देव देवळात अन्‌ मनुष्य घरात बंद...

    दिनांक :22-Mar-2020
|
गजानन निमदेव
 
 
सध्या संपूर्ण जग दहशतीत आहे. मनुष्यजातीवर पहिल्यांदाच एवढे भीषण संकट ओढवले आहे. कशाची आहे दहशत आणि कोणते आहे संकट? ‘कोरोना’ नावाच्या एका छोट्याशा व्हायरसची ही दहशत आहे आणि मृत्यूचे भीषण संकट आपल्यापुढे उभे ठाकले आहे. जगातल्या जवळपास 170 देशांना या संकटाने ग्रासले आहे. चीनपासून सुरू झालेले हे संकट आता वैश्विक झाले आहे. त्यापासून स्वत:चा बचाव करण्याचे मोठे आव्हान मनुष्यापुढे आहे. मनुष्याने स्वत:च निर्माण केलेले कोरोना व्हायरसचे भूत मानगुटीवरून उतरवण्याचे हे आव्हान पेलण्याची ताकद मनुष्यात आहे का, हे येणार्‍या काळात दिसेलच. हे जे संपूर्ण ब्रह्मांड आहे ना, त्यात मनुष्यजीवन प्राणिमात्रांसह कुठे उत्तम रीत्या फुलले असेल, तर ते या आपल्या पृथ्वीवर फुलले आहे. अन्य ग्रहांवर जीवसृष्टी आहे का, याचा खुलासा अजूनतरी झालेला नाही. पण, गेल्या हजारो वर्षांपासून पृथ्वीवर मनुष्यजीवन समृद्ध झाले आहे, प्राणिमात्रांचीही समृद्ध सोबत मनुष्याला लाभली आहे.
 
 
मनुष्यजातीवर यापूर्वीही अनेक संकटे आलीत आणि त्यावर मात करण्यातही मनुष्य यशस्वी ठरला. शतके उलटली आहेत, पण मनुष्यजीवन सुरळीत चालू आहे. पण, आज कुठेतरी या सुरळीत जीवनात अस्थैर्य निर्माण झाले आहे, मनुष्यजातीला मोठा धोका निर्माण झाला आहे. अस्तित्वावरच संकट ओढवले आहे. त्यामुळे शतकांपासून पृथ्वीवर असलेले मनुष्यजीवन यापुढेही सुरळीत राहील का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे. मनुष्यजातीच्या अहंकाराने डोके वर काढले असतानाच तो ठेचून काढण्यासाठी तर हे संकट उभे ठाकले नसेल ना? शंका आहेच. मनुष्याने मंगळावर यान पाठवले, मनुष्य चंद्रावर जाऊन आला. वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीचे प्रदर्शन घडविण्यासाठी असंख्य उपग्रह अंतराळात सोडलेत. अफाट अशी भौतिक प्रगती साध्य केली. सर्व प्रकारच्या अडथळ्यांवर मात करीत मनुष्यजीवन प्रगतीच्या शिखरावर येऊन पोहोचले असताना, निसर्गाने आता किमया दाखवण्यास सुरुवात केली आहे. म्हणूनच पृथ्वीवरील ही जीवसृष्टी यापुढेही अशीच कायम राहील का, या गंभीर प्रश्नाची उत्तरे मात्र भयंकर आणि भीतिदायक असतील, अशी शंका आता वाटायला लागली आहे. 

dev_1  H x W: 0 
 
 
चीनमध्ये तयार झालेला कोरोना व्हायरस सध्या संपूर्ण ताकदीने आणि क्षमतेने मनुष्यजातीवर तुटून पडला आहे. चीनकडून जैविक अस्त्रे तयार केली जात असल्याच्या बातम्या येत असताना चीनच्या हेतूबाबतही वेगळी शंका निर्माण झाली आहे. काहीही असो, चीनचे षडयंत्र असो की निसर्गाची वक्रदृष्टी, कोरोनाने संपूर्ण जग आपल्या कवेत घेतले आहे. इटलीसारख्या अतिप्रगत देशात आतापर्यंत तीन हजार लोक या व्हायरसच्या संसर्गामुळे प्राणास मुकले आहेत. सर्व प्रकारची भौतिक प्रगती झालेली आहे, सर्व प्रकारच्या सुविधांनी मनुष्यजीवन सुखी-समृद्ध आहे, असे असतानाही इटलीत लोक पटापट मरत आहेत आणि विज्ञान-तंत्रज्ञान मुकाटपणे मृत्यूचे हे तांडव पाहात आहे, याचा विचार करता संकट किती गंभीर आहे, हे आपल्या लक्षात येईल. स्वत:ला जागतिक महाशक्ती म्हणविणार्‍या अमेरिकेलाही कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. तिथेही शंभरावर लोकांचे प्राण या महाघातक कोरोनाने घेतले आहेत. संपूर्ण जगात लवकरच टाळेबंदी लागू होईल, लोक घराबाहेर पडूच शकणार नाहीत, अशी स्थिती ओढवली आहे. भारतात कोरोनाचे सर्वाधिक संशयित आणि संसर्ग झालेले रुग्ण महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आहेत. नागपूर, पुणे, मुंबईसारख्या महानगरांमध्ये अनेक प्रकारचे निर्बंध लागू करावे लागले आहेत.
 
