इमॅटिनीबची गोष्ट

    दिनांक :06-Mar-2020
|
एक होता कॅन्सर! रक्ताचा कॅन्सर! खूप मोठ्या संख्येने हा कॅन्सर लोकांना होत नसे. जंग जंग पछाडून ज्याचे उपचार डॉक्टर-शास्त्रज्ञ-रसायनतज्ज्ञांनी शोधावे, असा काही त्याचा दरारा नव्हता. पण शेवटी कॅन्सरच तो! ज्याला झाला त्याला तर त्याचा एकुलता एक जीव तीन-पाच वर्षांत गमवावा लागे! कर्करोगाच्या संशोधनाचा धगधगता यज्ञ पश्र्चिमेत चालू होता. एकीकडे कर्करोगाच्या पेशींची वैशिष्ट्ये, अगदी त्यांच्या अंतरंगातल्या जनुकीय माहितीपर्यंत पोचून उलगडण्याचा धडपड होती, तर दुसरीकडे निरोगी पेशींना अभय देऊन फक्त कर्करोगाचे शरसंधान करतील, अशा औषधांसाठी अगदी झपाटल्यासारखा शोध सुरू होता. औषध कंपन्या पैसा ओतत होत्या. नवनवीन औषधांच्या चाचण्या होत होत्या. या सार्‍या धुमश्र्चक्रीत क्रोनिक मायलॉईड ल्युकेमिया अर्थात उचङ-ज्या रक्ताच्या कॅन्सरची ही कथा आहे - तो एकदम प्रकाशात आला, 1973 मध्ये. जेनेट रोवली यांनी ‘सीएमएल’मधली मेख शोधली होती. पेशींच्या केंद्रिंबदूमध्ये 22 आणि 9 या दोन गुणसूत्रांची चुकून एकमेकांशी गाठ पडलेली असे! रंगीत, नाजूक रेशमी धाग्यांच्या विकायला ठेवलेल्या जोड्या पहिल्या आहेत का कधी? मधोमध छोट्या कागदी लेबलने हलकेच जोडलेल्या असतात आणि अगदी शिस्तीत राहतात. त्यांच्या मध्ये जर लाल आणि हिरव्याची एकाच बाजूला अदलाबदल झाली तर -कॅन्सर, सीएमएल! किती महत्त्वाची आहे रचनेतील सूक्ष्मता!!
 
 
imanitib_1  H x
 
असो. मग पुढे काय झाले? संशोधनाची पावले अजून एक दशक चालून पुढे गेली आणि 1984 मध्ये ओळख तर पटली, पण या घातक संयोगाजवळ असे कोणते अस्त्र होते की ज्यामुळे कॅन्सर होई? रक्तातल्या लाल आणि पांढर्‍या पेशी तयार करण्याचे कारखाने ठराविक महत्त्वाच्या हाडांच्या कडेकोट बंदोबस्तात असतात. इथे ‘प्रोडक्शन’ अगदी शिस्तीत चालते. संसर्ग असो की लोहाची कमतरता, त्याचे पडसाद कामगारांच्या संपाचे कारखान्यात उमटावे तसे लगेच दिसतात. पण सीएमएलला नियम मान्य नाहीत. पांढर्‍या पेशींना बेसुमार वाढीच्या चक्रात लोटून आणि अगदी नवजात, अपरिपक्व पेशींनादेखील कारखान्यातून बाहेर रक्तप्रवाहात वळते करून सीएमएलचा खेकडा आपला फास लावतो. लाल रक्तपेशींचा जीव कोंडतो-ऍनेमिया होतो. भारंभार पांढर्‍या पेशींमुळे पानथडी तुंबून जाते आणि हळूहळू अराजक माजते - शत्रू िंजकतो. बीसीआर-अेबीएल हे सारे घडवून आणणारे प्रोटीन तयार करतो. 1987 मध्ये टायरोसीन कायनेज हे ते प्रोटीन असल्याचा उलगडा झाला. अशी ही एका कॅन्सरची गोष्ट कासवाच्या गतीने पुढे सरकत होती. संशोधनाला वर्षांन्‌ वर्षे वेळ लागतो, दरम्यान या कॅन्सरचे निदान रुग्णाला सांगणारे डॉक्टर, त्यांच्या हाती असलेले माफक उपचार करत होते. डॉक्टर आणि रुग्ण यांच्या आयुष्यात काहीच बदलले नव्हते.
 
