तुकडोजी महाराजांच्या प्रार्थनेचे महत्त्व आणि सामुदायिक प्रार्थना

    दिनांक :21-Mar-2020
|
‘प्रार्थना’ हा ईश्वरभक्तीचा साधा, सोपा मार्ग आहे. राष्ट्रसंतांनी प्रार्थनेचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की,
 
कलियुगी भक्ती महिमान । भजन आणि संकीर्तन ।
यज्ञात श्रेष्ठ नाम जपयज्ञ । प्रार्थनेत आले ते सारे ।
मूर्ति उपासना आणि ध्यान । नवविधा भक्तीचा सार पूर्ण ।
प्रार्थनी सर्वचि साधेसाधन । सर्व जनांसि ।। 
(ग्रामगीता अ-27. ओ-93, 94)
 
भक्तीच्या सर्वच साधनांमध्ये प्रार्थना हे श्रेष्ठ साधन आहे. कारण त्यत इतर सर्वच साधनांचा समावेश होतो आणि सर्वांसाठी प्रार्थना हे सहज येण्याजोगे साधन आहे. प्रार्थनेसंबंधी महाराज म्हणतात,
 
प्रार्थना मानव्या शिक्षणाची शाळा । ग्रामसंस्कृतीचा मुख्य जिव्हाळा ।
भेद कल्पना जातो रसातळा । प्रार्थनेच्या मुशीमाजी ।।
(ग्रामगीता अ-27, ओ-96)
 
प्रार्थना केवळ पापक्षालनासाठी िंकवा व्यक्तिगत उत्कर्षासाठी महाराजांना अपेक्षित नव्हती तर प्रार्थनाही व्यक्तीनिष्ठतेकडून समूहनिष्ठेकडे घेऊन जाणारी असावी, मानव्याच्या शिक्षणाची ती शाळा असावी, सामुदायिक प्रार्थनेची संकल्पना मांडून महाराजांनी गावाचे एकीकरण घडवून आणण्याची प्रक्रिया प्रारंभ केली.
 
 
maha_1  H x W:
 
सामुदायिक प्रार्थनेची संकल्पना स्पष्ट करताना महाराज म्हणतात, सामुदायिक प्रार्थना म्हणजे सर्वांनी एक होऊन आपल्या आदर्शानुसारी भाव सर्वशक्तीमान अशा प्रभूजवळ मांडण्याची एक मानवोचित पद्धती ! मानसिक शक्ती व शांती मिळविण्याची एकमव उत्कृष्ट कवायत ! साधारण भौतिकशास्त्र मान्य अशा शारीरिक कवायतींपेक्षाही अतिदक्षतेची ही कवायत आहे. ती भौतिक कवायत फक्त बाहेरच दाखवायची असते, परंतु सामुदायिक प्रार्थनेची कवायत अंतरंग व बहिरंग अत्यंत स्वच्छ व सरळ ठेवून करावयाची असते.
 
 
 
सामुदायिक प्रार्थनेचे उद्देश, आवश्यकता, कार्यपद्धती, वैशिष्ट्ये, तात्त्विकस्वरूप या सर्व विषयांवर राष्ट्रसंतांनी ‘विश्वशांतीयोग’ या ग्रंथामध्ये सविस्तर मार्गदर्शन केले आहे. सामुदायिक प्रार्थनेचे उद्देश स्पष्ट करताना ते ‘सामुदायिक प्रार्थना’ फक्त मेल्यावर मोक्ष मिळवून घेण्याकरिता करावयाची नसून सामुदायिकत्व प्राप्त करून देण्यासाठी नि सामूहिक धर्माची ज्योत मनुष्यमात्रांत जागवण्यासाठीच करावयाची आहे.
 
 
 
त्यामळे आपसातील पृथगात्मकता दूर करून संघटित होणे, सर्वांनी आपापल्या धर्माची ज्योत तेवत ठेवून परस्परांविषयी बंधूभाव बाळगणे, तत्त्वज्ञानाला विशिष्ट धर्म, संकुचित संप्रदाय िंकवा जातीमध्येच आकुंचित न ठेवता त्याचे यथार्थ ज्ञान अफाट विश्वरूपाचे डोळ्यांनी व तत्त्वदृष्टीने दर्शन करून देणे, नित्यक्रम प्रार्थनेचा पाठ देण्याचा उत्साह लोकांना देणे आवश्यक आचारधर्म लोकांसमोर ठेवणे, तरुणांमध्ये पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून व्यसनांचे आकर्षण, धर्माबद्दल अनास्था, नम्रतेचा व शिस्तीचा अभाव यासारखे आलेले दोष दूर करण्यासाठी त्यांच्यासमोर वेदान्त तत्त्वाची उच्चतम विचारसरणी ठेवणे, अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन होण्यासाठी स्पर्शभावाने सामदायिकत्वात त्यांना सामिल करून घेणे. या सर्व व्यापक उद्देशांच्या पूर्तीसाठी सामुदायिक प्रार्थना आहे, असे राष्ट्रसंतांनी स्पष्ट केले आहे.
 
 
 
त्यामुळे घरोघरी एकट्याने केल्या जाणार्‍या पूजाअर्चा व प्रार्थनेपेक्षा लाखोपटीने अधिक महत्त्व सामुदायिक प्रार्थनेस आहे, असे ते म्हणतात. सामुदायिक प्रार्थनेचे आराध्य कोणते असावे, याबाबतीतही महाराजांची व्यापक दृष्टी पहावयास मिळते. प्रत्येकाच्या मनातील त्याच्या आराध्य देवतेविषयीचा श्रद्धाभाव कायम ठेवून महाराजांनी आराधनेसाठी ‘श्रीगुरुदेव’ या रूपाची निवड केली. महाराज म्हणतात,
मी जरी ‘गुरुदेव माझा’ म्हटला । तरी तो नव्हे माझाचि भला ।
तो सर्व प्राणिमात्रांचा झाला । कल्याणकारी ।
त्यास नाही पंथ पक्ष । सर्व देशी तो सर्वसाक्ष ।
सर्व देवादिकांचा अध्यक्ष । सद्गुरूराजा ।
(ग्रामगीता अ-27, ओ-28,29)
सद्गुरू हे प्रतीकरूप असून, ज्या ठिकाणी सामुदायिक प्रार्थना करायची त्या ठिकाणी कोणतीही प्रतिमा असणार नाही, सर्वांसमोर एक अधिष्ठान असावे यासाठी शुभ्र खादीचे आच्छादन असलेले आसन व त्यावर सुंदर तकिया ठेवलेला असावा. जणुकाही त्यावर कोणीतरी विराजमान झाले आहे आणि मूर्तिचीच आराधना करावी असे जर एखाद्याच्या मनात असेल तर त्याने श्रीगुरुदेवांच्या अधिष्ठानावर आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या आराध्य देवतेची कल्पना करावी. सर्व देव गुरुदेवांमध्ये सामावले आहेत आणि सर्व भक्त मानवता मंदिरात प्रार्थनेसाठी एकत्र आले आहेत. असे झाले तर गावच स्वर्ग हाईल, बंधुभाव वाढेल, गावातच काय संपूर्ण विश्वात शांतता निर्माण होईल, असा विश्वास महाराज व्यक्त करतात.
 
डॉ. सतपाल सोवळे
77199 18982