युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार

    दिनांक :22-Mar-2020
|
प्राचार्य प्र. श्री. डोरले
 
 
पाटणा येथील एका मोकळ्या मैदानावर शिस्तीत, रांगेने बसलेल्या रा. स्व. संघाच्या शिबिरार्थी स्वयंसेवकांसमोर संपूर्ण क्रांतीचे प्रवर्तक जयप्रकाश नारायण आपल्या संथ, प्रवाही आणि धीरगंभीर स्वरात (फिलॉसॉफिकल टोन) उद्बोधन करीत होते. ते म्हणाले- ‘‘तुम्ही सर्व शीलसंपन्न आणि सद्गुणसंपन्न आहात. देशाची तन-मन-धनपूर्वक सेवा करण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध आहात, याची मला जाणीव आहे. आपल्या देशाला तुम्ही नवा आकार द्यावा आणि नवभारताचे तुम्ही शिल्पकार बनावे, अशी माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. हा प्राचीन समाज आपल्या महान पूर्वजांचा आणि इतिहासाचा अभिमानस्पद ठेवा आहे. गत काळातील अनेक वीरांनी आणि हुतात्म्यांनी केलेल्या बलिदानामुळेच जे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले ते स्वातंत्र्य टिकविणे आणि उत्तरोत्तर अधिकाधिक फलदायी करणे, हे महान कार्य तुम्हीच करू शकाल. आजच्या घडीला आपल्या देशात जे परिवर्तन घडत आहे ते केवळ तुमच्यामुळेच घडले आहे. तुम्ही सेवाभावनेने आणि त्यागभावनेने झपाटलेले आहात. हा विशाल देश तुमच्या पुढे आहे. या देशाचा ऊर्जित काळ तुमच्या प्रयत्नांनीच घडणार आहे, याची मला खात्री आहे. त्यासाठी आवश्यक ती योग्यता व शक्ती परमेश्वर तुम्हाला देवो, असा आशीर्वाद एक वृद्ध या नात्याने मी तुम्हाला देतो.’’ (दिनांक 3-11-1977 रोजी, पाटणा येथील संघाच्या प्रशिक्षणवर्गात दिलेल्या भाषणातून)
 
 
रा. स्व. संघाच्या 52 वर्षे अथक, परिश्रमपूर्वक, सातत्याने चालणार्‍या कार्याची एका महान नेत्याने केलेली ही प्रशस्ती आणि मनःपूर्वक दिलेला हा आशीर्वाद संघकार्याची फलश्रुती आणि यशच म्हणावे लागेल. अशी ही संघटना सन 1925 साली विजयादशमीच्या सुमुहूर्तावर स्थापन करणार्‍या महापुरुषाचे नाव आहे. डॉ. केशव बळीयाम हेडगेवार!
 
 
एक द्रष्टा महापुरुष
डॉक्टरांचे संपूर्ण जीवन, त्यातील घटना, प्रसंग, त्यांच्या घराण्याचे सामाजिक, आर्थिक, लौकिक, व्यावहारिक, व्यावसायिक चौकटीतील त्या तुलनेने असणारे सामान्यत्व हे सर्वश्रुतच आहे. तरीही त्यांच्या राष्ट्रसमर्पित जीवनाचे चिंतन केले तर त्यात- दैवी कार्यासाठीच जणू देह धारण करून भूतलावर अवतीर्ण होणार्‍या, दैवी गुणसंपदेने युक्त असलेल्या, जणूकाही ईश्वरनियोजित कार्यासाठीच (ओन्ली फॉर डिव्हाईन मिशन) जे महापुरुष भूतलावर जन्माला आले होते, अशा महापुरुषांच्या जीवनक्रमातील घटनांचे-विशेषतः कार्यप्रणालींच्या, दैवीसंकेतांच्या पाऊलखुणा आपल्याला स्पष्टपणे जाणवतात.
 