 
देवालाही देवळात एकटे ठेवण्याची वेळ या कोरोनाने आणली आहे. शिर्डी, शेगाव, प्रभादेवी, तुळजापूरसह राज्यातली सगळी प्रमुख मंदिरं भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत. देवानेच दर्शन देण्यास नकार दिला, असे तर नव्हे! देव का म्हणून नकार देईल? आम्ही तर देवाचे नित्यनियमित दर्शन घेतो, देवासमोरच्या दानपेटीत भरभरून दान टाकतो, देवाची कायम स्तुती करतो. मग देवाचा कोप आमच्यावर होईलच कसा, असा प्रश्नही कुणी विचारू शकतो. पण, देवाने दिलेल्या बुद्धीचा दुरुपयोग करून आम्ही ब्रह्मांडावर विजय मिळविण्यासाठी जी अहंकारी वृत्ती विकसित केली आहे, तीच आता आमच्या मुळावर उठली आहे, हे आम्ही लक्षात घ्यायलाच तयार नाही.
 
 
देव देवळात बंद होतो आहे, माणसं घरात बंद केली जात आहेत, मृत्युमुखी पडलेल्या माणसांच्या पार्थिवांवर अन्त्यसंस्कार करण्यासही भीती वाटत आहे, ही स्थिती कशाची निदर्शक मानली पाहिजे? चीनमध्ये तर कोरोनाने मेलेल्या लोकांना कुठे जाळले जात आहे, हे त्यांच्या नातेवाईकांनाही माहिती होत नाही. प्रगत अशा इटलीतही अशीच परिस्थिती आहे. कुणी कल्पना केली होती कधी की अशी विचित्र, दुर्दैवी परिस्थिती आपल्यावर ओढवेल म्हणून? पण, ओढवली हे वास्तव आहे. कोरोना व्हायरस हा मानवनिर्मित आहे आणि हा नियंत्रणात आला नाही, तर जगातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या नजीकच्या काळात काळाच्या उदरात गडप झालेली दिसेल, एवढे भयंकर संकट माणसाने ओढवून घेतल्याची चर्चा सगळीकडे ऐकायला मिळते आहे.
 
 
या भूतलावर जे मनुष्यजीवन आहे, त्याला मोठा धोका निर्माण झाल्याची आणि हा धोका वाढतच चालला असल्याची एक घोषणा डिसेंबर 2019 मध्येच करण्यात आली होती. धरतीवरील जीवसृष्टीला असलेला महाविनाशाचा धोका कैक पटींनी वाढला असल्याचा एक अंदाज ‘द बुलेटिन ऑफ द अॅटोमिक साईंटिस्टस’ने वर्तवला होता. असा अंदाज व्यक्त केला जाण्यामागे कारणही आहे आणि आधारही होता. कोरोना व्हायरस हे त्यामागचे कारण वा आधार नव्हता; तर उत्तर कोरिया, रशिया, पाकिस्तान, अमेरिकादी देशांकडे असलेला अण्वस्त्रसाठा हा आधार होता आणि आहे. अनेक देश विकसित झालेत असे आपण बोलतो. कशाचा विकास केला या देशांनी? मनुष्यजीवनाचा की संहारक शस्त्रास्त्रांचा? मनुष्याने महाविनाशकारी शस्त्रास्त्रे विकसित केली आहेत. तीच शस्त्रास्त्रे मनुष्यजीवनावर घाव घालतील तो दिवस फार दूर नाही, असे एक भाकीतही गतकाळात करण्यात आले होते. खोट्या बातम्या ऑडिओ-व्हिडीओच्या माध्यमातून पसरविल्या जात आहेत, अवकाशातही सैनिकी ताकद व क्षमता वाढविण्याचे अनाठायी प्रयत्न केले जात आहेत. पण, कोरोनासारख्या अतिशय छोट्या पण महाघातक अशा व्हायरसने जगाला हे दाखवून दिले की, मनुष्यजातीचे छोटेसेही दुर्लक्ष किती महागात पडू शकते ते. थोडासा बेजबाबदारपणा किती भारी पडू शकतो, हेही कोरोनाने मनुष्याला दाखवून दिले आहे.
 