 
 
स्वित्झर्लन्डमधील सिबा-गिजी या औषध कंपनीच्या संशोधन विभाग अजून सीएमएलच्या अंतरंगातील रहस्यापासून अनभिज्ञ होता. 1980 च्याच दशकात अजून गुणसूत्रांच्या गडबडीमुळे झालेली नवी सशपश आणि तिचे प्रोटीन समोर येण्यापूर्वी या संशोधन विभागातील मॅटर आणि लीडन यांना समुद्रातील एका बॅक्टेरियाच्या विषाने प्रेरणा दिली. शरीरातील अनेक कायनेज प्रोटीन या विषामुळे पूर्णपणे निष्प्रभ होतात, हे लक्षात आल्यावर विशिष्ट कायनेजला निष्प्रभ करणारे रसायन प्रयोगशाळेत का बनवू नये ? असे त्यांच्या मनाने घेतले. ’ज्ञळपरीश ळपहळलळींेी’ अर्थात कायनेजचे अवरोधक प्रयोगशाळेत तयार होऊ लागले. रसायनतज्ज्ञांची प्रतिभा आणि शास्त्र कोणत्याही संयुगाचा त्रिमितीय दृष्टीने विचार करते. त्यांना त्याचा आकार, त्यातल्या खाचा, त्याचा विद्युतभार सारे समोर दिसते. त्यामुळे त्या प्रयोगशाळेत कायनेजच्या कुलुपाला बसणार्‍या असंख्य किल्ल्या तयार होऊ लागल्या. किल्लीच्या रचनेत वेगवेगळे बदल केल्याने कोणकोणते गुणधर्म कसे बदलतात, याचा आराखडा तयार होऊ लागला. प्रयोगशाळेत पेशींवरचे परिणाम विषारी नाहीत ना? हे पहिले जाऊ लागले. या काळात लीडन अमेरिकेला कुलूप शोधण्यास गेले!! निर्मितीची गंमत पहा- आपण करत असलेल्या कामाला जैव विज्ञानात स्थान आहे याची यांना कल्पना होती. कर्करोगाशीच त्याचे काही नाते निघणार याचीही जाणीव होती, पण किल्ली तयार करून आता हिच्या योग्य कुलूप कोणते हे त्यांना शोधावे लागले! बोस्टन येथील नामांकित कॅन्सर संस्थेमध्ये काम करणार्‍या नव्या दमाच्या ब्रायन ड्रकर यांना लीडन भेटले. ड्रकर संशोधन तर करत होतेच पण ते प्रत्यक्ष रुग्णांवर उपचारही करत होते. त्यांनी अचूक ओळखले, की- आजपर्यंत ज्याची केवळ कल्पना केली असे यश साकारण्याचा मार्गावर आहे. कोड्याचे दोन एकमेकात बसणारे भाग त्यांनी जवळ आणायचा निश्र्चय केला. एका कॅन्सरच्या पत्रिकेतली ग्रहदशा बदलली! 1992 मध्ये इटलीत झालेल्या जागतिक सीएमएल परिषदेत निराशेशिवाय दुसरे काही नव्हते. हा कॅन्सर औषधांना मुळातच दाद देत नाही, अशा निष्कर्षाप्रत येताना त्यांना आसमंतातील नव्या बदलाची चाहूल लागली नव्हती. पण इतक्या सहजपणे बलाढ्य शत्रूवर विजय मिळत नसतो!
 
