निराकाराचा आकार

    दिनांक :22-Mar-2020
|
संजीव देशपांडे
 
 
मंदिराचं असणं ही माणसासाठी खूप चांगली गोष्ट आहे. मंदिर अनुभवणं ही त्याहूनही चांगली गोष्ट. जसा जसा मंदिरांशी परिचय होत जातो तसं मंदिराचं एकेक अंग समजत जातं, अंतरंग उमगत जातं. प्रत्येक मंदिर इतर मंदिरांपेक्षा वेगळं असतं. त्याचं हे वेगळंपण- वेगळं अस्तित्व जाणवणं, त्याचा स्वभाव समजणं म्हणजे मंदिर समजणं.
 
 
मंदिर दैवताचं असतं हे खरंच, पण दैवताशिवायही मंदिर म्हणजे बरंच काही असतं. शिखर, सभामंडप, स्तंभ, हस्त, अंतराळ, मंडोवर, आमलक सगळं मिळून मंदिराचं एक व्यक्तिमत्त्व तयार झालेलं असतं.
 
 
मंदिर प्राचीन म्हणजे कोणत्या काळातलं? हा नेहमीचा प्रश्न. पण, त्याच्या काळापेक्षा त्याचं अस्तित्व जास्त महत्त्वाचं. शेकडो वर्षांपूर्वी ते कोणीतरी निर्माण केलं. आज ही मंदिरं निर्माण करणारी ती माणसं नाहीत, ते कलावंत नाहीत, तरीही मंदिर आहे. कालचा भूतकाळ, आजचा वर्तमान आणि उद्याचा भविष्यकाळ यांना जोडणारा धागा म्हणजे मंदिर. कालच्या त्या लोकांची चिरंतन स्मृती आणि संचित मंदिरंच पुढे नेत आहेत. 

nirakar_1  H x  
 
 
मंदिर आकारानं छोटं असो किंवा भव्य, त्याचं महत्त्व कमी होत नाही. मंदिराच्या व्यक्तिमत्त्वात अनेक छटा दडलेल्या असतात. काही एकटी, काही आत्ममग्न, काही उदास, काही चिरतरुण तर काही प्रसन्न असतात. तापत्या उन्हात, सर्वस्पर्शी पावसात, घनगर्द रानात, डोंगरात, टेकडीच्या पायथ्याशी, एखाद्या किल्ल्याच्या सुरक्षित कोटात, आडवाटेला िंकवा कधी गजबजलेल्या गावात मंदिरं ठाम कणखर उभी असतात.
 
 
मंदिर दगडांचं असतं. दगडावर दगड रचलेलं. काही दगड स्तंभ झाले आणि त्यांनी छत तोलून सभामंडप उभा केला, मग गर्भगृहाची सोबत मिळाली, एवढीच घटना म्हणजे मंदिर नसतं, तर मंदिर म्हणजे आपण न पाहिलेल्या काळापूर्वीपासून चालत आलेला आणि पुढचा अनंत काळ चिरंतन राहणारा विचार असतं. माणसांच्या इतिहासातली ही सर्वोत्तम निर्मिती सिद्ध करण्याची प्रेरणा कुठून आली असेल? आणि अशी दिव्य निर्मिती करून नंतर तिथं आपलं नावही गोंदून न ठेवण्याचं निर्मोहीपण कसं आलं असेल? प्रश्नांकडून उत्तरांकडे असा रूढ प्रवास नाकारणारे हे प्रश्न.
 
 
मंदिरं बोलावून ओढून नेतात कुठल्या कुठं आणि मग त्या मंदिरांना शरण जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्या ठिकाणच्या शतकानुशतकं ऊन-वारा-पाऊस झेलणार्‍या दगडांना शरण गेलं की थोडं का होईना, पण त्यांचं अंतर्मन मोकळं होतं. दगडांच्या राशीतला एखादा अनवट दगड लक्ष वेधून घेतो आणि त्या कलाकृतीचं रहस्य अंशभर उलगडल्यासारखं वाटतं.
 
