गडचिरोली, अमरावतीत मुसळधार पाऊस

    दिनांक :25-Mar-2020
|
आरमोरी,
एकीकडे संपूर्ण भारत देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना त्याला पोषक असे वातावरण निर्मिती निसर्गाच्या माध्यमातून होत आहे. आज आरमोरी येथे जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आरमोरी तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी टरबुजाची शेती केली असून रब्बी हंगामात चणा उडीद मूग तूर टरबूज गहू मका आदी पिकांचे उत्पादन घेत आहेत. या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
 
pausa _1  H x W
 
 
या पावसाचा फटका सुरु असलेल्या धान खरेदी केंद्रांना सुद्धा पडलेला असून धान हे बाहेर उघड्यावर पडले आहेत. त्यांचे वजन सुद्धा झालेले नसल्यामुळे शेतकऱ्यांना संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशातच संपूर्ण भारत देशात कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव झालेला असून या रोगासाठी थंडीचे वातावरण अतिशय पोषक ठरते असे वैद्यकिय अधिकाऱ्याचे मत असून या रोगाला पाऊस आल्यानंतर चांगले वातावरण निर्मित होत आहे. त्यामुळे नागरिकांनी उचित काळजी घ्यावी असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 
 
अमरावतीलाही वादळी पावसाचा फटका 
जिल्ह्यातल्या बहुतांश भागात बुधवारी रात्री विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. कुठे अप्रिय घटना घडल्याचे वृत्त नाही. संचारबंदीमुळे सर्वत्र शुकशुकाट होता. हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला होता. तरी बुधवारी सकाळ ते सायंकाळ पर्यंत वातावरण चांगले होते. नागरिकांनी घरात राहून गुढीपाडवा साजरा केला. सायंकाळनंतर ढगाळी वातावरण तयार झाले. बराचवेळ सोसाट्याचा वारा सुटला. याच दरम्यान विजेचा कडकडाट सुरू झाला. रात्री 8 वाजताच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. मात्र तो सौम्य होता. याच प्रकारे जिल्ह्यातल्या चांदूर बाजार, अचलपूर, मोर्शी, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, वरुड या भागात पाऊस झाला. पावसामुळे कुठे नुकसान झाल्याची किंवा अप्रिय घटना घडल्याची माहिती नाही.