सांगलीत एकाच कुटुंबातील ५ जणांना कोरोनाची लागण

    दिनांक :25-Mar-2020
|
सांगलीतल्या इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ११२वर पोहोचली आहे. दोन कुटुंबातील चौघांना कोरोनाची बाधा झाल्याचं सोमवारी उशिरा स्पष्ट झालं होतं. हे चारही जण हजहून आले होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबाला घरातच क्वॉरंटाइन करण्यात आले होते. तसेच बसस्थानकावरून शहरात येणारा मुख्य रस्ता, गांधी चौक परिसरात येणारे सर्व रस्ते पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केले होते. त्यानंतर प्रशासानाने त्यांच्या कुटुंबाशी निगडीत ३९ लोकांना इन्स्टिट्युटशनल क्वारंटाइन केले होते. प्रशासनाने सुमारे २५० लोकांना होमक्वारंटाइन केले होते.
 
sangli_1  H x W
 
निगराणीखाली असलेल्या या ३९ जणांपैकी ५ जणांचे रिपोर्ट आले असून त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आहे. हे पाचही जण एकाच कुटुंबातील आहे. हे लोक आणखी किती लोकांच्या संपर्कात आले होते, याचा शोध घेतला जात आहे. सांगतलीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात असून नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे.
 
दरम्यान, राज्यात २३ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून कोरोना रुग्णांची संख्या ११२ वर पोहोचली आहे. नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे ६, सांगलीच्या इस्लामपूरमधील ९, पुण्याचे ३, सातारा जिल्ह्यातील २ तर अहमदनगर, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. तर देशात आतापर्यंत कोरोनाचे ११ बळी गेले असून त्यापैकी मुंबईतल्या चौघांचा त्यात समावेश आहे.