डॉल्स हाऊस ते थप्पड

    दिनांक :20-Mar-2020
|
श्याम पेठकर
 
 
उसने मुझे मारा, पहली बार. नहीं मार सकता. बस इतनीसी बात है. और मेरी पिटीशनभी इतनी सी है...’’ ‘थप्पड’ या सिनेमाची नायिका कोर्टात सांगते तेव्हा अगदी जवळपास सार्‍यांचीच पहिली प्रतिक्रिया, ‘‘इतकं ताणून धरण्याचं काहीच कारण नाही ना...’’ अशीच असते. नंतर आपुलाची वाद आपणाशी, या न्यायाने आत्मचर्चा सुरू होते आणि मग स्त्रियांच्या बाबत स्वत:सकट सार्‍या सामाजाची धारणा किती भंपक आहे, हे जाणवत राहतं. आपण स्त्रियांच्या बाबत किती उदारमतवादी आहोत, हे दाखविण्याची पद्धत आहे. तसा पद्धतशीर गैसमज आपलाच आपण करून घेतलेला असतो. ‘मी स्त्रीवादी आहे’ हे ठामपणे सांगणारे पुरुष खूप भेटतात. ते सगळेच किती तकलादू आहे आणि म्हणून खोटेही आहेत आणि आपलाही त्यात समावेश करावा लागेल, हे आत्मज्ञान हलवून टाकणारे आहे. 

thappad _1  H x 
 
28 फेब्रुवारीच्या शुक्रवारी ‘थप्पड’ चित्रपटगृहांत रुजू झाला. अर्थात, भव्य-दिव्य आणि अतर्क्य अशी दृश्यं उभी करणारे व्हीएफएक्स तंत्र नाही, परदेशातील चित्रीकरण नाही, मस्त नाच नाहीत आणि मानवी क्षमतेला कधीच गवसणी घालता येणार नाहीत असे फाईट सिन्स नाहीत... अशा चित्रपटांच्या तिकीटबारीवर आपल्या अर्थव्यवस्थेसारखा स्लो डाऊनच असतो. त्यातही मग तुमचाच खरा चेहरा तुमच्यासमोर मांडत तुमच्या जगण्याच्या धारणांविषयीच नेमका प्रश्न विचारणार्‍या कलाकृती आम्हाला नको असतात. वास्तव जगण्यातलेच ताणेबाणे इतके असतात की, मग पैसे देऊन नसती डोकेदुखी नको असते. आपण टाळत आलेले प्रश्न असे साक्षात समोर उभे करणारे काहीच आम्हाला नको असते. मुळात आजच्या व्यवस्थेने प्रश्न विचारण्याची आमची क्षमताच संपविली आहे. त्यातही इतके अलगद नाजूक प्रश्न तर आम्हाला नकोच असतात. स्वत:च स्वत:च्या केलेल्या फसवणुकीच्या पांघरुणात सुखासीन झोपेत राहणे, जास्त छान वाटणे स्वाभाविक. ‘पिंक’ या चित्रपटात ‘नो मिन्स नो’ समजून घेताना खूपच सायास पडले होते. तिचे नाही म्हणजे होच असते, असा आम्ही सोयिस्कर समज करून घेतला आहे. एकतर नकार देण्याचा अधिकार तिला नाहीच, ही आमची धारणा नेणिवेच्या पातळीवर अद्यापही तितकीच जिवंत आहे. टोकदारही आहे. त्यामुळे आता ‘थप्पड’च्या निमित्ताने पुन्हा चर्चा रंगली आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ती अधिक अधोरेखित झाली, मात्र नकोशा गोष्टीवर नकोसेपणाने चर्चा करावी, अशीच ही चर्चा आहे. नवर्‍याने एक झापड मारली म्हणून तोवर अत्यंत सुखाचा म्हणावा असाच चाललेला संसार असा एकतर्फी आणि एकाएकी मोडीत काढायला निघालेली नायिका जरा आगावूच वाटते अनेकांना. 
 
