घरी बसून काय करायचे?

    दिनांक :26-Mar-2020
|
प्रत्येक काळाचा आपला एक प्रश्न असतो. असे काळालाच पडावेत असले प्रश्न एरवी निर्गुण निराकार असतात; मात्र काळाच्या एका टप्प्यावर ते सगुण साकार होतात आणि माणसांकडे त्यांचे काही घेणे वसूल करायला उभे राहतात. ते काहीच आवाज करीत नाही, स्पर्शदेखील करीत नाहीत; पण तरीही त्या प्रश्नांचा अंतर्नाद ते प्रश्न ज्यांच्यासमोर उभे असतात त्यांच्या मनात आणि जे खूप दूर असतात त्यांच्याही मनात एकाच वेळी उमटत असतो. (खरंतर अशा कालव्यापी प्रश्नांचे स्वरूपच सर्वव्यापी असल्याने विश्वातले सगळेच मानव त्या वेळी तो प्रश्न चुकवूच शकत नाहीत.) या शतकाच्या पहिल्या चतकोर भागात पडलेला हा प्रश्न आहे, ‘घरी बसून काय करायचे?’ आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याची संभावना ‘जागतिक महामारी’ अशी केलेली आहे, त्या कोरोना विषाणूच्या प्रसारावर एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे घरी बसा. परवा भारताच्या पंतप‘धानांनी टाळेबंदी जाहीर केली. कोरोनाशी लढायचे असेल तर त्याचा प्रसार रोखणे, हाच एकमेव उपाय सध्या जगासमोर आहे. चीन आणि अमेरिका या बड्या राष्ट्रांची मुजोरी अद्याप संपलेली नाही. ते सातत्याने म्हणत आहेत की, आम्ही यावर उपाय शोधून काढला आहे, पण त्यात काही दम नाही, हे त्यांच्या राष्ट्रप्रमुखांच्या बोलण्यावरूनच लक्षात येते. सध्यातरी जगासमोर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे संपर्क टाळणे. सामाजिक अंतर राखणे. त्यासाठी घरातून बाहेरच पडायचे नाही. चीनने तर या विषाणूचा उद्गम ज्या प्रांतातून झाला त्या वुहानमध्ये नागरिकांना आधी असेच आवाहन केले आणि ते एकले नाही म्हणून मग नागरिकांच्या घरांवर बाहेरून खिळ्यांनी पाट्या ठोकल्या. आता भारताच्या पंतप्रधानांनी 21 दिवस घरातून बाहेरच पडू नका, असे आवाहन केले आहे. पंतप्रधान म्हणून नव्हे, तर तुमच्या घरचा एक सदस्य म्हणूनच मी हे आवाहन करतो आहे, असे ते म्हणाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही अंतर राखण्याचे असे सूत्र पाळले गेले. सध्या 21 दिवस तरी घरातून बाहेर पडायचेच नाही. पहिल्या दिवशी नागरिकांनी अत्यावश्यक गरजांची सामग‘ी संग‘हित करून ठेवण्याची धडपड केली. तरीही हिंदुस्थानच्या रस्त्यांवर तसा शुकशुकाट होता.
 
 
ghar_1  H x W:
 
 
आता हा प्रश्न पडला आहे, ‘घरी बसून काय करायचे?’ एकतर हे युगच प्रश्न न पडू देण्याचे आहे. कुणालाच प्रश्न नको असतात. व्यवस्थेलाही नाही अन् व्यवस्थाच आम्हाला स्वातंत्र्यच देत नाही, अशी उगाच ओरड करणार्‍या कथित बंडखोरांनाही प्रश्न नको असतात. कारण, स्वातंत्र्य हवे की सुरक्षितता, या प्रश्नाचे उत्तर वरवर जरी स्वातंत्र्य असे दिले जात असले, तरीही सार्‍यांनाच सुरक्षितता हवी असते. कुणीतरी आमचे रक्षण करावे, ऊब द्यावी असेच सार्‍यांना वाटत असते. त्यामुळे असे अटळ प्रश्न समोर आल्यावर लोक भांबावतात. प्रश्नाला बगल देऊन पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी मग प्रश्न ज्या समस्येमुळे निर्माण झाला त्या समस्येसाठी कुणालातरी गुन्हेगार ठरवून मोकळे होतात. प्रश्नाचे उत्तर प‘त्येक वैयक्तिकाची जबाबदारी निश्चित करत असते. आम्हाला जबाबदारी कुठलीच नको असते, तरीही स्वातंत्र्य हवे असते. आता ‘घरीच बसा’ असे सांगण्यात आल्यावर ‘हा कोण गेला सांगणारा’ असा प्रतिप्रश्न काही उपटसुंभांनी विचारून पाहिला. मोदींना अंधभक्त खूप लाभलेत, असे त्यांचे विरोधक म्हणत असतात, मात्र ते अंधविरोधक आहेत, हे सत्य ते नाकारतात. मुळात घरी बसा, हा उपाय काही मोदींनी काढलेला नाही. त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या हवाल्याने आणि आरोग्यतज्ज्ञांचा निर्वाळा देत, ही विनंती केली आहे. त्यामुळे घरी का बसायचे, याचे उत्तर आपोआपच मिळाले आहे. प्रश्न हा आहे की ‘घरी बसून काय करायचे?’ एकतर घराच्या बाहेर पडणे टाळायचेच, हे स्वीकारायलाच हवे. ‘मर्जी है आपकी, आखीर जिंदगी है आपकी’ असे त्यामागचे सुत्र आहे. तुम्ही बाहेर पडल्याने केवळ तुमचेच आयुष्य धोक्यात जाणार असे नाही, सार्‍या देशाचेच जीवन धोक्यात येऊ शकते. त्यामुळे बाहेर पडूच नका, हाच उपाय आहे.
 
