रद्द झालेल्या रेल्वेचे तिकीट कॅन्सल करु नका, IRCTC चे प्रवाशांना आवाहन

    दिनांक :25-Mar-2020
|
नवी दिल्ली,
कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली. या घोषणेनंतर रेल्वे प्रशासनानेही मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर रेल्वेसेवा ३१ मार्चऐवजी १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रवासी वाहतूक बंद असली तरी देशातील मालगाड्या सुरू राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तर, ज्या प्रवाशांनी ऑनलाइन तिकीट काढले असतील त्यांनी चुकूनही तिकीट कॅन्सल करु नये असे, आवाहन आयआरसीटीसीकडून प्रवाशांना करण्यात आले आहे.

railway station_1 &n
 
ट्रेन रद्द झाल्याने काही प्रवासी ऑनलाइन काढलेले तिकीटही रद्द करत आहेत. त्या प्रवाशांनी ऑनलाइन तिकीट रद्द करु नये, असे आयआरसीटीसीने म्हटले आहे. '१४ एप्रिलपर्यंत रद्द झालेल्या गाड्यांसाठी ज्या प्रवाशांनी ऑनलाइन तिकीट काढले असेल त्यांनी ते तिकीट रद्द करु नये, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. रद्द झालेल्या ट्रेनच्या तिकीटाचे पैसे रेल्वेकडून आपोआप प्रवाशांच्या खात्यात जमा होत असतात, त्यामुळे त्यांनी तिकीट रद्द करायची गरज नाही. उलट तिकीट रद्द केल्यास त्यांना आर्थिक नुकसान होईल आणि दंडाची आकारणी होऊन कमी पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, असे आयआरसीटीसीने सांगितले आहे.
 
दुसरीकडे, तिकीट काउंटरवरुन काढलेले तिकीट रद्द करण्याच्या नियमात बदल केल्याचे रेल्वेने यापूर्वीच जाहीर केले आहे. तिकीट घरांवर गर्दी होऊ नये यासाठी रद्द झालेल्या ट्रेनचे तिकीट कॅन्सल करण्यासाठी तीन दिवसांऐवजी तीन महिन्यांपर्यंतचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. तसेच, तिकीट रद्द केल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, प्रवाशांना तिकीटाचा पूर्ण परतावा मिळेल, असेही स्पष्ट केले आहे.