‘थप्पड’च्या आधी ‘मुल्क’, ‘आर्टिकल 15’ यांच्यानंतर अनुभव सिन्हा या दिग्दर्शकाने भारतीय समाजातील अजून एका प्रश्नावर बोट ठेवलेले आहे. ‘मुल्क’मधून धर्म, ‘आर्टिकल 15’ मधून जात आणि आता ‘थप्पड’मधून लिंग; अशा तीन प्रकारच्या भेदभावांविषयी त्यांचे सिनेमे बोलत असल्याचे लक्षात येते. 
 
चित्रपटाची नायिका अमु आणि तिचा नवरा विक्रम हे उच्चभ्रू जोडपे. अगदी कसं छान छान वाटावा असा हा संसार आहे. एक दिवस घरी चालू असलेल्या एका पार्टीमध्ये तिचा नवरा त्याच्या वरिष्ठ अधिकार्‍याशी वादावादी करायला लागतो. त्याला अडवण्यासाठी त्याला बाजूला ओढू पाहणार्‍या अमुला तो थप्पड मारतो... या थापडेचे पडसाद मग उमटत राहतात. एकदम सालस, सरळ, साधी वाटणारी अमु कणखर भूमिका घेते. ती विलक्षण शांत असते. ती काडीमोड मागते. तिला बाकी काहीही नको असते. खावटी वगैरेही...
  
या थापडेनंतर खूप काळ अमु फक्त शांत राहते, विचार करत राहते. तिचे हे विचार खूप खोलवर आहेत आणि नंतरच्या काळात ती अत्यंत संयतपणे ते ती व्यक्त करते. नवर्‍यासंदर्भात तिला तितकाच आक्षेप असतो. त्याहीपेक्षा आक्षेपार्ह हे की, तिचा नवरा विक्रमला मात्र सुरुवातीला त्यात वावगे असे काहीच वाटत नाही. थप्पडही तो मारा, उसको नही मारनी थी... बॉसचा राग तुझ्यावर निघाला. तुझ्यावर नाही तर कुणावर निघणार? त्या कंपनीत माझी किती भावनिक गुंतवणूक होती, हे माहिती आहे ना तुला, असेच त्याचे ‘समजावणे’ असते तिला.
 
अशा वेळी मग ‘नवरा- बायको’ या वर्तुळाच्या परिघात फिरणारे जे काय ग्रह असतात ते परंपरागत विचारांनी अशा वेळी हेच बघतात की संसार तुटू नये. अशा वेळी समजून घ्यायला, सहन करायला मात्र पत्नीलाच सांगितले जाते. संसार टिकविणे ही केवळ तिची एकटीचीच जबाबदारी असते, असा दृढ समज आहे. त्यामुळे जे काय नुकसान व्हायचे ते केवळ तिचेच होत असते. एकटी स्त्री म्हणजे समाज, कुटुंब आणि सार्‍यांसाठीच जबाबदारी असते आणि संधीदेखील. त्यामुळे त्याने कितीही, काहीही केले तरीही ते सहन करायचे असते, असेच तिला सांगितले गेले असते. तिलाच गृहीत धरले गेलेले असते... हे सारेच वास्तव चित्रपटाच्या नायिकेला लख्ख दिसू लागते. खाड्‌कन डोळे उघडणे ज्याला म्हणतात ते तिच्याबाबत झालेले असते. तिचा नवर्‍याविरुद्ध लढा सुरू होतो, असे वरवर वाटत असले तरीही आतावरच्या या व्यवस्थेविरुद्धच तिचा लढा असतो. 
 
