सोयाबीन उत्पादकांना दिलासा

    दिनांक :04-Mar-2020
|
केंद्र सरकारनं तेल आयातीवर लादलेले निर्बंध आणि वाढवलेल्या आयातकराचा परिणाम सोयाबीनच्या दरावर होत आहे. गेल्या चार वर्षांनंतर सोयाबीनला चांगला भाव मिळत असून बाजारपेठेत एक प्रकारे सोयाबीनच्या दरात तेजी आली आहे. सोयाबीनचा भाव येत्या काही दिवसात पाच हजार रुपयांचाही टप्पा ओलांडेल, असे संकेत मिळत आहेत. सध्या बाजारपेठेत सोयाबीनचा भाव सौद्यात 4300 रुपये तर पोटलीत 4200 च्या आसपास आहे. सोयाबीनचा हमीभाव 3710 रुपये जाहीर झाला आहे. हमीभावापेक्षा चढया भावानं बाजारपेठेत सोयाबीन विकलं जात आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या तिन्ही प्रांतात झालेल्या अतिवृष्टीमुळं सोयाबीनचं मोठया प्रमाणात नुकसान झालं. परिणामी उत्पादनात मोठी घट झाली. देशांतर्गत सोयाबीनचं उत्पादन 80 ते 82 लाख टनाच्या आसपास होईल असा अंदाज व्यक्त होत आहे. उत्पादन घटीचा परिणाम सोयाबीनचा भाव वाढण्यात होत आहे. सोयाबीनचे भाव आणि पामतेलाचे दर यांचाही संबंध असतो. या वषीं बाजारपेठेत पामतेलाचे भावही वाढत आहेत. तेलाच्या आयातीवर निर्बंध लादण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. शिवाय तेलावर आयातकर वाढवला जात आहे. याचा परिणाम सोयाबीनच्या भावावर होत आहे. गेल्या चार वर्षांनंतर सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्यानं बाजारपेठेत आनंदी वातावरण आहे. 

khalbali_1  H x 
 
 
चांगल्या गुणवत्तेचं सोयाबीन बाजारपेठेत कमी येत असल्यानं पुढील वर्षी सोयाबीन बियाणांचे भावही चांगलेच वाढतील, असा अंदाज आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या बाजारपेठेतील चांगलं सोयाबीन बियाणांसाठी खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहेत. या कंपन्यांनी घेतलेले सीड प्लॉट अतिवृष्टीत अडचणीत आल्यानं बाजारपेठेतील सोयाबीन खरेदीकडे कंपन्यांचा कल आहे. पुढील वर्षीच्या खरीपाच्या पेरणीसाठी पुरेसं सोयाबीन उपलब्ध होणं अडचणीचं होणार असल्यानं बियाण्यांचे भावही गगनाला भिडणार आहेत. या सार्‍या परिस्थितीत एप्रिल आणि मे महिन्यात सोयाबीनचा भाव पाच हजार रुपयांपेक्षा अधिक होईल, असा अंदाज बाजारपेठेतील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.