जाने क्यूं आऽऽज तेरे नामसे रोना आया...

    दिनांक :26-Mar-2020
|
ऊन सावली
गिरीश प्रभुणे
ग्रेस यांचं लोकमत चौकातलं नागपुरातलं घर. ‘‘या या... देवा, माझ्या घराला दारं असली तरी ती आऽऽत उघडतात... आणि बघा, मी-मी एवढासा असलो तरी आतून खूप विशाल आहे... तुम्ही महालातून आला असला... तरी तुम्ही पालातले. तसे आमच्याच कुळातले...’’
ग्रेसनी मला त्यांच्या कुळात घेऊन टाकलं. फिरून घर दाखवता दाखवता म्हणाले-
चाऽऽर जांभळाच्यासाठी होई पारधी गगन
कोऽऽण नावेस जोडतो गूढ पाण्याचे अस्तर?
हिने नांगीस पिळता निघे विषाचे अत्तर
तरी जोगिया पुरुष तिचे सावरतो पाप...
त्यांच्या स्वगतासारख्याओळींनी मी थबकलो. या कवितेचा पाठलाग मी अनेकदा केला होता. त्या पहाडातून, रानातून, नावेतून खूप खूपदा फिरलो, भटकलो. काळ्याशार डोहातल्या सावल्या कधी हाताला गवसतात...?
‘‘अहो ही ‘सती’. तुमची कविता नव्हे. मोठंच महाभारत आहे यात.’’
ते थबकले. माझ्या हाताला धरून त्यांनी स्वयंपाकघरातल्या कोपर्‍यातल्या कपाटावरचं छोटंसं देवघर दाखवलं.
‘‘या अवलिया वैष्णवानं माझ्यावर त्याची भगवी कफनी पांघरली होती. जांभळाच्या झाडाखाली पाचोळ्यावर मला निजवून ती जायची. चार जांभळांसाठी पारधी माझ्यावर आभाळ होऊन छाया धरायचे.’’
ग्रेसमधली फकिरी या कफनीच्या छायेतून तर आली नसेल... घर थकलेला संन्यासी...
मी काय तुला सांगावे। मी फकिरासम अनवाणी
तळपायी माझ्या लिहितो। तो व्याध जुनीच विराणी
सारं घरभर ग्रेस यांच्या कविता- विविध छायाचित्रं लावलेली. वृत्तपत्रातली कात्रणं चिकटवलेली. एकतर भिंतभर चित्र. छानसं. वीस-पंचवीस वर्षांपूर्वीचं. हे सारं कुणीतरी व्यवस्थितपणे केलं असावं.
 

gres_1  H x W:  
 
मी खरेच दूर निघालो
तू येऊ नकोनं मागे...
ग्रेस सापडले सापडले वाटता वाटता एकदम अंधार्‍या गुहेत आपल्याला सोडून अदृश्य होतात. कधी भीमबेटक्यातल्या गुहेत गवसतात, तर कधी लच्छीच्या मोराच्या पिसार्‍यातल्या पिसाच्या डोक्यात. निळा सावळा मोरपंखी डोळा.
‘‘प्रभुणे, आपण गप्पा मारूयात. म्हणजे तुम्ही तुमचे अनुभव सांगा. तोपर्यंत मी मेथीची भाजी टाकतो. मला स्वयंपाकही चांगला करता येतो. तुम्ही काही करू नका. कारण तुम्हाला कुठं काय माहीत नाही.’’ पोळीवाल्या मावशी सर्व तयारी करून गेल्या होत्याच.
‘‘हरणांचा कळप झेपावत समोरून गेला. त्यांच्या खुरांनी धूळ थरथरून उडाली. त्यांच्या सुरांच्या खुणातील कंपनाने माझं हृदय धडधडलं... हे असंच असतं. खरंतर हरणांनी पारध्यांना पाहून दूर निघून जायला हवं होतं. पण हरणं पारध्यांच्या जवळून गेली. सावज असंच गवसतं जाळ्यात...’’ ते बोलता बोलता कवितेत गेले. पारधी पुस्तकातला प्रसंग त्यांना आठवला.
