WHOकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

    दिनांक :25-Mar-2020
|
-संयुक्त राष्ट्राकडून भारताला संदेश
जिनिव्हा, 
२१ दिवस लॉकडाउन घोषित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले आहे.  भारत कोरोनाला मात देऊ शकतो, असा विश्वास देखील जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे. तसेच कोरोना व्हायरस विरोधात तुमचा लढा सुरु आहे, त्यामध्ये आम्हीसुद्धा तुमच्यासोबत एकजुटीने उभे आहोत, असा संदेश संयुक्त राष्ट्राकडून भारताला देण्यात आला आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
 

pm modi_1  H x
 
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी उचलण्यात आलेले हे अत्यंत महत्वपूर्ण पाऊल असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारताच्यावतीने उचलण्यात आलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांवर जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक मायकल जे. रेयान यांनी सांगितले की, भारत हा चीनसारखा प्रचंड लोकसंख्येचा देश आहे. भारतात आता कोरोनाचा संसर्ग कितपत फैलावेल यावर सर्व अवलंबून आहे. भारताने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या पातळीवर आक्रमक कार्यवाही सुरूच ठेवावी, असेही त्यांनी म्हटले आहे. 
 
दररोज कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा वाढत आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठानुसार, जगभरात आतापर्यंत १८,९१५ नागरिकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. १६५ देशांमध्ये ४ लाख २२ हजार ९०० जणांना कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया या देशांमध्ये करोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. भारताने या देशांपासून धडा घेऊन केलेल्या उपायोजनांमुळे भारतात रुग्ण संख्येचा आकाडा कमी आहे.