 
घरी बसून काय करायचे? तर त्याची उत्तरे खूप आहेत. घराबाहेर पडून नेमके तुम्हाला काय करायचे आहे? जीवनाचा प्रवाह आता बाहेर पडण्याने अवरुद्ध होणार आहे. मग घरी बसून उगाच चिंता करण्यात काही अर्थ नाही. इटलीत रोज पाऊणेक हजार लोक मरत आहेत, चीनमध्ये तर आता दुसराच एक विषाणू आला आहे, अमेरिका अद्याप आपली मुजोरी सोडायला तयार नाही... हे जाणून घेण्यापेक्षा आत्मसंवाद साधण्याची ही छान संधी मिळाली आहे. ‘सोशल डिस्टंसिंग’चा केवळ भौतिक अर्थ घेऊ नका. पार्थिव संपर्कच टाळायचा असे नाही. मोबाईलच्या स्वरूपात जग मुठीत आलेले आहे. या काळात मोबाईल आणि तुमच्यातही अंतर ठेवा. महाजाळ्याचा संपर्क टाळा. पाखरांच्या किलबिलाटाचा सहज आनंद तुमच्या घराची बंद दारे भेदून येतो आहे. एरवी शहरात किती कोलाहल असतो, याचा अंदाज आता येत असेल. शांततेच्या शोधात असता एरवी. आध्यात्मिक अर्थाने आत्मशोधाच्या मार्गावरचे प्रवासी असता तुम्ही, तर मग आत्मसंवाद साधा. हरिवंशराय बच्चन यांची कविता आहे, ‘जिंदगी की आपाधापी में, मिला कुछ वक्त तो कहींपर बैठ और यह सोच, जो कुछ भी मैने कीया, कहां, माना, क्या वही सच था?’ हे करण्याची संधी एरवी मिळायची नाही. आता ती मिळालेली नाही. मी माझ्या कुटुंबीयांसोबत छान वेळ घालविणार, लौकिक आणि अलौकिकाच्या कमाईनंतर एक छान एकान्त मिळणार आहे आणि मग मी परिवारजनांसह आनंदात काळ घालविणार, या कधीही वास्तवात न येणार्‍या स्वप्नांच्या धगीवरच आपण जगत असतो. आता किमान तीन आठवड्यांसाठी ती संधी मिळालेली आहे. ती वाया कशाला घालविता?
 
 
वाचन केले पाहिजे, असे आपण इतरांना सांगतो. वाचन संस्कृतीच लोप पावली म्हणून चिंता व्यक्त करत राहतो. त्यासाठी मग आपली पुस्तकाची अलमारी दाखवतो... काढा ना ती पुस्तके बाहेर. टीव्ही बंद करून टाका. मोबाईलपासून अंतर राखा आणि पुस्तके वाचा. छान गाणी ऐका. गाता येत असेल तर तुम्हीही गा. यावेळी मनात वर्तुळणारी आंदोलने शब्दबद्ध करून ठेवण्याचा प्रयत्न करा. फुलपाखराची अळी कोशात असते तेव्हा ती जे विलोभनीय रूप कल्पित असते तशा काही रूपाची तुम्हीही कल्पना करा... बाहेरचे संकट टळले असेल आणि आकाश मोकळे झाले असेल तेव्हा तुम्ही आनंदी फुलपाखरासारखे बाहेर पडाल... बागडाल... आयुष्याचे यथार्थ दर्शन करण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे. कविता, कथा, गाणी, गप्पा, चित्र... जे काय करायचे राहून गेले ते करा.
 
 
सध्या समाजमाध्यमांवर 1969 साली कॅथलीन ओ-मायरा या आयरिश-बि‘टिश बंडखोर लेखिकेने लिहिलेली एक कविता व्हायरल झालेली आहे. ती तिने कुठल्या पृष्ठभूमीवर लिहिली, हे सांगता येत नाही; पण कोरोनाच्या दडपणात घरी थांबलेल्यांना मार्ग दाखविणारी ती कविता आहे-
मग लोक घरीच थांबले,
त्यांनी पुस्तकं वाचली, वाचताना ऐकली
आराम केला, व्यायाम केला
कलेची आराधना केली आणि खेळ खेळले
असण्याचे नवे अर्थ शिकून घेतले
आणि थांबले, आणि त्यांनी...
परावाणीतले शब्द ऐकले
ते ध्यानस्थ झाले, ते मनमुराद नाचले
आपापल्या सावल्यांना कडकडून भेटले
मग लोक वेगळ्या रीतीने चिंतन करू लागले
आणि दुखण्यातून सावरले
आणि अडाणी, धोकादायक, हृदयशून्य
जीवन जगणार्‍यांच्या नसण्याने
युगंधरादेखील दुखण्यातून सावरली
आणि जेव्हा धोका टळला
आणि लोकांना एकमेव गवसले,
निवर्तलेल्यांसाठी त्यांनी शोक केला
त्यांनी नवे पर्याय स्वीकारले,
नवी स्वप्ने पाहिली
जगण्याचे नवे मार्ग धुंडाळले
आणि त्यांनी स्वतःप्रमाणेच
युगंधरेला कायमची रोगमुक्तकेली
बघा या कवितेतून ‘घरी बसून काय करायचे?’ या प्रश्नाचे उत्तर मिळते का? की अजूनही तुम्ही भौतिकाच्या पसार्‍यातच अडकून पडला आहात, संधी मिळूनही?