 
मंदिर, जे सगळ्या दगडांनी मिळून साकार केलं त्यामागे प्रेरणा आहे आकाराची. एखाद्या कलावंताला तो आकार दिसला-जाणवला असेल. त्या आकाराचं मूर्तरूप घडवण्याचा त्यानं जो ध्यास घेतला ती खरी उत्कटता. जे जाणवलं ते साकार केलं दगडातून, हे समाधान. या समाधानातूनच आलं ते निर्मोहीपण.
 
 
मंदिर अनुभवताना या आकाराची संकल्पना आणखी स्पष्ट होते. मंदिर हा एक संपूर्ण आकार गृहीत धरला तरी तो संपूर्ण एकसंध आकार असत नाही. पायापासून ते शिखरांपर्यंत संपूर्ण मंदिरात अनेक छोटे छोटे आकार स्वतःचा आकार पूर्णतः विलीन करून एकत्वानं नांदत असतात, एका संपूर्ण मंदिराचा आकार साकार करत असतात. हे अनेक छोटे छोटे आकार असंख्य दगडांतून साकार झालेले असतात. प्रत्येक दगडावरची नक्षी, स्तंभ, तुळया असे अनेक आकार स्वतंत्रपणे एकेक संपूर्ण आकार असतात, पण त्यांचं प्रयोजन एका मोठ्या आकारासाठीच असतं.
 
 
मंदिर जिथं उभं आहे तिथं मंदिराच्या पूर्वी काय होतं? तर संपूर्ण मोकळा आसमंत. हा आसमंत बंदिस्त करायचा, एका कोणत्यातरी सूत्रबद्ध विकास पावणार्‍या आकारात. या आसमंतात, या मोकळ्या जागेत मंदिराचं निर्माण स्फुरल्यानंतर ते प्रत्यक्ष कसं असेल हे जाणवणं, निर्माणानंतर त्याचं दृश्यरूप कसं असेल, हे प्रत्यक्ष निर्माणाआधी जाणवणं, जे जाणवलं त्यानुसार ते निर्माण करण्याचा प्रयत्न करणं, जे अजून प्रत्यक्षात नाही केवळ कल्पनेत आहे ते साकार करणं. हे करत असताना या निर्मितीमागे जे सूत्र असतं तो आकार.
 
 
मंदिर सजलं असतं अनेक प्रतिमांनी, नक्षिवंत दगडांनी. या प्रतिमा घडण्याआधी दगडच असतात. पण, त्या दगडाच्या ठायी मनातला आकार कल्पून तो त्या दगडावर आरोपित करून जिवंत प्रतिमा निर्माण करणार्‍या कलावंताला जे अमूर्त जाणवलं ते नक्कीच विलक्षण असलं पाहिजे.
 
 
मंदिरनिर्मितीच्या मागे कलावंताच्या मनात सिद्ध असेल हा आकार. त्या आकारानुसार त्या कलावंतानं रचले असतील दगड. मूर्त निर्मितीमागे असलेला अमूर्त आकार. निर्मितीच्या वेळची ती अवस्था मंदिरानं कायम ठेवलेली असते.
मंदिर अनुभवताना त्या कलावंतांना स्फुरलेले आणि त्यांनी साकारलेले आकार जाणवत राहतात. मंदिरानं स्वतःच निर्माण होताना अनुभवलेली कलावंतांची भावावस्था जाणवत राहते. त्या भावनांची गूढ वलयं मंदिर परिसरात उमलत विरत असतात.
मंदिर म्हणजे त्या कलावंतांच्या मनातलं अमूर्त असं काही जे मूर्त स्वरूपात दिसत असतं समोर. आणि हेही जाणवत असतं की, हे जे मूर्त आहे ते उपेक्षेमुळे पुन्हा चालू लागलं आहे वाट त्याच अमूर्ताची...
••
Appeal