मुलीनो! तिचे नाव सांगितले मी
तुम्हाला, बघा आठवून बघा
कुणा पारध्याने इथे सोडलेला
ससा पाहिला मी उभ्याने बघा
‘‘चार जांभळांसाठी माझ्यावर आभाळ न धरता मलाच जर पळवून नेलं असतं तर... पारधी सशाला का सोडेल...? सोडतील...? मग त्यानं काय करायचं...? शिवलीलामृतातली हरिणी पिलांना पाजायला जाऊन परत येते. पारधी आपल्याला मारणार आहे, हे माहीत असूनही. आणि मग गंमत बघा, तिची पिलंही येतात. तिच्याही पुढे पारध्याच्या जाळ्यात अडकवून घ्यायला. ही जगरहाटी नाही. तुमची पारध्यांची मुलं धनुष्यबाण सोडून लेखणी घेतीलही... मग हरणांनी कुठं जायचं...?’’
ग्रेस बोलत होते आणि मी अधिकच मूक झालो. खरंच हरणांनी काय करायचं...?
कवीच्या मनाचा थांग लागत नाही, हेच खरं. एक समस्येच्या उत्तरात दुसर्‍या समस्येची मुळं असतात हेच खरं. पारध्यांनी शिकार थांबवली. तशी हरणंही संपली...!
अशा प्रश्नांच्या वेळा पावसाच्या असतात. मनाच्या क्षितिजावर ढग झाकोळून येतात. धो धो पाऊस कोसळू लागतो. उन्हाच्या झळांतही मनात ओलंचिंब भरभरून वाहणारं तळ-डोह साठतो. खोलखोल... वेदनेचा... या वेदनेनं तो अधिकच कोसळतो...
पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली
दु:खाच्या मंद स्वराने...
बेभानपणे जगणं केवळ भोगवादीच असतं असं नाही. स्वत:पुरतंच असतं असंही नाही. काही दु:खं समाजव्यापी, राष्ट्रव्यापीही असतात. व्यक्तीचं दु:ख डोळ्यातल्या धारांनी उमगतं. समाजाचं दु:ख... मूकवेदनेचं असतं. काळ्याशार डोहासारखं हा मनाचा डोह... अथांग...
मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
मला आग‘ह करकरून ते जेवू घालतात. मी काही म्हटलं तरी ते जेवले नाहीत. ‘‘देवा, मी तुमच्या घरी येईन जेवायला. इथं तर मी रोजच जेवतो.’’
गेली काही वर्षे ते एकटेच राहात होते. हृदयनाथांच्या बरोबर कार्यक‘म करायचे. लतादीदी आणि हृदयनाथांनी त्यांच्या कविता अगदी आतून गायल्या.
या वाटेवर रघुपति आहे
त्या वाटेवर असे शिळा
सांग साजणी कुठे ठेवू मी
तुझा उमलता गळा...
आणि ते चिंचवडला आले. क्रांतिकारक चाफेकर वाड्यात आले. पारधी मुलांत रमले. गुरुकुलात हिंडताना भावुक बनले. एक कार्यक्रमही दिला.
‘माझं पाखरू लबाड... तुझा पारधी शहाणा...’ पत्रिकेचा मजकूरही त्यांनीच लिहिला. घरी मनस्विनी, मुकेश बरोबर जेवणही केलं. मानधनाचा विषय काढल्यावर म्हणाले-
‘‘आयुष्यभर मी माझ्यासाठीच जगलो. मला करू द्यात थोडसं काही...!’’
एक दिवस त्यांचा दूरध्वनी आला.
‘‘देवा... मी महिना झाला इथं पुण्यात आहे. ‘मंगेशकर’मध्ये. उम्रदराज से माँगकर लाये थे चार दिन। दो आरजू में गये, दो इंतजार में...’’
