कोरोनाच्या ४८ रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

    दिनांक :25-Mar-2020
|
कोरोनाव्हायरससंबंधी दररोज चिंता वाढवणाऱ्या बातम्या येत असताना आता एक दिलासा देणारी बातमी सुद्धा समोर आली आहे. सध्या देशभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५५० पेक्षा जास्त आहे. दररोज हा आकडा वाढत आहे. पण त्याचवेळी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या अनेक रुग्णांचे कोरोना चाचणीचे रिपोर्टही निगेटीव्ह येत आहेत. देशाच्या वेगवेगळया भागातील करोनाची बाधा झालेले ४८ रुग्ण उपाचारानंतर पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारपर्यंत ३५ रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता.

dis _1  H x W:  
 
मंगळवारी डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या १३ ने वाढली. चिंता वाढवणाऱ्या घडामोडींमध्ये ही दिलासा देणारी बाब आहे.सरकारच्या उपायोजनांमुळे दुसऱ्या बाजूला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही कमी होत आहे. सोमवारी ९९ जणांचे कोरोनाचाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यातुलनेत मंगळवारी ६४ जणांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. करोनाचा वेग मंदावण्याचे हे संकेत आहेत.
संपूर्ण देशात केरळ पाठोपाठ महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी काल रात्री देशाला उद्देशून केलेल्या भाषणात संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली. इटली, स्पेन, इराणमध्ये आज कोरोना व्हायरसमुळे जी स्थिती निर्माण झाली आहे, तशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.