मिलन वसुंधरेचे...

    दिनांक :22-Mar-2020
|
मृणाल भगत-दुर्गेे
 
सर्वत्र तिमिराचे साम्राज्य पसरत होते. सहस्रांशु अस्तांचलाला जाताना आपल्या कवेत तिमिराला सामावून घेत होता. पश्चिमेला मावळत्या रविकिरणाचे कोमल रूप नेत्रांमध्ये साठवत त्या वसुंधरेच्या मिलनासाठी आतुर असलेला सहस्ररश्मी त्या चारुगात्रीला क्षितिजाच्या वर असूनही दूरस्थ वाटत होता. 

wasundhar_1  H  
 
 
मिहिराच्या अस्तांचलाने संपूर्ण सृष्टीच जणू तिमिरमय जाणवत होती. त्या भानूच्या जाण्याने जणू ही चारुशिला लटक्या रागात आपले गाल फुगवून एखाद्या अल्लड बालिकेप्रमाणे रुसून बसलेली जाणवते आहे.
 
 
परंतु, निशासमयाचीसुद्धा प्रतीक्षा करणारा शीतभानू तिच्या मिलनाच्या प्रतीक्षेत आहे, हेही त्या वसुंधरेला तो दिसला तेव्हा जाणवले. तिचा लटका राग एखाद्या प्रियकराने आपल्या प्रेयसीला आपल्या बाहुपाशात घेऊन दूर करावा तसाच त्या चारुशिलेला स्पर्श करताच आपल्या मौनातून अंतरीचे भाव व्यक्त करत होता. शशिकराचा स्पर्श होताच त्याचे लोभस रूप बघताच वसुंधरेचा लटका रुसवा तिथल्या तिथेच गळून पडला.
 
 
निशासमयी निरभ्र नभात तो हवाहवासा वाटणारा चंद्रमा, त्याच्या मिलनासाठी आतुर असलेली चारुशिला, परंतु तिचं सर्वांग जणू तिने त्याच्या मिलनासाठी आतुर असतानासुद्धा एक अपरिमित, प्रथम मिलनात असते तशी भीती, संकोच, लज्जा त्या लावण्यवती वसुंधरेला जाणवत होती. तो निशाकर मात्र आपल्या बलाढ्य बाहुपाशात तिला सामावून घेण्यासाठी जणू एक निमिषसुद्धा त्याला युगासारखा वाटत होता. लावण्यलतिका वसुंधरा मात्र आपल्या भावना व्यक्त कशा कराव्या, अशा विचारात असताना त्या विभावरीचा (रात्रीचा) निमिष निसटून जात होता. परंतु, तिला तो चंद्रमासुद्धा आपल्या समीपच हवा होता जणू!
 
शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातूनी
चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातूनी
आज तू डोळ्यात माझ्या
मिसळुनी डोळे पाहा
तू असा जवळी राहा।
मी कशा शब्दांत सांगू
भावना माझ्या तुला...
 
 
अशाच काहीशा भावना ती वसुंधरा त्या चंद्रमाला सांगत आहे. शर्वरीच्या (रात्रीच्या) निरव शांततेत आपल्या हृदयाच्या अंतरीचे भाव व्यक्त कसे करायचे, या मनोतर्कात गुंग झालेली वसुंधरा, काही न बोलताही अबोलपणे त्या शीतभानूला तिच्या डोळ्यांतील त्याच्यासाठी असणारी प्रीत त्याला जाणवते.
 
 
क्षणाक्षणाला वसुंधरेच्या हृदयाची स्पंदनं वाढत होती आणि तो चंद्रमा तिला आपल्या बाहुपाशात घेण्यासाठी आतुर झाला होता. त्याचा तो हळुवार, अलगद स्पर्श वसुंधरेला रोमांचित करीत होता. अखेरीस आपले सर्वांग त्या शीतभानूच्या कवेत अलगद झोकून देत त्या चारुशिलेने चंद्रमाची प्रतीक्षा संपुष्टात आणली आणि ती तमस्विनी (रात्र) कधीच संपू नये, असे त्या चारुगात्रीला वाटत असतानाही अखेर त्या मिहिराची चाहूल लागताच तिला मात्र भावविभोर होऊन जडवत पावलांनी त्याचा निरोप घ्यावाच लागला. विस्तीर्ण आकाशातील त्या चंद्रमाचे रूप आपल्या नजरेने मनात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करीत अश्रुभरल्या नेत्रांनी त्या वसुंधरेने शीतकराचा निरोप घेऊन तमोहराच्या (सूर्याच्या) स्वागतासाठी सज्ज झाली...
Appeal