असामान्य संघर्षाची कहाणी

    दिनांक :05-Mar-2020
|
सर्वेश फडणवीस
 
 
उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. वसंत ऋतूचे आगमन झाले आहे आणि आंब्याला मोहोर बहरलेला आहे. बहराच्या मोसमात दूर सातपुड्याच्या पर्वतरांगेत बैरागड या गावात एक दाम्पत्य त्यांच्या कार्यातून बहरत आहे आणि आज हा मेळघाटावरील मोहोर ‘पद्मश्री’ या बिरुदाखाली अधिक बहरतो आहे.
 
 
आत्मचरित्र कायमच वेगळी प्रेरणा देत असतात. मेळघाटावरील मोहर : डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे हे मृणालिनी चितळे लिखित राजहंस प्रकाशन, प्रकाशित पुस्तकही याच प्रकारचे आहे. कोल्हे दाम्पत्याविषयी आणि मेळघाटात त्यांनी उभ्या केलेल्या कामाविषयी अधूनमधून कुठे ना कुठे बातम्या-लेख वाचनात येत असतात, पण या पुस्तकातून त्यांच्या कामाची संपूर्ण माहिती तीही अतिशय वाचनीय स्वरूपात समजते. 

kolhe _1  H x W 
 
 
मेळघाट हा सातपुडा पर्वताच्या डोंगर रांगांतील घनदाट अरण्याने व्यापलेला प्रदेश. त्यातले बैरागड म्हणजे तीन नद्यांच्या त्रिकोणात असलेले बेटासारखे गाव. तिथल्या लोकांसाठी आपलं आयुष्य वेचणार्‍या डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांच्या असामान्य संघर्षाची ही कहाणी आहे. मेळघाटातील बैरागड या गावात कोल्हे दाम्पत्याला भेटायला जाणेही किती यातायातीचं आहे, याची कल्पना लेखिकेच्या प्रास्ताविकातून येते. सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात वसलेलं हे गाव जेमतेम दोन हजार वस्तीचं. पुणे-नागपूर, नागपूर-धारणी, धारणी-बैरागड असा प्रवास. पावसाळ्यात धारणीच्या पुढे रस्ते बंद. 40 कि.मी. अंतर पायी चालत बैरागड गाठावं लागतं. या भागाकडे शासनाचं दुर्लक्ष. रस्ते नाहीत. वीज नाही. मग शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे आवश्यक सुविधांविषयी तर बोलायलाच नको. अशा ठिकाणी कोल्हे दाम्पत्याने केलेले काम समाजासमोर यावं, या लेखिकेच्या तळमळीतून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. 

kolhe _1  H x W 
 
 
मेळघाट म्हटलं, की कुपोषणाचा प्रश्न- एवढेच समीकरण आज आपल्याला माहिती आहे. पण मेळघाटातल्या माणसांच्या जगण्याचे इतरही अनेक आयाम समजून घेत, तिथले शक्य तितके प्रश्न शासन दरबारी मार्गी लावण्याची जी धडपड कोल्हे दाम्पत्य करीत आहे, त्याची तपशीलवार ओळख लेखिकेनं या पुस्तकाद्वारे करून दिली आहे. एखाद्या ठिकाणाला आपली कर्मभूमी मानून तिथे रुजायचं म्हणजे काय, हे या पुस्तकातील त्यांचा जीवनपट वाचताना समजत जातं. जिथे आपण राहतो, तिथले लोक, त्यांचे रोजचे जगण्याचे प्रश्न, त्यासंबंधीची आस्था- हे सारं आपल्याही जगण्याचा भाग झाले तर ते रुजणं. कोल्हे दाम्पत्याचं मेळघाटात रुजून जाणं या पुस्तकातून उलगडतं आणि कार्याची प्रेरणा, निष्ठा, प्रामाणिकपणा, यांचा प्रत्यय पुस्तकातल्या अनेक घटनेतून जाणवतो.
 
