रामलल्लाची मूर्ती दुसर्‍या ठिकाणी हलवली

    दिनांक :25-Mar-2020
|
मंदिर बांधकामाचा मार्ग मोकळा
अयोध्या,
साडेतील मुहुर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभ पर्वावर रामलल्लाची मूर्ती आज बुधवारी पर्यायी जागेवर हलविण्यात आली. यामुळे अयोध्येतील मूळ जागेवर भव्य राममंदिर बांधण्याचा मार्गही आता मोकळा झाला आहे.
 

ram mandir_1  H 
 
 
रामलल्लाची मूर्ती विधिवत् हलविण्यासाठी आयोजित कार्यक्रमात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. या मूळ जागेपासून काही अंतरावरच हे पर्यायी ठिकाण आहे. तिथे साडेनऊ किलोग्राम वजनाच्या चांदीच्या सिंहासनावर रामलल्लाची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे. राममंदिराचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत येथेच आता ही मूर्ती राहणार आहे.
 
 
पर्यायी ठिकाणी रामलल्लाची मूर्ती ठेवण्यात आल्यानंतर आदित्यनाथ यांनी प्रभू रामचंद्राची विधिवत् पूजा केली. यावेळी राममंदिर विश्वस्त मंडळाचे सचिव चंपत राय प्रामुख्याने उपस्थित होते. आदित्यनाथ यांनी एक नागरिक म्हणून यावेळी मंदिराच्या बांधकामासाठी 11 लाख रुपयांची देणगी दिली.
 
 
कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर स्थानिक प्रशासनाने संपूर्ण परिसर सील केला होता. पोलिसांचा तगडा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. यामुळे सामान्य नागरिकांना या विधित सहभागी होता आले नाही.