 
डॉक्टरांचे संपूर्ण बालवयापासून तर मृत्युदिनापर्यंतचे जीवन हे जन्मजात देशभक्तीने भारलेले जीवन होते. देशभक्तीची भावना हा त्यांचा स्थायीभाव होता. त्यातूनच त्यांच्या व्हिक्टोरिया राणीच्या राज्यरोहणप्रसंगी मिळालेल्या मिठाईचा स्वीकार न करणे, निलसिटी हायस्कूलमधील ‘वंदे मातरम्‌’ प्रकरण घडवून आणणे, बालवयानुसार आपल्या घरातून सीताबर्डीच्या किल्ल्यापर्यंत भुयार खोदून इंग्रजांचा युनियन जॅक उखडून फेकणे, पुढे सन 1908 मध्ये कलकत्त्याला डॉक्टरकीच्या शिक्षणाची संधी घेऊन तेथील क्रांतिकारकांच्या अनुशीलन समितीच्या सशस्त्र क्रांतिकार्याचा अनुभव घेणे, सन 1915 ते सन 1924 पर्यंत सतत दहा वर्षे त्यांनी कॉंग्रेस, हिंदुमहासभा, लो. टिळक, म. गांधी, स्वदेशी, असहकार आंदोलनात सहभागी होऊन, त्यामुळे प्राप्त झालेला कारावासही आनंदाने भोगला. त्यामुळे त्यांचे त्या काळातील स्वातंत्र्य आंदोलनातील महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, स्वा. सावरकर, लो. टिळक यांसह सर्वांशी जवळचे संबंध निर्माण झाले होते. त्याचा एक चांगला परिणाम असाही झाला की, स्वातंत्र्य आंदोलनातील सहभागामुळे डॉ. हेडगेवार एक कर्तृत्ववान पुढारी म्हणून जनतेला परिचित झाले आणि डॉक्टरांनाही स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या समाजमनाचा जवळून परिचय झाला; तसेच स्वातंत्र्याबाबत, देशाबाबत, इंग्रजांविषयी नेतृत्व करणार्‍या पुढार्‍यांच्या देशाच्या स्वातंत्र्याबाबत काय कल्पना आहेत याचे स्पष्ट दर्शन झाले. अनुभूती आली. ती त्यांच्या राष्ट्रोद्धाराच्या मूल चिंतनाला उपयोगी ठरली. जशी श्री समर्थ रामदास स्वामींच्या आणि स्वामी विवेकानंदांच्या. त्यांची देशपरिक्रमा ही त्यांच्या उपयोगी आली होती. वरील सर्व अनुभूती घेतल्यामुळे कार्य करीत असताना- या देशाच्या पतनाची कारणं शोधण्यात, त्याचे चिंतन करण्यात डॉक्टरांचे अंतर्मन अखंड व्यग्र असे. त्यामुळे श्री समर्थ म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या सर्व क्रियांना ‘जाणीवयुक्त क्रियांचे स्वरूप आले.’ जाणीवयुक्त क्रिया आणि जडक्रिया यातून परिस्थितिजन्य निष्कर्षामध्ये परक पडतो. तो नेमका फरक त्यावेळच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झालेले सर्व थोर पुढारी आणि डॉ. हेडगेवार यांच्या हेतूंमध्ये, निष्कर्षांमध्ये आणि कारणमीमांसेमध्ये दिसून येतो. 