सिनेमा जसजसा पुढे सरकतो तसं आपल्या लक्षात येतं की, स्त्रीच्या अस्तित्वाच्या अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या आपण आतापर्यंत सोडून देत आलो आहोत, पण त्या तशा दुर्लक्ष करता येण्यासारख्या नाहीत. तरीही अनेकांना दृढपणे असेच वाटते की, नवरा- बायकोत असे काही होतच असते. पुरुष आक्रमकच असतो. त्याला खूप टेन्शन्स असतात. बाहेर आणि आत असे दोन्ही सांभाळावे लागते. तिला काय नुसते घरच सांभाळायचे ना... गृहिणी इतकेच काय ते तिचे अस्तित्व आम्ही मान्य केलेले असते. त्यापलीकडे तिची काही भूमिका असू शकते, विचार असू शकतात, तिला तिचा म्हणून काही एकान्त हवा असतो, तिची स्वप्नं असू शकतात, गृहिणीपण ओलांडून तिला काही कर्तृत्व गाजवायचे असते आणि त्यासाठी तिला सर्वच प्रकारचे स्वातंत्र्य हवे असते, हे आम्ही गृहीतच धरलेले नसते. त्यामुळे ‘एक झापड तर मारली ना!’ अशीच प्रतिक्रिया उमटत राहते. आधार केंद्रांत समुपदेशनाला ज्या केसेस येतात त्यात मुलीच्या घरच्यांचे समुपदेशकांना हेच सांगणे असते की, होतो थोडाफार त्रास, पण तो सहन करायला तिला सांगा... अगदी उच्चभ्रू म्हणाव्या अशा वर्गातील जोडप्यांतही तो तिला मारहाण करतो. म्हणजे दोघेही डॉक्टर्स आहेत. ती गायनॅक आहे अन्‌ तो कधीकधी ताण असह्य झाल्यावर तिला मारतो. एक पतिराज तर असे म्हणत होते की, दहा वर्षांच्या संसारात सात-आठ वेळाच तर मी हिला मारले ना... तेही एक झापडच! त्याला म्हणायचे की, मी प्रेम केले, हे नाही दिसत तुम्हाला. अरे! प्रेम करणे हे कर्तव्यच आहे ना बाबा तुझे, हे त्याला कुणी सांगायला हवे. 
 
थापड दिसते, तिचा आवाज होतो आणि चित्रपटांत तर चारचौघांत मारली गेलेली असते... मात्र, अशा अनेक नाजूक मुस्कटदाबी असतात ज्या तिच्या तिलाच जाणवत राहतात. ती अदमुशी होते, पण कुणाला सांगताही येत नाही. सांगितल्या तर त्या कुणाला कळतही नाही. त्या शारीरसंबंधांपासून घरातल्या अनेक निर्णयांपर्यंत असतात. राहायला चांगले घर, खाण्या-पिण्यापासून कशाचीच ददात नाही, चांगली वस्त्रे-दागिने असे सगळेच दिले म्हणजे त्याचे कर्तव्य संपले आणि त्याने तिला सुखात ठेवले आहे, असाच आपला समज आहे. तिच्या अंगावर दागिने आहेत आणि ते तिने समारंभांत घातलेच पाहिजेत, असा त्याचा आग्रह असतो. कित्ती ना प्रेम! कशासाठी हा आग्रह? उंची वस्त्र तिने परिधान करावेत, कशासाठी? त्याचे स्टेटस्‌ असते... तिच्या आवडीचे काय? तिला निवड करण्याचे स्वातंत्र्यही नसणे, याकडे इतर कुणी लक्ष देण्याचे काही कारणच नाही अन्‌ तो तर ते देतच नाही. तिने तसली मागणीही करू नये, तिच्या मनात तसले काही विचारही येऊ नयेत, अशीच सिस्टीम आहे. तिला आत्मभान यायलाच नको. नकोच ते!
 
‘थप्पड’ हा चित्रपट आत्ता म्हणजे एकविसाव्या शतकात आला. त्यातही नायक बायकोला झापड मारतो, म्हणजे शारीरिक िंहसा करतो. त्यावरही आता आम्ही इतकी चर्चा करतो आहे की, मारली एखादी झापड नवर्‍याने बायकोला तर काय हरकत आहे? तिने नाही समजून घ्यायचे तर कुणी? अगदी याच्या उलट घडले असते तर... म्हणजे तीही कुठल्या कंपनीत काम करणारी आहे आणि बॉसच्या रागावर तिने त्याच्या कानाखाली असला आवाज काढला असता तर? अगदी हा प्रश्नदेखील आम्हाला नकोसा वाटतो. थप्पडच्या मागे तिच्या आत आंत जे कंप निर्माण होतात ना ते ‘फिजिकल असल्ट’पुरतेच मर्यादित नाहीत. तिचे आत्मभान जागृत होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते जागे होतपर्यंत ती काहीही अत्याचार सहन करते आणि मग संसार टिकून राहतात. अर्थात, त्याचे श्रेय तिला दिलेही जात नाही.
 
