हवे योग्य व्यवस्थापन

    दिनांक :04-Mar-2020
|
शेतमालाच्या काढणीपश्चात नुकसानीचं प्रमाण कमी करणं, अधिक काळ टिकणार्‍या वाणांची लागवड, बागांमध्ये योग्य पद्धतीच्या मशागतीचा अवलंब, काढणी, हाताळणी, पॅकिंग, साठवणूक आणि वाहतुकीच्या योग्य पद्धतीचा अवलंब यासारख्या उपायांमुळे फळं आणि भाजीपाल्याचं काढणीपश्चात नुकसान कमी होऊ शकतं. शेतमालाच्या काढणीपूर्वी आणि नंतर रसायनांचा, संजीवकांचा आवश्यक मात्रेत वापर आणि विक्रीची योग्य पद्धत यातूनही हे नुकसान कमी केलं जाऊ शकतं. त्याच बरोबर शेतमालाची प्रतवारी, पॅकिंग, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास फळं आणि भाजीपाल्याचा पुरेपूर वापर होऊन नुकसान कमी करता येण्यासारखं आहे. 

bhaji _1  H x W 
 
 
सर्वसाधारणपणे फळं आणि भाजीपाल्याची स्वच्छता, मेणाचा थर देणे आणि प्रतवारी करण्यासाठी स्वयंचलित व्यवस्था उपयोगाची ठरते. शिवाय काही महत्त्वपूर्ण फळांची हाताळणी हळूवार आणि सुयोग्य पद्धतीने होणंही गरजेचं असतं. त्याच बरोबर या पिकांसाठी आवश्यक तापमान, आर्द्रता याकडेही लक्ष दिलं जायला हवं. विशेषत: अलीकडच्या काळाचा विचार करायचा तर तापमानामध्ये वारंवार अनपेक्षित बदल होऊ लागले आहेत. हा जागतिक तापमानवाढीचा परिणाम असल्याचा संशोधकांचा निष्कर्ष आहे. या तापमानवाढीला आळा घालण्याचे प्रयत्न सुरू असले तरी त्यांना अजुन म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. अशा स्थितीत हवामानात अचानक होणारे बदल अनेक फळं तसंच भाजीपाल्यांसाठी हानीकारक ठरणारे आहेत. शिवाय अवकाळी पडणारा पाऊस तसंच अनपेक्षितपणे थंडीचं वाढतं प्रमाण या बाबीही शेती व्यवसायासाठी चिंताजनक ठरतात. अशा परिस्थितीत फळांसाठी योग्य तापमान निर्माण करणं तसंच त्यांचं संरक्षण या बाबींचा विचार होणं आणि योग्य उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे.
 
 
शेतमालाचं बाह्य आवरण चांगलं ठेवण्यासाठी आणि आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी मेणाचा थर देणं उपयुक्त ठरतं. शिवाय प्रतवारी आणि दर्जानुसार वर्गीकरण केल्यास अधिकाधिक मूल्यवृद्धी होण्यास मदत होते. शेतमाल अधिक काळ टिकण्यासाठी आवश्यक सुक्ष्म वातावरण निर्मितीमध्ये योग्य पॅकेजिंगचा वाटा मोठा असतो. उदाहरणार्थ नियंत्रित वातावरणातील शेतमाल लहान क्रेटस्‌मध्ये तसंच निर्यातीसाठी पॉलिथीनच्या विशिष्ट हवाबंद पिशव्यांमध्ये अथवा आर्द्रता प्रतिरोधक फायबरबोर्डच्या पेट्यांमध्ये भरला जातो. निर्यातीसाठी योग्य कंटेनर हा विशिष्ट गुणधर्मांनी युक्त असावा. त्यासाठी योग्य साहित्य वापरून तयार केलेलं पॅकिंग वापरणं आवश्यक ठरतं. अशा पॅकिंगचे महत्त्वाचे गुणधर्म म्हणजे चिवटपणा, दबाव सहन करण्याची क्षमता, छिद्र पडण्याला प्रतिबंध, क्षमता असलेले आणि दिसायला आकर्षक हवे. पॅकिंगवर एका बाजूस आतील मालाची पूर्ण माहिती छापलेली असावी. त्यामध्ये मालाचा प्रकार, पाठवण्याचे नाव, तांत्रिक तपशिल, वजन, उत्पादनाचं ठिकाण यांचा समावेश असावा.
 
 
आणखी एक बाब म्हणजे आंबा, संत्री, केळी यासारखी फळं पिकवण्यासाठी, तापमान आणि आर्द्रता नियंत्रित करण्याची व्यवस्था लागते. त्यानंतर हा शेतमाल टिकवण्यासाठी तापमान आणि आर्द्रता विशिष्ट पातळीवर कायम ठेवावी लागते. या प्रक्रियेनंतर शेतमाल विशिष्ट तापमानाला शीतगृहात पाठवला जातो. यात विघटनाची गती कमी करून माल खराब होण्यास प्रतिबंध करणे हा शीतकरणाचा मुख्य उद्देश आहे. या बाबी लक्षात घेता उत्पादनाच्या ठिकाणी पूर्व शीतकरण, नियंत्रित तापमानात हाताळणी आणि साठवणुकीची सुविधा याबरोबरच मालाची ठोक विक्री केंद्रापर्यंत वाहतूक याबाबत शेतकर्‍यांमध्ये जागृती निर्माण होणं गरजेचं आहे. एकंदर काढणीपश्चात शेतमालाचं होणारं नुकसान टाळता आल्यास तोही महत्त्वाचा दिलासा ठरणार आहे.