राजवृक्ष बहावा...

    दिनांक :20-Mar-2020
|
निशा डांगे
 
 
ळदीने माखलेला. स्वर्णीम आभा ल्यालेला. पाने कमी आणि फुले जास्त. अहाहा! काय ते फुलांचे मनमोहक गुच्छ. खरंच इतकं सृष्टिसौंदर्य आपल्या सृष्टिनिर्मात्याने कसे निर्माण केले असावे? क्षणभर मी स्वत:लाच प्रश्न विचारू लागले. एखाद्या हळद लावलेल्या नववधूसम नटलेला बहावा येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येक वाटसरूचे लक्ष आपल्याकडे केंद्रित करून घेत होता. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अतिशय सुंदर नि आकर्षक बहावा वृक्षाचे रूप पाहून प्रत्येक चालणार्‍याची पावले आपोआप थबकली जायची. 
 
raj_1  H x W: 0
 
 
मीही एक वाटसरू. स्वर्णीम कांती लेवून पिवळ्या सुंदर फुलांनी साजशृंगार करून नटलेला बहावा वृक्ष पाहून माझीही पावले जागच्या जागीच थबकली. फुलांनी गच्च बहरून आलेला बहावा पाहून मन अगदी मोहरून गेलं. पाहताच क्षणी जी नजर खिळली ती दुसरीकडे वळलीच नाही. सहजच ओठांवर काही ओळी तरळल्या,
 
 
हळदीने माखलेला बहावा
वाटसरूंना घेई मोहुनिया
स्वर्णीम कांती, रूप मनोहर
वेड लावी चित्त वेधुनिया
 
 
संस्कृतमध्ये अरग्वध, व्याधिघात, नृपद्रुम, मराठीत, बहावा, कर्णिकार, हिंदीमध्ये अमलतास, इंग्रजीमध्ये गोल्डन शॉवर ट्री, तर दक्षिण भारतात कणिपू म्हणून ओळखला जाणारा हा वृक्षराज. होय! वृक्षराजच. सोन्याच्या दागिन्यांनी नखशिखान्त स्वर्णीम आभा लेवून नटलेल्या या वृक्षास वृक्षराज म्हणावयास काही हरकत नाही. पिवळ्यागर्द रंगात चमकदार झुंबरासारखी हातभार लोंबलेली त्याची पुष्पगुच्छ पाहताच मनात एखाद्या गर्भश्रीमंत सम्राटाची प्रतिमा डोळ्यांसमोर येते. जणूकाही एखादा भारदस्त राजा सुवर्ण अलंकारांनी नटून राजसभेत उभा राहून सर्वांचे निरीक्षण करत आहे. असं हे गर्भश्रीमंत बहाव्याचं झाड एरव्ही सर्वसामान्य दिसतं त्यामुळे सर्व जण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. तेच झाड चैत्राचं आगमन होताच दुर्लक्षिलेल्यांनाही आपल्याकडे आकर्षित करून घेतं. काय कमाल आहे ना मनुष्याची, त्याला सौंदर्याची चटकन भुरळ पडते. इतर वेळी हेच बहुगुणी झाड त्याच्या नजरेसमोर असतानाही तो कधीच त्याकडे ढुंकूनही पाहात नाही. तेच फुलांनी संपूर्ण बहरून आल्यावर त्याच्या संगतीने फोटो काढण्याचा मोह त्याला आवरत नाही. तरीही कोणी लक्ष देत नसेल तर मग मात्र सुप्रसिद्ध गीतातील या ओळी म्हणाव्याच लागतील,
झाड फुलांनी येता बहरून
तू न पाहिले डोळे भरून
काय उपयोग आंधळ्या
दीप असून उशाशी
कुठे शोधीशी रामेश्वर अन्‌
कुठे शोधीशी काशी...
 
