नावात बरेच काही असते

    दिनांक :22-Mar-2020
|
संजीव लाभेे
 
कोणत्याही गोष्टीला एकदा आपली मानल्यानंतर, म्हटल्यानंतर त्या गोष्टीची प्रत आणि प्रतिष्ठा सांभाळणे, सौंदर्य जपणे ही आपली स्वाभाविकच महत्त्वाची जबाबदारी ठरते. मातृभाषेला माणसाच्या जीवनामध्ये माता आणि मातृभूमी इतकेच महत्त्वाचे स्थान असते. त्यामुळे मराठीची जपणूक सर्व दृष्टिकोन करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे प्राथमिक कर्तव्य ठरते. त्यात योग्य तेच बोलणे व योग्य तेच लिहिणे आवश्यक असते. कारण तुमचे ऐकून व पाहून अन्य व्यक्ती वा पुढील पिढ्या भाषा शिकत असतात. महाराष्ट्राच्या ज्या भागात मोठी माणसे ‘ळ’ चा उच्चार ‘ड’ किंवा ‘य’ सदृश करतात, तिकडची मुलंपण तसाच उच्चार करतात व मग पिढ्यान्‌ पिढ्या तेच उच्चार कायम होतात व मग तेच योग्य/ बरोबर वाटू लागतात. ही एका पिढीने कळत न कळत केलेली भाषेची अप्रतिष्ठाच असते, म्हणून प्राथमिक स्तरावर (वय 1 ते 14) भाषेची योग्य ती पायाभरणी होणे आवश्यक असते.
 
There is a lot in the nam
 
 
प्रारंभ आपण आपल्या नावापासूनच करावा. आपण आपले नाव योग्य उच्चारावे व योग्यच लिहावे. यात र्हस्व, दीर्घ बघावे. समजावे, सांभाळावे तसेच ‘र’फार अनुस्वार, ऋकार हेही समजून घ्यावे. अनेक लोक ‘हृषीकेश’ लिहायचे तर त्या जागी ऋषिकेश लिहितात. हृषीकेश या शब्दाची उकल हृषीक + ईश अशी आहे. हृषीक = ज्ञानेन्द्रिय आणि ईश = ईश्वर. ज्ञानेंद्रियांचा ईश्वर म्हणजे हृषीकेश. हे भगवान विष्णूूंच्या अन्वर्थक गुणानामांपैकी एक आहे; पण, बरेच लोक ‘ऋषिकेश’ असा काहीसा निरर्थक उच्चार करतात. फारच फार त्याचा अर्थ ‘ऋषीचे केस’ असा करता येईल; पण हे एखाद्या मुलाचे नाव असू शकते का? काही लोक ‘दामोधर’ असे नाव लिहितात. हे नाव निरर्थक व चूक आहे. मूळ नाव दामोदर असे आहे. त्याची उकल दाम + उदर अशी आहे. दाम म्हणजे पातळ व उदर म्हणजे पोट. ज्याचे ओट इतके पातळ आहे की सामान्यपणे त्यावर तीन वळ्या पडतात. व्यंकटेश स्त्रोतात ‘उदरी त्रिवळी शोभे गहन’ असे व्यंकटेश म्हणजे विष्णूचे वर्णन केले आहे. लंबोरच्या अगदी विरुद्ध दामोदर आहे. तेही भगवान विष्णू/कृष्ण यांचे सौंदर्य वर्णन करणारे एक गुणवाचक आहे. ज्याचा वक्षप्रदेश विशाल, सुगठित असून कंबर बारिक व पोट पातळ आहे. तो दामोदर आहे. हा अर्थ ना नाव ठेवणार्‍यांना माहित ना, ना हाक मारणार्‍यांना! ना ते नाव ज्यांचे आहे त्याला. आपले आयुष्य ‘धकाव रे श्यामराव’ या शैलीत चालले असते. म्हणून आपण सर्व खपवून घेतो. काय होतेऽ? असा आपला प्रतिप्रश्न असतो. आपल्या या सहज कृतीतून आपण आपल्या मातृभाषेला बोचकारतो, विद्रुप करतो, तिचे मूळ सुंदर व सोज्वळ असलेले रुप बिघडवतो हे आपल्या लक्षात येत नाही किंवा आपण ते लक्षात घेत नाही. थोडक्यात आपण मराठी विषयी गंभीर नाही.
 
 
मुलींचेच पाहा नं? नीला, शीला, लीला हे शब्द दीर्घ ईकार असलेले आहेत त्यातून नीलांबरी, सुशीला, लीलया हे शब्द तयार होतात; पण बरेच लोक निला, शिला, लिला लिहितात. अनूसया हा शब्द अर्थाचे दृष्टीने फार सुंदर आहे. असूया म्हणजे मत्सर हा एक दुर्गुणच आहे. हा ज्या स्त्रीचे ठिकाणी मुळीच नाही ती ‘अनूसया’ आता बर कोणी हे नाव ठेवतच नाही पण पूर्वी सगळे ‘अनुसया’ म्हणायचे. अनुसया हा शब्द निरर्थक आहे; पण ऐकून ऐकून ‘पिछे से आयी, आगे चली गयी’ या या नासाने लोक चुकीचे शब्द म्हणत राहतात. दुसरा शब्द आहे ‘उज्ज्वला’ याची उकल उत्‌ + ज्वला अशी आहे. उत्‌ म्हणजे वर ज्वला म्हणजे ज्वाला. आता संधी होताना पहिल्या शब्दातील ‘त्‌’चा ‘ज्‌’ होतो. तसेच ‘उज्ज्वल’ लिहायला, वाचयला हवे. तरीही सर्रास उज्वला उज्वल असे लिहितात. तसेच कीर्तीचे! हा शब्द कीर्त म्हणजे गुणवर्णन या अर्थाने येतो. त्यापासून कीर्तन शब्द झाला आहे. म्हणून कीर्ती-दीर्घ ईकार आहे. ते ‘किर्ती’ लिहितात, तसेच श्यामा, श्यामला लिहायला हवे. श्याम म्हणजे संध्यारंग म्हणजे सावळा वर्ण. त्यापासून श्यामला किंवा श्यामा हे शब्द तयार झालेत; पण लोक शाम, शामला, शामा असे लिहितात. श्रृत म्हणजे ऐकलेले. त्यावरून श्रृती म्हणजे ऐकलेले गीत किंवा मंत्र वगैरे. वेदांसाठी हा शब्द वापरतात. संगीता मध्ये ‘गी’ दीर्घ आहे कारण गीत. संगीत-संगीता अशी ती रचना आहे. लोक संगिता लिहितात. तसेच ‘मनीषा’मध्ये नी दीर्घ लिहायचा. ‘सुनीता’मध्ये नी दीर्घ लिहायचा. वीणा मध्ये वी दीर्घ, प्रीतीमध्ये प्री दीर्घ, लीना मध्ये ली दीर्घ, दीपा, दीपाली, दीपिका- ‘दी’ दीर्घ हवा. शीतल ‘शी’ दीर्घ संजीव-संजीवनी- जी दीर्घ, मंजूषा, पूजा, भूमी दीर्घ ऊ-कार आहेत. जे जसे आहे तसे समजून घेणे, अर्थ जाणणे व तसेच बोलणे-लिहिणे हे मातृभाषेचे सौंदर्य व प्रतिष्ठा जपणे आहे.
Appeal