८० कोटी लोकांना २ रुपये किलोने गहू, ३ रुपये किलोने तांदूळ देणार: प्रकाश जावडेकर

    दिनांक :25-Mar-2020
|
नवी दिल्ली,
केंद्र सरकार ८० कोटी लोकांना २७ रुपये किलोचा गहू २ रुपये किलोने तर ३७ रुपये किलोचा तांदूळ ३ रुपये किलोने देणार अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. सरकारी संस्थांमध्ये जे कंत्राटी कामगार आहेत, त्यांनाही पगार दिला जाईल. खासगी कंपन्याही यासाठी सकारात्मक आहेत, असेही जावडेकर यांनी स्पष्ट केले. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 

prakash javadekar_1  
 
अवघ्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाउनचा निर्णय मान्य केला. आज पत्रकार परिषदेतही सोशल डिस्टसिंग पाळण्यात आले ही चांगली गोष्ट आहे. १३० कोटी जनतेच्या सुरक्षेसाठी हा लॉकडाउन आवश्यक होता, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी तीन ते चारच उपाय आहेत. घरातच थांबा, काहीही काम केले की हात धुवा, ताप, सर्दी, खोकला वाढला तर लगेच डॉक्टरांकडे जा. तसेच सोशल डिस्टसिंग हे मोजकेच उपाय आहेत. ते सगळ्यांनी अवलंबावेत, असेही जावडेकर यांनी म्हटले आहे. आजपर्यंत जगभरात १६ हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. ही बातमी निश्चितच चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे थोडा त्रास झाला तर तो सहन केला तो आवश्यक आहे.
 
 
 
आवश्यक सेवांची दुकाने बंद होणार नाहीत. दूध, किराणा, रेशन, मांस, पशूचारा, भाजीपाला हे सगळी दुकाने सुरु राहणार आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांसोबत राज्य सरकारे आहेत, असेही जावडेकर यांनी स्पष्ट केलं.