 
कोरोना व्हायरसने जणू जगाला पराभूत केल्यासारखी स्थिती उत्पन्न झाली आहे. संपूर्ण जग या छोट्याशा व्हायरसपुढे हतबल झाले आहे. कोणतेही औषध यावर अजूनतरी विकसित झालेले नाही. केवळ प्रतिकारक्षमता वाढविणे, हा एकमेव इलाज यावर दिसतो आहे. मनुष्यजीवनाला जो धोका निर्माण झाला आहे ना, त्यासाठी मनुष्यजातच जबाबदार आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. हा अतिशय भयंकर संक्रामक व्हायरस चीनमध्ये तयार झाला, याबाबत शंका राहिलेली नाही. या विषाणूचा जन्म कसा झाला, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. चीनच्या वुहान प्रांतात असलेल्या जैविक अस्त्र बनविण्याच्या प्रयोगशाळेत झाला, की चिनी लोक साप आणि वटवाघुळाचे मांस खातात, तिथून हा जन्माला आला, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. संशयाची सुई तर चीनकडेच आहे. पण, ठोस पुराव्यांअभावी थेट आरोप करता येणे अशक्य आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात ‘चिनी व्हायरस’ असा कोरोनाचा उल्लेख केल्याने चीन संतापला होता, हे जगाने पाहिले आहे. चीनच्या वुहान प्रांतातील प्रयोगशाळेत तसेही नियमितपणे अतिशय घातक अशा विषाणूंवर प्रयोग केले जात असतात. त्यामुळे कोरोनाच्या बाबतीत चीनच्या हेतूवरही शंका उपस्थित केली जात आहे.
 
 
चीन ही बाब मान्य करेल याची कोणतीच शक्यता नाही. जैविक शस्त्रे तयार करण्याच्या चीनच्या योजनेतूनच कोरोना हा अतिशय घातक विषाणू तयार झाल्याच्या बातम्या जगभरातील मीडियाने आतापर्यंत दिल्या आहेत, हे लक्षात घेतले तर प्रत्येक गोष्ट स्पष्ट होईल. जगभरातील मीडियाचा चीनवरच संशय आहे. वुहान प्रांतात जेव्हा न्यूमोनियाचा पहिला प्रकार समोर आला होता, तेव्हा चीनचे उपराष्ट्रपती गुपचूप वुहानमध्ये पोहोचले होते. त्यामुळेही संशयाची सुई चीनकडेच जाते. उपराष्ट्रपती हे, जैविक शस्त्रास्त्रे तयार करण्याच्या कामात किती प्रगती झाली आहे, हे पाहण्यासाठी गेले होते, असे म्हणतात. चीनने तर कोणताच खुलासा वा स्पष्टीकरण केलेले नाही. त्यामुळे संशय चीनवर कायम आहे आणि राहील. कोरोना व्हायरस हा वुहान प्रांतातील चिनी पी-4 प्रयोगशाळेततच तयार केला गेला, असा दावा इस्रायलच्या मिलिटरी इंटेलिजन्सच्या माजी अधिकार्‍याने केला आहे. हा दावा जागतिक महाशक्तींनी तपासून पाहण्याची गरज आहे.
 
 
कोविद-19 अर्थात कोरोना हे जैविक शस्त्र तयार करण्यात चीनची भूमिका असेलही. पण, त्याबाबत ठोस पुरावे कुणाकडेच उपलब्ध नाहीत. मात्र, गेल्या दोन दशकांत जे विषाणू जगभरात पसरले आहेत आणि त्यामुळे जी मनुष्यहानी झाली आहे, त्याला जबाबदार बाह्य कुठलाही घटक नसून मनुष्यच जबाबदार आहे, हे मान्य करावे लागेल. याचाच दुसरा अर्थ असा की, सध्या कोरोनामुळे जी मनुष्यहानी होत आहे, तिलाही मनुष्यच जबाबदार आहे. मानवाने महासंहारक अशी अण्वस्त्रे विकसित केली आहेत आणि नैसर्गिक साधनसंपदेचे वारेमाप शोषण करून, मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करून जलवायुपरिवर्तन घडवून आणले आहे, ज्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे मनुष्यजीवन हे स्वत:च निर्माण केलेल्या अण्वस्त्रांमुळे वा मग जलवायुपरिवर्तनामुळे निर्माण झालेल्या समस्येमुळे संपुष्टात येईल, ते आज येईल की उद्या, हे येणारा काळच सांगेल. मात्र, भूतलावरील जीवसृष्टीला आम्हीच धोका निर्माण केला आहे, हे विसरता यायचे नाही.
 
