...तर इटलीसारखी स्थिती होण्यास वेळ लागणार नाही

    दिनांक :25-Mar-2020
|

निखिल जनबंधू
नागपूर,
कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविद-१९ या आजाराचे वेळीच गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी सरकारने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन न केल्यास भारताची चीन व इटलीसारखी स्थिती निर्माण होण्यास एक दिवसही लागणार नाही, असा इशारा पोलंडवरून मयुर तितरमारे याने दिला आहे. 

sangraha _1  H  
 
मयुर हा मुळाचा नागपूरचा असून गेल्या काही वर्षांपासून पोलंड येथे स्थायिक झाला आहे. एका आयटी कंपनीत तो नोकरीला आहे. मागील दहा-बारा दिवसांपासून तो ‘होम क्वारंटाईन’ आहे. याच दरम्यान त्याने चार मिनिटांचा एक व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर टाकला आहे. यामध्ये मयुरने कोरोनाच्या भयावह स्थितीची माहिती दिली आहे. युरोप, इटलीमध्ये जानेवारीच्या दुसर्‍या-तिसर्‍या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तेथील लोकांनी त्यावेळी हा विषय फारसा गांभीर्याने घेतला नाही. त्यांना तोच चालढकलपणा नंतर नडला. तेथील परिस्थिती इतकी भयावह झाली आहे की त्याचे वर्णन करणे कठीण झाले आहे. शेकोडोंच्या सं‘येने रोज तिथे मृत्यू होत आहेत. तेथील सरकार हतबल झाले आहे. काही दिवसांपूर्वी मी इटली व स्पेन या देशामध्ये होता. तेव्हा कल्पनाही केली नव्हती की अशी परिस्थिती या देशांवर ओढवेल.
 
 
 
आज युरोपमध्ये लोकांना त्यांचे आई-वडील कुठे आहेत, ते जिवंत आहेत की मरण पावले याची देखील माहिती नाही. या लहान देशांची स्थिती अशी झाली आहे, तर आपल्या देशाचे आणि विशेषतः महाराष्ट्राचे काय होईल, अशी शंका मयुर तितरमारेने व्यक्त केली आहे. या व्हिडीओत मयुर म्हणतो, ‘या सार्‍या गोष्टी गांभीर्याने घ्या. हे लोण जर संपूर्ण देशभरात पसरले तर काय भयावह स्थिती निर्माण होईल याची कल्पनाही करणे अशक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी निदान आपल्या कुटुंबियांचा, मुला-बाळांचा विचार करावा. नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना सध्या भेटू नका. हे सर्व करण्यासाठी संपूर्ण आयुष्य आहे. जी घोडचूक युरोपातील लोकांनी केली आहे, ती चूक भारतातील लोकांनी करू नये. आपल्या देशाची लोकसं‘या 130 कोटींपेक्षा अधिक आहे. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकारने वेळोवेळी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी साथ द्यावी. सरकारने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. आपण कोरोना या माहामारीच्या विरोधात सहजरित्या लढू शकतो, परंतु यासाठी नागरिकांनी घरीच बसावे आणि इतरांशी सामाजिक अंतर पाळावे, असेही आवाहन मयुरने या व्हिडीओच्या माध्यमातून केले आहे.