राज्यात अत्यावश्यक सेवा कधीच बंद होणार नाहीत

    दिनांक :25-Mar-2020
|
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला आश्वासन  

cm _1  H x W: 0 
मुंबई,
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशामध्ये २१ दिवस लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांशी संवाद साधला. यासंदर्भातील माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनीच ट्विटर तसेच फेसबुकवरुन लाइव्ह व्हिडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना दिली. जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन हे जनतेच्या सुरक्षेसाठी असल्याचे सांगतानाच यामुळे घाबरुन जाण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर माझे त्यांच्याशी बोलणे झाले. मी पंतप्रधानांशी बोललो आणि त्यांना कल्पना दिली की तुम्ही दिलेल्या सूचना आम्ही आधीच राज्यात दिल्या आहेत. जवळपास महाराष्ट्र आम्ही लॉकडाउन केला आहे. पण अत्यावश्यक सेवा आणि त्यासाठी लागणारे कर्मचारी आपल्याला ठेवावे लागतील अन्य़था गोंधळ निर्माण होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यावेळी युरोपमध्ये संकट ओढावल्यानंतर काय वातावरण होते याची कल्पना मला मोदींनी दिली, असेही मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले.
“आपण पाहत आहात, ठिकठिकाणाहून बातम्या येत आहेत, टीव्हीवर सुद्धा दृष्य दिसताहेत दुकानामध्ये झुंबड उडाली आहे. लोकं रस्त्यावर आलेली आहेत. गैरसमज करुन घेऊ नका अशी विनंती आहे. कोणत्याही परिस्थितीत जीवनाश्यक वस्तू सुविधा बंद केल्या जाणार नाहीत,” असेही यावेळी त्यांनी सांगितले. संकट अतिशय गंभीर आहे. हे लक्षात घ्या. संकटाची भिती नको पण गंभीर्य ठेवा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.