 
सध्या मनुष्यजातीला जो धोका निर्माण झाला आहे, तो विषाणूंच्या हल्ल्यामुळे दिसतो आहे. यात कोविद-19 अर्थात कोरोना हा सध्याच्या स्थितीत सर्वाधिक घातक विषाणू सिद्ध ठरत आहे. गेल्या दोन दशकांमधील घडामोडींवर नजर टाकली असता आपल्या असे लक्षात येईल की, विविध प्रकारचे विषाणू मनुष्याच्या जिवावर उठले आहेत. कधी बर्ड फ्लू येतो, कधी स्वाईन फ्लू येतो, कधी चिकनगुनिया येतो, तर कधी डेंग्यू धुमाकूळ घालतो. हे सगळं मानवनिर्मितच आहे. अन्य कुणाला दोष देण्याची आवश्यकता नाही. गतकाळात जेव्हा स्पॅनिश फ्लूचा संसर्ग झाला होता, तेव्हा 12 कोटी लोकांचे प्राण गेले होते. पण, गेल्या दोन दशकांत जे विषाणू आले आहेत, त्यांनी जगाला हैराण केले आहे. जेव्हा स्वाईन फ्लू आला होता, त्यानंतर लागलीच इबोला नावाचा विषाणू आला होता. त्याचीही प्रचंड दहशत होती. एका विषाणूची दहशत संपत नाही तोच दुसरा येतो, तिसरा येतो आणि मनुष्यजातीला दहशतीत ठेवतो. जर आम्ही आमच्या सवयी बदलल्या नाहीत, तर कोरोना वा कोरोनासारखा अन्य आणखी आला तर तो आमचे अस्तित्व संपवून टाकेल, हे लक्षात घेतले पाहिजे. कोरोनाचे विद्यमान संकट हे केवळ मनुष्याच्या जिवावरच उठले आहे असे नव्हे, तर जागतिक अर्थव्यवस्थाही त्याने खिळखिळी केली आहे. आज होत असलेली प्राणहानी कधीही भरून न निघणारी आहे आणि जी वित्तहानी होत आहे, तिचा दुष्प्रभावही पुढली कित्येक वर्षे आम्हाला सहन करावा लागणार आहे.
 
 
कोरोनापासून बचाव करण्याची भारतीयांना अजूनही संधी आहे. भारतात अजूनही संशयित रुग्णांची संख्या फार मोठी नाही. त्यामुळे हा संसर्ग नियंत्रणात आणणे आपल्या हाती आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी आवाहन केल्याप्रमाणे आम्ही सर्व त्या सूचनांचे पालन केले, सार्वजनिक जागी एकत्र होण्याचे टाळले, तर कोरोनाची साथ आटोक्यात राहण्यात मदतच होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशवासीयांना उद्देशून संबोधन केले. त्यात त्यांनी जे आवाहन केले ते फार महत्त्वपूर्ण आहे. काम नसेल तर लोकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. स्वत:ला आपल्याच घरात कोंडून घ्यावे. मोदींनी याला ‘जनता कर्फ्यू’ असे नाव दिले आहे. जनतेने स्वयंस्फूर्तीने रविवार, दि. 22 मार्च रोजी म्हणजे आज सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत घराच्या बाहेरच पडायचे नाही. काय कठीण आहे आपल्यासाठी या आवाहनाला प्रतिसाद देणे? पंतप्रधानांचे आवाहन हे जनहितार्थ असल्याने सर्वांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे, यातच आपले हित आहे. ग्लोबल वॉर्मिंगला आम्हीच जबाबदार आहोत, अण्वस्त्र स्पर्धेलाही आम्हीच जबाबदार आहोत, आताच्या कोरोनाच्या उद्रेकालाही आम्हीच जबाबदार आहोत, ही एक बाब जरी मान्य केली तरी आपल्याला उपरती झाली, असे मानता येईल.
Appeal