हेन्रिक इब्सेनचे ‘डॉल्स हाऊस’ हे नाटक 1879 साली आले. त्यातली नायिका नोरा तिच्या नवर्‍याच्या घराचे दार थोड्या त्वेषानेच बंद करून निघून जाते. त्या दाराचा आवाज सार्‍या युरोपभर निनादला होता. स्त्रियांना आत्मभान येणे आणि मग व्यक्ती म्हणून लिंगभावाच्या पलीकडे जात तिचे अस्तित्व मान्य करणे, नव्हे, तशी मागणी स्त्रियांनी करणे, त्यासाठी चळवळ उभी राहणे याची सुरुवात तिथून झाली, असे म्हणावे लागेल. अर्थात, इब्सेनने हे नाटक लिहिले, कारण त्या काळात युरोपात सूक्ष्मपणे हा स्त्रीमुक्तीचा विचार स्त्रीविश्वात दरवळू लागला होता.
 
त्या नाटकात नोराचा नवरा हेल्मर हा तिच्यावर निरतिशय प्रेम करतो, असेच आपल्याला दिसत राहते. म्हणजे त्यांचे अत्यंत सुंदर असे घर असते. कशाचीच काही कमी नसते आणि किमान असे दिसते की, तिचा कुठलाच शब्द तो खाली पडू देत नाही. तो तिला ‘माय प्रेटी वुमन’, ‘माय ब्युटी’ असेच म्हणतो. ‘पाय जमिनीवर ठेवू नकोस, तुझे नितळ मुलायम गुलाबी तळवे मळतील ना...’ अशाच तिच्या संदर्भात त्याच्या भावना असतात आणि तरीही एका प्रसंगानंतर त्याची ती प्रेटी डॉल घर सोडून जाण्याचा निर्णय घेते... त्याच्या इशार्‍यावर डोलणारी अन्‌ त्याला डोलवणारी ती असते तोवर सगळेच नीट सुरू असते, मात्र एका ठिकाणी ती आर्थिक निर्णय घेते आणि त्यावर तो नापसंती दर्शवितो. बस! इतकेच घडते. तिला त्या क्षणी जाणवते की, आपण या घरात केवळ एक बाहुली मात्र आहोत. प्रेटी डॉल! त्यापलीकडे आपल्याला अस्तित्व नाही. आपण आपल्या डोक्याने विचार करायचा नाही. आपण सुंदर दिसायचं, त्याला रिझवायचं, नाचायचं, थिरकायचं, त्याने दिलेले सुंदर वस्त्र-दागिने परिधान करून त्याने सांगितले त्या पार्टीत, तो सांगेल तसेच वागायचे. कुणाशी किती, कसे मधाळ बोलायचे- हसायचे हे तो सांगणार नाही, मात्र आपणच ते ओळखण्याचे कौशल्य बाळगले पाहिजे. सगळेच ठीक असेल, पण आपण विचार करायचा नाही. डोके चालवायचे नाही. त्याची आपण डॉल आहोत. लहान मुले जसे त्यांच्या डॉल्स सजवितात, त्यांचे लाड करतात तसेच तो आपलेही करतो; पण... पण, बाहुलीने डोके चालवायचे नसते. मुळात तिला मेंदू आणि मन नसायलाच हवे... स्वत:चे असे ‘बाहुलीकरण’ नोरा नाकारते. नोराच्या निमित्ताने युरोपातला तो पहिला आवाज होता. मग अनेकींना हे जाणवले की आपणही ‘नोरा’ं आहोत. डॉल आहोत. आपलेही घर म्हणजे डॉल्स हाऊस आहे... नेमके हेच तिथल्या पुरुषसत्ताक पद्धतीला नको होते. म्हणून ‘डॉल्स हाऊस’ या नाटकाला विरोध झाला... मात्र, क्रांतीची बीजे या नाटकानं पेरली होती. 
 