 
 
बोस्टनमधील कॅन्सर संस्था आणि स्विस औषध कंपनी यांच्यात हे संशोधन पुढे नेण्यासाठी एकमत होऊच शकले नाही! एका ब्रेकथ्रू शोधाच्या इतके जवळ असताना संशोधक आणि औषध कंपनी यांच्यात आवश्यक तो करार झाला नाही!! 1993 मध्ये ड्रकर यांनी बोस्टन सोडून पोर्टलँड येथील ओएचएसयू येथे स्वतःच्या प्रयोगशाळेत काम सुरू केले. त्यांनी लगेच लीडन यांच्याशी पुन्हा संपर्क साधला. लीडन म्हणाले- आता आमच्याकडे अजून जास्त किल्ल्या आहेत! ड्रकर यांना ओएचएसयूकडून प्रयोगाची परवानगी मिळाली. कोणीही त्यांच्या प्रस्तावित प्रयोगाला खूप गांभीर्याने घेतले नाही, जणू काही पराजयाची सगळ्यांना खात्रीच होती! प्रयोगशाळेत सीजीपी 57148 या त्यांनी निवडलेल्या कायनेज अवरोधकाच्या चाचण्या सुरू झाल्या. पेट्री डिश मधील कर्करोगाच्या पेशींमध्ये जेव्हा सीजीपी 57148 टाकले तेव्हा एखाद्या चमत्कारासारख्या कर्करोगाच्या पेशी लागलीच मरण पावल्या!!! डोळेच दिपले! उंदरावर प्रयोग केले. म्हणता म्हणता कर्करोग दिसेनासा होऊ लागला! रुग्णांच्या पेशीनिर्मितीच्या कारखान्यातून घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यांना तपासले. पुन्हा तेच! पूर्ण यश!! आभाळ ठेंगणे झाले!
 
 
 
या काळात सिबा-गिजी आणि सॅन्डोज या दोन्ही कंपन्या एकत्र येऊन नोव्हार्टीस ही नवी कंपनी तयार झाली होती. वास्तविक पाहता नोव्हार्टीस अगदी मोठ्या यशाच्या उंबरठ्यावर येऊन उभी ठाकली होती, पण नोव्हार्टीसला मात्र हे दिसत नव्हते.
 
 
 
जो कॅन्सर दर वर्षी केवळ काही हजार लोकांना होतो त्याच्या औषधात पैसा कसा लावायचा? खरेच ते यशस्वी होईल का? त्यांनी सीजीपी 57148 ला निर्मिती, चाचण्या, मंजुरी या प्रक्रियेसाठी स्वीकारायला नकार दिला!
 
 
 
दुर्दैवाने एखाद्या चमत्कारासारखे असणारे औषध, निर्मितीसाठी घ्या अशा विनवण्या संशोधकाला कंपनीकडे कराव्या लागत होत्या.
 
 
ड्रकर यांनी नोव्हार्टिसला सांगितले-‘मी रोज रुग्ण पाहतो आणि रोज माझा निश्र्चय अजून ठाम होतो. तुम्हाला नको असेल तर मी माझ्या प्रयोशाळेतच निर्मिती सुरू करतो!
 
 
अखेर, 1998 मध्ये नोव्हार्टीसने सीजीपी 57148 चे काम हाती घेण्याचे मान्य केले! त्याला नाव दिले इमॅटिनीब! तिथून पुढे एका कॅन्सरची कथा ही इमॅटीनीबची यशोगाथा होत गेली. रोज केवळ एक गोळी घेऊन वर्षांन्‌ वर्षे सीएमएलचे रुग्ण उत्तम दर्जाचे, निर्धास्त आयुष्य जगू लागले. औषधाचे दुष्परिणाम अगदी नगण्य-कारण केवळ जिथे दोषी प्रोटीन आहे तिथेच जाऊन शरसंधान! शास्त्रज्ञ, डॉक्टर आणि रुग्ण यांनी एकत्रितपणे इच्छिलेलं कल्पतरूचं फळ म्हणजे इमॅटिनीब! वैद्यकशास्त्राने ज्याचे अनादी काळापासून स्वप्न पाहिले होते त्याचे मूर्तिमंत रूप म्हणजे इमॅटिनीब! एका कॅन्सरवर मिळवलेल्या निर्विवाद विजयाचे प्रतीक म्हणजे इमॅटिनीब!एका कॅन्सरच्या गोष्टीचा शेवट म्हणजे इमॅटिनीब!
 
• डॉ. मानसी अमित कविमंडन
8308815001