ शकतं. यकृतातले जास्तीचे एंझाईम्स यकृताशी संबंधित इतर विकारांकडेही अंगुलीनिर्देश करतात. अल्ट्रासाउंड पध्दतीद्वारे यकृतात साठलेल्या चरबीचं प्रमाण मोजलं जातं. इलास्ट्रोग्राफीद्वारेही यकृताची तपासणी केली जाते. या चाचण्यांमधून फारसं काही निष्पन्न झालं नाही तर यकृताची बायोप्सी करण्याचा सल्ला दिला जातो. या विकाराचं रूपांतर सिर्‍होसिसमध्ये होत असल्याने धोका अनेक पटींनी वाढतो. सिर्‍होसिसचं रूपांतर पुढे यकृताचा कर्करोग किंवा यकृत निकामी होण्यातही होऊ शकतं. त्यामुळे या विकारावर वेळीच उपचार करून घ्यायला हवेत. सौम्य स्वरूपाच्या एनएएफएलडीमुळे यकृतावर फारसे गंभीर परिणाम होत नाहीत. वेळेत निदान, औषधोपचार आणि जीवनशैलीतले बदल याद्वारे या विकारावर मात करता येऊ शकते.