hedgewar_1  H x 
 
त्या काळी स्वातंत्र्य आंदोलनाच्या चळवळीत सहभागी झालेल्या पुढार्‍यांसमोर कसेही करून इंग्रजांपासून देश स्वतंत्र करणे, स्वराज्य मिळविणे एव्हढाच मर्यादित हेतू होता. एकदा का स्वराज्य मिळाले की सर्व समस्या चुटकीसारख्या संपून जातील, हा त्यांचा भोळा भाव होता. त्यामुळे त्यांना खर्‍या अर्थाने परिस्थितीच्या गर्भात काय लपले आहे, खिलाफत चळवळीमुळे मुस्लिमांच्या मानसिकतेत कसा बदल होतो आहे, त्यांचे देशहिताला बाधक असलेले वातावरण व त्यातून त्यांची निर्माण होणारी आक्रमकता, त्याचा परिणाम म्हणून भारतात होणारे दंगे, मोपल्यांच्या वंशात सहस्रावधी हिंदूंचा झालेला कत्लेआम, स्त्रियांवर प्रेत होऊन पडेपर्यंत होणारे सामूहिक बलात्कार (अधिक तपशिलासाठी जिज्ञासूंनी स्वा. सावरकरलिखित ‘मोपल्यांचे बंड’ अर्थात ‘मला काय त्याचे?’ हे पुस्तक मुळातून वाचावे.) आणि तरीही हिंदू समाजाचे नेतृत्व करणार्‍या म. गांधींनी त्यांचे ‘धर्मप्रेमी-शूरवीर मोपले बंधू’ म्हणून कौतुक करावे? स्वातंत्र्याच्या, हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या परिणामाच्या आग्रहाच्या मृगजळामागे धावावे?
 
 
डॉक्टरांचे मूलभूत चिंतन
डॉक्टर हेडगेवार यांना भारताचा प्राचीन गौरवशाली इतिहास ज्ञात होता. सर्व संस्कृतीमध्ये आपली संस्कृती प्राचीन आणि श्रेष्ठ आहे, याची त्यांना माहिती होती. ग्रीक, हूण, कुशान, शक इत्यादी आक्रमकांशी लढणारा, त्यांना परास्त करणारा व पूर्ण पचवून टाकणारा असा आपला पराक्रमाचा वारसा आहे. तरी प्रारंभी मूठभर मुसलमानांकडून आणि त्यानंतर अल्पसंख्येने आलेल्या इंग्रजांकडून कोट्यवधी लोकसंख्येचा हा देश पराभूत का व्हावा? एकेकाळी जगज्जननी म्हणून गौरविला जाणारा हा देश आक्रमकांनी शतकानुशतके, लुटला, तुडविला आणि भिकारी बनविला. याच्या कारणांचे मूलभूत चिंतन त्यांनी केले व त्यांच्या लक्षात आले ते हे की, येथील समाजाजवळ राष्ट्रधारणेसाठी आवश्यक असलेल्या दोन मूलभूत गोष्टींचाच अभाव आहे. त्या म्हणजे राष्ट्रीयतेची जाणीव आणि तज्जन्य एकात्मतेची अनुभूती. ती नसल्यामुळेच अपेक्षित अशा ‘राष्ट्रीय चारित्र्याची घडण’च येथे झाली नाही. इंग्रज माणूस हा इंग्लंड राष्ट्रासाठी जगतो. आक्रमक मुसलमान त्याच्या धर्मासाठी आणि ‘जिहादासाठी’ जगतो आणि भारतातील मनुष्य आपण हिंदू आहोत, हा देश हिंदूंचा म्हणून हिंदुस्तान आहे, आपले आणि या समाजाचे, देशाचे काही नाते आहे, याची पूर्ण विस्मृती झालेली असल्याने ‘एकटा’ म्हणून जगतो. त्यामुळे त्याच्या जगण्याला- ‘जिवंत राहण्यासाठीच जगणे’ किंवा ‘मरण येईपर्यंत जगणे’ इतकाच अर्थ राहतो.
 