हृदयात चर्र झालं. लगेच ‘दीनानाथ’ गाठलं. वाटेत सोनचाफ्याची फुलं घेतली. कॅन्सरनं ग‘ेसची रया गेली असली तरी ते तसंच ओघवतं बोलत होते. आपल्याला झालेल्या कॅन्सरवर ते इतक्या वेळा बोलले होते. त्यामुळे कॅन्सरचं गांभीर्यच त्यांनी संपवून टाकलं होतं. कॅन्सर एखाद्या खेळण्यासारखं झालं होतं. तरी त्यांच्या डोक्यावरचे केस संपूर्ण गेले होते. बोलण्यावर मर्यादा आली होती. तरीही ते बोलत होते. पहिल्या सारखंच भरभरून.
असतील लाख कृष्ण
कालिंदीच्या तटाला
राधेस जो मिळाला
तो एकटाच उरला...
असे लखलखते शब्द ग‘ेस यांच्याशिवाय कुणाचे असणार? यमुना रोजचीच, पण ती कालिंदी बनून येते. त्यावेळेस तो कृष्ण फक्त राधेचाच उरतो...!
संध्याकाळच्या कविता, सांजभयाच्या साजणी, चंद्रमाधवीच्या प्रदेशात, सांध्यपर्वातील वैष्णवी, मितवा, ओल्या वेळूची बासरी, वार्‍याचे हलते रान, कावळे उडाले स्वामी... असं भरभरून काव्य ललित लेखन करणारे ग‘ेस.
ग्रेस- माणिक गोडघाटे, आरतीप्रभू, पु. शि. रेगे, जी. ए. कुळकर्णी, मंगेश पाडगावकर... असा भारलेला काळ... मनाला उभारी देणारं साहित्य, काव्यं... ग्रेस यांची कविता गूढ वाटायची. एखाद्या डोहासारखी. पण त्यात उतरल्यावर सारं विश्वच बदलून जायचं. रामायण, महाभारतातील पात्रं तीच असायची. कृष्ण, राघव, सीता, ऊर्मिला, द्रौपदी, गांधारी, कुंती... ग्रेस यांच्या काव्यस्पर्शानं यांची जीवनच बदलून गेली. आई... अनेकांच्या आईची रूपं पाहिली. आई म्हणजे भरभरून प्रेम देणारीच असायला हवी. ग्रेस यांच्या कवितेतून व्यक्त होणारी आई ही मातृत्वाबरोबरच एक अभिशापित स्त्रीसुद्धा आहे. तिचं नशीब, तिचे भोग, तिची लालसा... आईचं हे गूढ गंभीर अगतिक ओढाळ आसक्तीचं आगळंवेगळं रूप, ग्रेस यांच्या प्रतिभेला अधिकच गूढ बनविते.
ती गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता...
ती आई होती म्हणुनी
घनव्याकुळ मीही रडलो
‘ती’ ती होती. ‘ती’ म्हणून जगली. तिचं असं वेगळं विश्व होतं. याच्या विश्वाचा भेद करणारं. त्यामुळेच ती गेली त्यावेळचा पाऊस ‘निनादत’ होता. हा नाद अनेक पदरी... लाटांवर लाटा आदळणारा. अवकाशातल्या पोकळीतून येणारा... तुटलेपण जाणवणारा. ‘ती’चं जाणं आणि आई म्हणून जाणं हे एकाच वेळी दोन पातळ्यांवर आपल्याला नेतं आणि आपण अधिकच उन्मळून पडतो. आणि म्हणूनच ग्रेस यांची कविता भयव्याकुळ बनवते. वैश्विक एकटेपणाची जाणीव करून देते आणि म्हणून कवी स्वत:चं कूळ सांगतो...
मी महाकवी दु:खाचा
प्राचीन नदीपरी खोल
वेगाने माझ्या हाती
दगडाचे होते फूल...
नियतीने दगडांच्या केलेल्या वर्षावाची फुलांनी बरसात करणार्‍या कवीचं निर्वाण सव्वीस मार्चला झालं. एक गच्च भरलेलं ओथंबलेलं आभाळ मागं ठेवून...