परीक्षा : विद्यार्थी आणि पालकांची!

    दिनांक :05-Mar-2020
|
मीरा टोळे
 
सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे, तर दहावीची परीक्षा नुकतीच सुरू झाली आहे. हळूहळू विद्यापीठाच्या परीक्षाही सुरू होतील. परीक्षांचा काळ हा विद्यार्थी आणि पालक दोघांकरिताही अटीतटीचा असतो. वर्षभर मुलांनी केलेल्या मेहनतीला यश मिळावे या अपेक्षेत शिक्षक, पालक असतात. या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनाही आपल्या भवितव्याची काळजी असल्याने त्यांनाही ताण असतो. 
 
palak _1  H x W
 
 
परीक्षा जवळ आली, की- विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जाण्याचे प्रमाण वाढायला लागते. या ताणातूनच निर्माण होणारी भीती आणि नैराश्य यामुळे त्यांच्यात नकारात्मकता यायला लागते. परीक्षेच्या काळात मुलांशी योग्य सुसंवाद साधल्यास हा तणावकमी होण्यास निश्चितच मदत होते.
 
 
जो विद्यार्थी अगदी पहिल्या दिवसापासून अभ्यास करतो, त्यालाही परीक्षा जवळ आली की ताण येतो. आजकालच्या स्पर्धेच्या काळामध्ये प्रत्येकजण मार्क्स मिळवण्याच्या मागे लागला आहे. पण, आपल्यात वेगळे काय आहे, जे आपल्याला पुढील आयुष्यात कामी येईल, याबाबत कोणीही विचार करीत नाही. त्यामुळे मुलांना परीक्षेच्या वेळेस नैराश्याला सामोरे जावे लागते. त्याचा परिणाम त्यांच्या खाण्या-पिण्यावर होतो आणि त्यांच्या आरोग्यावरसुद्धा होतो. पालकांच्या मुलांबद्दलच्या अवास्तव अपेक्षाही या परिस्थितीला कारणीभूत आहेत. अशावेळी पालकांनी मुलांना समजून घेतले पाहिजे.
 
 
वर्षांन्‌ वर्षे एकाच परंपरागत मार्गावरून चालताना मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. त्यामुळे जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी धडपडणारा आजचा युवा प्रत्यक्ष जीवनात येणार्‍या कठीत परिस्थितीशी लढण्यास मात्र असमर्थ ठरतो. अनेक विद्यार्थी परीक्षेच्या धास्तीने वेळेवर आजारी पडतात. कुणाला नैराश्य येते. अशा स्थितीत पालकांनी मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे.
 
 
पालकांच्या व्यस्त जीवनात त्यांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही, हे मान्य आहे; परंतु शाळांमध्ये होणार्‍या पालकसभांना जरी ते उपस्थित राहिले तरी त्यांना आपल्या पाल्यांच्या प्रगतीबाबत माहिती मिळू शकते. त्यांची शैक्षणिक प्रगती, त्याची वर्गातील उपस्थिती, त्याच्या संगती, शाळा-कॉलेजातील विविध उपक्रमांत त्याचा सहभाग या सगळ्याची माहिती करून घेणे आज अत्यंत आवश्यक आहे.
 
 
ज्या गोष्टींमध्ये मुलांना रस आहे, ते शिक्षण द्या. परीक्षा आपल्यासाठी आहेत, आपण परीक्षेसाठी नाही, याची जाणीव मुलांना पालकांनी करून देण्याची गरज आहे. विद्यार्थीदशेमध्ये उत्तम गुण प्राप्त करूनही कित्येक मुले अयशस्वी ठरतात. परंतु कधी कधी एखादा सामान्य मुलगाही उत्तम आयुष्य जगतो. परीक्षा महत्त्वाच्या आहेत, पण त्या सर्वस्व असू शकत नाहीत. हे ज्यावेळी मुलांच्या मनावर बिंबेल तेव्हा परीक्षेची भीती उरणार नाही.
 
 
तेव्हा मुलांनो, न घाबरता परीक्षेला सामोरे जा... यश नक्कीच तुमच्या हातात येईल!!