 
त्यामुळे आपल्याच लोकांनी आक्रमकांना मदत केली. इतकेच नव्हे, तर या देशाच्या स्वातंत्र्यरक्षणासाठी जे कटिबद्ध होऊन पुढे सरसावले त्यांच्याविरुद्धही आपलेच लोक लढलेत. आपल्याच लोकांनी शत्रूला मदत केली. परक्यांचे साम्राज्य वाढविले. छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे कोण होते? आपलेच लोक होते! मिर्झा राजे, बाजी घोरपडे ‘आपलेच’ होते, पण त्यांना ‘राष्ट्रीय’ दृष्टी नव्हती. त्यामुळे त्यांनी धर्म, समाज, देशहिताचा विचार केला नाही. (आजही शाहीनबाग प्रकरणात काय दिसते?) डॉक्टरांचे हे निरपेक्ष आणि तितकेच वस्तुनिष्ठ असलेले चिंतन आहे. ते हे चिंतन वा केवळ निष्कर्ष काढूनच थांबले नाहीत, तर या देशविघातक अवगुणांना परास्त करण्याच्या उपाययोजनेबाबतही त्यांनी मूलभूत विचार केला. तो विचार म्हणजे- ‘‘या देशाचा अनादिकाळापासून वारसदार असणारा समाज जर कोणता असेल तर तो हिंदू समाजच आहे. त्यामुळे ‘हिंदुत्व हेच येथील राष्ट्रीयत्व’ आहे. हीच आमची अस्मिता आहे. देशामधील इतर समाज इतिहासकाळात आक्रमक म्हणूनच आले आहेत. त्यांनी आपला देश, धर्म, संस्कृती नष्ट, भ्रष्ट करण्याचाच प्रयत्न केला आहे. कोणताही मुलगा आपल्या मातेवर बलात्कार, आक्रमण करतो काय? तिची विटंबना करतो काय? असे करणारा हा परकीयच समजला पाहिजे. त्यासाठी भारतमातेचा पुत्ररूप समाज म्हणून आम्हीच तिच्या रक्षणासाठी संघटित होऊन सामर्थ्यशाली बनले पाहिजे. त्यानेच आपला देश, धर्म आणि समाज जगाच्या या धकाधकीच्या मामल्यात टिकेल.’’ (पुणे येथील सन 1935 मधील बौद्धिकवर्गातून)
 
 
राष्ट्राच्या, समाजाच्या दृष्टीने अतिशय आवश्यक असलेल्या वरील विचारांनी, संस्कारांनी भारलेली ‘माणसे’ निर्माण करण्यासाठी त्यांनी एका अभिनव कार्यपद्धतीचा आविष्कार केला. त्या कार्यपद्धतीलाच आपण ‘संघाची शाखा’ म्हणून ओळखतो. या दैनिक शाखेचे स्वरूप आज केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगातील प्रमुख देशांमध्ये प्रचलित आहे. त्या माध्यमातून राष्ट्रभक्तीने परिपूर्ण असा व तन-मन-धनपूर्वक मातृभूमीची सेवा करणारा ‘माणूस’ घडविण्याचेच एकमेव कार्य गेली 95 वर्षे संघ करतो आहे.
 
 
दैनिक शाखा-भाषात्मक अधिष्ठान
डॉक्टरांनी या अभिनव पद्धतीच्या साध्या-सोप्या माध्यमातून ‘माणूस’ घडविण्याचा यशस्वी प्रयोग केला. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, या महामंत्राचा आविष्कार घडविणारे हे सोपे तंत्र! हिंदू समाजाची संघटित शक्ती निर्माण करण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. त्याचे भावनात्मक अधिष्ठान तसे अगदी सोपे, सरळ आणि सहज आचरणीय असे आहे. ‘‘कोणाही विषयी विरोधाची, शत्रुत्वाची, द्वेषाची भावना न ठेवता आपल्या मातृभूमीची भक्ती करणे, समाजातील प्रत्येक व्यक्तीवर बंधुवत प्रेम करणे, राष्ट्रीय वारसा म्हणून प्राप्त झालेल्या जीवनमूल्यावर निष्ठा ठेवणे आणि आपला धर्म, संस्कृती आणि परंपरा यांच्या आधारावर समाजाची संघटित शक्ती निर्माण करणे. त्यासाठी आवश्यक ती गुणसंपदा प्राप्त व्हावी म्हणून शाखेवर विविध कार्यक्रम करणे. अनादिकाळापासून ‘विक्रम आणि वैराग्याचे, त्याग आणि पराक्रमाचे चिन्ह म्हणून मान्य झालेल्या भगव्या ध्वजाला गुरुस्थानी ठेवून एकलव्याच्या एकांतिक निष्ठेने राष्ट्रीय सद्गुणांच्या प्राप्तीसाठी, चारित्र्य निर्माण करण्यासाठी दैनिक साधनारूपी शाखा लावणे आणि हे सर्व ज्या मातृभूमीला परम्‌ वैभवाप्रत नेण्यासाठी करायचे आहे त्या भारतमातेच्या जयकाराने तिच्याच चरणी समर्पित करणे.’’
 
