अमरावतीत मिठाई, नमकीन विक्री व विनामूल्य वाटपास प्रतिबंध

    दिनांक :25-Mar-2020
|
- अन्न व औषध प्रशासनाने काढले आदेश
अमरावती,
मिठाई ही जीवनावश्यक वस्तूंत मोडत नाही. तथापि, संचारबंदी लागू होण्यापूर्वी तयार झालेला मिठाईसारखा नाशिवंत खाद्य माल बाजारात येण्याची किंवा वितरीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मिठाई व नमकीन पदार्थांची विक्री किंवा विनामूल्य वाटप करण्यास अन्न व औषध प्रशासन विभागाने मनाई केली आहे.
 

sweet_1  H x W: 
 
करोना विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शासन स्तरावर योग्य त्या उपाय योजना आखण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू औषधे, दूध, किराणा ,भाजीपाला याव्यतिरिक्त सर्व व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. मिठाई पदार्थ हे अत्यावश्यक वस्तूत मोडत नाहीत. त्यामुळे हा व्यवसायही बंद आहे. अशा हॉटेल, मिठाई उत्पादक व व्यापाऱ्यांकडे काही प्रमाणात मिठाई व खारे पदार्थ शिल्लक असू शकतात. अशा मिठाई व खा-या पदार्थांची सर्वोत्तम दिनांकाची मुदत संपल्यानंतर विक्री होऊ शकते. बहुतेक मिठाई प्रामुख्याने दूध व दुग्धजन्य पदार्थ यासारख्या नाशवंत पदार्थापासून तयार करण्यात येते. मुदतबाह्य मिठाईच्या व नमकीनच्या सेवनाने अन्न विषबाधेसारखे प्रसंग उद्भवू शकतात. त्यामुळे या विक्री बंद असलेल्या कालावधीत कोणीही मिठाईची व नमकीनची विक्री अथवा विनामूल्य वाटप करू नये किंवा मानवी सेवनासाठी वितरण करण्यात येऊ नये, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी दिले आहेत.
 
 
 
सध्याच्या जागतिक आपत्तीच्या परिस्थितीत पुन्हा कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती उद्भवेल अशी कृती कोणीही करू नये. असे करताना आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असा इशाराही देण्यात आला आहे. नागरिकांनी बाहेरील मिठाईऐवजी घरी तयार केलेली मिठाईच सेवन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.