त्या तुलनेत ‘थप्पड’ हा खूपच जड विचार करणारा आहे. त्यात नायक झापड मारतो. ‘डॉल्स हाऊस’मध्ये तर हेल्मर तिला हातही लावत नाही. त्या प्रसंगानंतरही तो तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मानसिक आणि बौद्धिक हिंसेचा विचार ‘थप्पड’मध्येही मांडण्यात आला आहे; नव्हे, त्यांना तेच मांडायचे आहे, मात्र त्याची सुरुवात शारीरिक हिंसेपासून होते. अजूनही आपण इतक्या सूक्ष्म आणि तरल पातळीवर जाऊन स्त्रीअस्मिता समजून घेण्याच्या कुवतीचे नाही, हेच ‘थप्पड’च्या निमित्ताने दिसून आले. 
 
‘डॉल्स हाऊस’ हे नाटक इब्सेनने लिहिले तेव्हा आपल्या देशातल्या सामाजिक स्थितीचा अंदाज यावा म्हणून इकतेच बघावे लागेल की, त्या वेळी उत्तर पेशवाईचा काळ होता. स्त्रिया सती जातच होत्या. सामाजिक चळवळी सुरू झाल्या होत्या, मात्र त्या जाती, धर्माच्या पलीकडे जाऊन माणसाचा माणूस म्हणून विचार करण्यासाठी होत्या. स्त्रियांना माणूस म्हणून बघण्याचा विचारही समाजप्रवाहात प्रवाहित व्हायला सुरुवात झालेली नव्हती फारशी. त्या काळात ‘डॉल्स हाऊस’च्या निमित्ताने तिकडे स्त्रीला व्यक्ती म्हणून स्वीकारण्याची वैचारिक ठिणगी पडली होती. आता आपण या काळात थप्पडही नीट पचवू शकत नाही.
  
‘डॉल्स हाऊस’वर भारतात अन्‌ मराठीत नाटके आलीत. कुलवधू, घराबाहेर ही नाटके एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात आलीत, मात्र त्यातल्या नायिका घर सोडून जातात, हे लिहिण्याचे धाडस लेखकांना झाले नाही. ‘कुलवधू’ची नायिका नवर्‍याला सोडते, मात्र ती गावी सासू-सासर्‍याची सेवा करायला जाते. माहेरी जात नाही किंवा स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याचा निर्णय घेत नाही. ‘बाहुली घर’ हे राजीव नाईकांचे नाटक नंतरच्या काळात आले. त्यातली नायिका घर सोडते. संसार मोडते.
  
कुटुंब संस्था टिकली पाहिजे. घटस्फोटांचे प्रमाण युरोपात वाढले तितके ते आपल्या देशात वाढू नये, आपला देश भक्कम तटबंदी असलेल्या कुटुंब संस्थेसाठी ओळखला जातो. आदरणीय अशीच ही स्थिती आहे, हे नक्की. मात्र, ही कुटुंब संस्था सुदृढ आहे, सुंदरच आहे, असे म्हणू नये. स्त्रियांच्या शोषणावर ती अतूट तर नाही ना, हा विचार आपण करायला हवा. तिने संयम ठेवावा, तिने सहन करावे, यावरच हे टिकून राहणे नको. भक्कम तटबंदीच्या आत तीदेखील व्यक्ती म्हणून भक्कमच असायला हवी. त्यासाठी पुरुषांचे समुपदेशन आवश्यक आहे. तिचे व्यक्ती म्हणून स्वातंत्र्य मान्य करून, त्याचा पूर्ण स्वीकार करून सुरुवात केली तर ती मुळातच मृदू, संयमी आहे. थप्पडच्या निमित्ताने इतकेच भान यावे की, आत्मभान आलेल्या स्त्रियांसोबत संसार करण्याचे संस्कार पुरुषांवर केले जावे. माणूस म्हणून तुम्हाला असतात ते सगळेच अधिकार तिलाही आहेत, या तत्त्वाचा पूर्ण स्वीकार केल्यावरच आपले घर ‘डॉल्स हाऊस’ राहणार नाही!