 
दैनिक शाखेच्या या साध्या, सोप्या आणि सहज वाटणार्‍या कार्यपद्धतीतूनच शारीरिक, बौद्धिक, मानसिक अनुशासनाचे संस्कार होऊन आसेतूहिमालय ‘तेरा वैभव अमर रहे मॉं- दिन हम चार रहे न रहे’ या मातृभूमीवरील असीम भक्तीने कार्यरत असणारी लक्षावधी देशभक्तांची मांदियाळी उभी राहिली. 95 वर्षांच्या अथक परिश्रमाने आज संपूर्ण देशात हिंदुत्वाचा जागर आणि हुंकार निर्माण झाला आहे. डॉक्टरांनी सन 1940 च्या संघ शिक्षावर्गाच्या समारोपप्रसंगी काढलेले समाधानाचे उद्गार की- ‘‘मी आज माझ्यासमोर हिंदुराष्ट्राचे छोटे स्वरूप पाहतो आहे. राष्ट्रोद्धाराचा खरा मार्ग लोकांना दाखवून देणे हे आपले कर्तव्य आहे. हिंदू जातीचे अंतिम कल्याण या संघटनेनेच होणार आहे. हा मार्ग आक्रमण करता करता असा एक सोन्याचा दिवस उगवेल की, ज्या दिवशी सर्व हिंदू संघटित झालेले असतील. मग हिंदू जातीकडे वाकड्या दृष्टीने पाहू शकणारी कोणतीही शक्ती उभ्या जगात राहणार नाही...’’
 
 
आज डॉक्टरांनी पाहिलेले हे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने गतिमान झालेले आपण अनुभवतो आहोत. सन 1940 मध्ये संपूर्ण भारतात त्यांनी संघाचे बीजारोपण केले. आज त्याचा प्रचंड वटवृक्ष झालेला आपण पाहतो आहे. त्या वटवृक्षाच्या असंख्य शाखा देशाच्या कानाकोपर्‍यात पसरल्या आहेत. त्यातून उत्पन्न होणार्‍या संघटित सामर्थ्याच्या भरवशावर डॉक्टरांच्या स्वप्नातील अपेक्षित ‘समर्थ भारत’ निश्चितच उभा राहील, यात काही शंका नाही.
 
 
शेकडो वर्षांपूर्वी एका ‘समर्थ’ संन्याशाला ‘आनंदवन भुवना’चे आणि त्याचा परिणाम म्हणून ‘िंहदुस्तान बळावल्याचे’ म्हणजे हिंदुत्व प्रबल झाल्याचे स्वप्न पडले होते. ते सत्य झाले. त्याचप्रमाणे डॉक्टरांनाही भारतमाता परम्‌ वैभवाला नेण्याचे स्वप्न पडले. त्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनाचा काया, वाचा, मनसा होम केला. त्यातून प्रेरणा घेऊन अनेकांनी तो ‘राष्ट्रवन्ही’ स्वतःच्या जीवनाची ‘समिधा’ अर्पून तेवत ठेवला आहे. त्यानेच भारतमाता ही परम्‌ वैभवाला जाणारच आहे. डॉक्टरांचे स्वप्न पूर्ण होणारच. त्याचमुळे ते ‘युगप्रवर्तक’ आहेत...
••
Appeal