 
झुबकेदार फुलांनी संपूर्ण बहरलेला बहावा पाहणे म्हणजेच अप्रतिम सौंदर्य जवळून अनुभवण्याचे नेत्रसुख. निसर्गप्रेमींना गुलमोहरासोबतच मिळालेली निसर्गाकडून याच ऋतूमधील ही आणखी एक नेत्रसुखाची पर्वणी. फुलांच्या घोसात कोवळ्या कळ्या तसेच पूर्ण फुललेली फुले एकदाच पाहावयास मिळतात. इतकी सुंदर फुले पाहून मनाला सहज वाटले की, त्याची कृतमाल म्हणजेच कर्णफुले बनवून कानात घालावी. फुलांच्या सुंदर सुंदर माळा बघून त्यांची आभूषणे बनवून घालावी. जसे हळदीच्या वेळी नववधूला सजवतात तसे पुन्हा एकदा सजावे. मनलज्ज मनात एक कुतूहलपूर्ण प्रश्न निर्माण झाला. ज्या वेळी सीतामाता रामसह वनवासात होती त्या वेळी त्या बहाव्याच्या फुलांची आभूषणे घालत असतील का?
 
 
पिवळ्या फुलांचा मंद मंद सुगंध दरवळत होता. रात्रीस तो जास्त दरवळतो. फुलांचा मंद कडसर सुगंध रातकिड्यांना मोहून घेतो. या फुलांवर फुलपाखरू, भुंगे मकरंद चाखण्यास अवतीभवती फिरत असतात. त्यांचा तो गुंजारव पाहून आपल्याही मनाला भुरळ पडते. बहाव्याच्या पुष्पलंकारांनी त्यांच्या सौंदर्यात निश्चितच आणखी भर पडली असेल. फुलांनी नटलेल्या या सुशोभित वृक्षाला पाहून मनातून शतकोटी वाह वा! वाह वा! निघू लागली.
 
 
बहावा ही भारतीय वनस्पती सदाहरित तसेच वर्षावनात सहज आढळते. भारतीय हरितधनातील एक महत्त्वाचा, बहुगुणी, बहुउपयोगी वृक्ष म्हणजेच बहावा. या पानझडी वृक्षाने आपली जुनी कात टाकून नवीन पालवी धारण केली होती. आता या वृक्षाने पिवळ्या फुलांच्या घोसासोबत कोवळीगर्द पर्णिका धारण केली होती. पानांच्या जोड्याही अगदी जोडीने साकारलेल्या कलाकृतीच. लांबलचक ठासून भरलेल्या शेंगाही विलक्षण कुतूहलाने पहाव्या असा हा बहावा. प्रत्येक शेंगीतल्या बियांना एक वेगळा स्वत:चा स्वतंत्र कप्पा. जणूकाही प्रत्येकीचं घर वेगळंवेगळं. कुणी कुणाशी भांडू नका नि कुणी कुणाच्याही हद्दीत घुसू नका. निसर्गाचा अलौकिक चमत्कारच ना! शेंगांच्या मधोमध मधाळ सुवास येणारा चॉकलेटी रंगाचा जरा वाळलेला रस चाखून पाहावा वाटला. पहिला तरी हरकत नाही गुणकारी असतो तो. पोट साफ होते त्याने. ओल्या बाळंतिणीस व छोट्या बालकांना देतात. जंगलातील प्राणीही- कोल्हे, अस्वल पोट साफ करण्यासाठी याचा उपयोग करतात.
 
 
भारताच्या सौंदर्यात हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत बहावा वृक्षाने भर टाकली आहे. डेहरादूनमध्ये पांढर्‍या रंगाचा बहावा पहावयास मिळतो, तर भारताच्या सर्व भागात पिवळ्या रंगाचा, सात प्रकारच्या वेगवेगळ्या जातीचा हा वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा, बागेच्या मधोमध, घरांच्या भिंतीच्या कुंपणाशेजारी रुबाबात उभा राहून निसर्गसौंदर्य उधळत असतो. निसर्गप्रेमी, साहित्यिकांनी तर याची दखल घेतलीच आहे. भारतीय प्राचीन ग्रंथांत पूर्वीच या वृक्षाच्या सौंदर्याचे व औषधी बहुगुणांचे यथोचित वर्णन केलेले आहे.
 
 
आरग्वधो राजवृक्षशम्पाकचतुरंगुला:।
आरेवतव्याढिघातक्रुतमालसुवर्णका:।।
 
 
अमरकोशात वर्णिलेल्या या सुवर्णकांतिमय राजवृक्षाचे हे वर्णन अगदी सार्थ आहे.