 
घरातून कोणताही पािंठबा आणि आधार नसताना अशा प्रकारच्या सामाजिक कामांची कोणतीच पूर्वपरंपरा नसताना आणि जन्मापासून हृदयाचा गंभीर आजार असताना केवळ आत्मशक्तीच्या बळावर एखादी व्यक्ती केवढं काम उभारू शकते, याचं उदाहरण म्हणजे हे बैरागडचे कार्य आहे. डॉ. रवींद्र कोल्हे यांनी मध्ये मेळघाटात पहिलं पाऊल कसं टाकलं आणि ते कसं स्थिरावू लागलं याची स्वतः या दाम्पत्यानी सांगितलेली कथा लेखिकेने फार आत्मीयतेने मांडली आहे.
 
 
समाजकार्य करीत असताना आपण कौटुंबिक जबाबदार्‍या झटकून टाकतोय्‌, या भावनेनं निर्माण होणारा ताण, त्यावर मात करणारी, गांधीजींचे विचार प्रत्यक्षात उतरवण्याची ओढ, खरीखुरी रुग्णसेवा करण्याची दुर्दम्य इच्छा, ज्या गावात डॉक्टर नाही अशा ठिकाणी काम करण्याचा झालेला निश्चय आणि त्यातून मेळघाटातील बैरागडची केलेली निवड, हा डॉक्टरांचा प्रवास आशयपूर्ण शब्दांत मांडला आहे.
 
 
डॉ. स्मिता कोल्हे यांच्यासारखी सहधर्मचारिणी त्यांना लाभली आणि कार्य आज यशोशिखरावर जातं आहे. त्यांच्या विवाहाची हकिकत मुळातूनच वाचावी इतकी विलक्षण आहे. मुलांचे जन्म, त्यांचं साप- विंचू - बेडूक- सरडे यांच्या सोबत असलेलं बालपण, त्यांचे आजार, शिक्षण हे सगळं इतर अनेकींप्रमाणे स्मिताताईंनी केलंच; पण आपलं कायद्याचं ज्ञान, वैद्यकीय ज्ञान यांच्या आधारे तिथल्या समाजजीवनाशी त्या कशा समरस होत गेल्या, तिथल्या स्त्रियांच्या प्रश्नात कशा गुंतत गेल्या, अगदी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवून ती जिंकून दाखवण्यापर्यंत स्वतंत्रपणे त्यांचंही काम कसं विस्तारत गेलं, याचा प्रत्यय पुस्तकातून येतो. रुग्णसेवेबरोबरच या पती-पत्नींच्या कामाचे स्वरूप लोकांच्या गरजेनुसार हळूहळू वाढत गेला. कधी शिक्षणातून, कधी उत्सव-सभेमधून, तर कधी कायद्याचा धाक दाखवून झाले.
 
 
लोकशिक्षणात हे दाम्पत्य सातत्याने कार्यरत आहे. स्वस्त धान्य दुकान चालवणं, धर्मातराच्या प्रश्नात लक्ष घालणं, शेतीचे प्रयोग करणं, दूध आणि भाजी विक्री करणं असे नाना उद्योग राबवत आहे. कुठलीही संस्था न उभारता किती काम करता येतं, याचा वस्तुपाठच त्यांच्या जगण्यातून मिळतो. हे सगळं कसं घडलं ते जाणून घेण्यासाठी मेळघाटावरील मोहर वाचायलाच हवं. कुठेही भारावून न जाता परिस्थितीची जाणीव आणि त्या जाणीवेतून होत असलेल्या कार्याची दखल या पुस्तकात घेतलेली जाणवते. लेखिका मृणालिनी चितळे यांनी समतोल साधत लिखाण केले आहे आणि ते वाचतांना जाणवते.
 
 
कोल्हे दाम्पत्याचं कार्य आजही अविरतपणे सुरूच आहे. असंच काहीसं सामाजिक काम करावं, असं आपल्यालाही वाटून जातं पण या वाचनाच्या प्रवासातून आपण वास्तवात येतो आणि प्रखरपणे जाणवतं की- कामाप्रतीची अपार निष्ठा, त्याग आणि संपूर्ण समर्पण जेव्हा एकरूप होतात, तेव्हाच निर्माण होतं कोल्हे दाम्पत्याचं मेळघाटातील कार्य आणि कुठेतरी त्या कार्याप्रति नतमस्तक होऊन आपुसकच हात जोडले जातात. आज अवतीभवती अशी जगावेगळी काम करणारी माणसे असल्याने जग पुढे जात आहे हाच अनुभव पुस्तक वाचताना येतो. अत्यंत वाचनीय व संग्रही असावे असेच हे पुस्तक आहे.