देहदानाची सुरुवात स्वतःपासून व्हावी

    दिनांक :06-Mar-2020
|
नाही रूप रूबाब सौष्ठव तसे आरोग्य नाही जरी
देहाचा मग लोभ काय म्हणूनी असावा तरी!
कवीवर्य मंगेश पाडगावकरांच्या ‘मृत्यूला म्हणतो’ या कवितेचं मी नुसतं वाचनच केलं नाही, तर िंचतनही केलं. आपण रूपवान नाही, धनवान नाही, ज्ञानी नाही, कोणत्याही क्षेत्रातील नामवंत नाही. काहीच नसतानासुद्धा जगण्याचा मोह मात्र सुटला नाही. अपघाताने जन्म झाला आणि हाती काहीच नसताना जगलो. लोक जगतात तसे.

donation_1  H x
 
एक गोष्ट लक्षात आली की, जे खूप धनवान होते, रूपवान होते, प्रसिद्ध होते तेसुद्धा जग सोडून गेले. आपणही एक दिवस मरणार आहोत. स्वतःसाठी जगलो स्वार्थ ठेवून. बायको मुलांवर प्रेम केलं स्वार्थ ठेवून. स्वार्थाशिवाय पानही हालत नाही. आयुष्यात कोणताही पराक्रम आपल्या हातून घडला नाही. जगातून जाताजाता तरी कोणाच्या कामी यावे, हा विचार मनाला पटला म्हणूनच तीन वर्षांपूर्वी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला.
 
 
मरणोत्तर देहदानाचे संकल्पपत्र घेऊन घरी आलो. बायको, मुलं, मुली यांना एकत्र बसवलं आणि म्हणालो, मी तर देहदानाचा संकल्प केला आहे. या वचनपत्रावर तुम्ही स्वाक्षर्‍या करा. तुमची सहमती असल्याशिवाय माझ्या मृतदेहाचं दान होणार नाही. हे ऐकून बायको-मुले स्तब्ध झाली. त्यांना आश्र्चर्याचा धक्का बसला. थोडा वेळ शांततेत गेला. ही काय आताच अवदसा आठवली असे ते म्हणाले. मुलांवर लहानपणापासून प्रेम केलं, बायकोवरही प्रेम केलं म्हणून आपला पालक मरू नये, असं त्यांना वाटतं; पण हे वाटणं निरर्थक आहे, हे मी त्यांना सांगितलं. मी देहदानाचा निर्णय त्यांना न पटणारा, न सहन होणारा होता. तरीही मी माझ्या निश्र्चय व निर्णयावर ठाम आहे.
 
 
जिवंत असेपर्यंत आपण एकमेकांवर प्रेम करतो, एकमेकांची काळजी घेतो जीवनाचं हेच खरं तत्त्वज्ञान आहे. मी त्यांना म्हणालो, तुमचं माझ्यावर प्रेम आहे, माझंही तुमच्यावर प्रेम आहे. हे माणूस म्हणून आपण केलं; पण मी मरेल त्या दिवशी मरणानंतरच्या चार तासात माझा मृतदेह सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला दान करावा, अशी माझी इच्छा आहे. हे सांगताना सर्वांना गहिवरून गेले. तरीही मी निश्र्चयावर ठाम राहिलो. तुम्ही जिवंतपणे जसे माझ्यावर प्रेम करता तसंच मेल्यावरसुद्धा माझ्या शवावर कराल काय? हे जीवन क्षणभंगुर आहे. मेल्यावर त्याची माती होते. आपले एकमेकांवर कितीही प्रेम असलं, तरी ते शव घरात ठेवता येत नाही. त्याला जाळून िंकवा पूर्ण नष्ट करावंच लागते. ही गोष्ट खरी असली, तरी कोणालाही न पटणारी आहे. कारण आपण अनेक वर्ष जिवंत रहावे असेच प्रत्येकाला वाटत असतं; पण या वाटण्याला काहीही अर्थ राहत नाही. माणूस मेल्यानंतर त्याच्या विरहाने प्रत्येक जण व्याकुळ होतोच हे माणूस मनाचे लक्षण आहे. मृत्यूच्या बाबतीत सर्वचजण संवेदनशील असतात; पण ही भावना कर्तव्यात रूपांतरित झाली तरच योग्य असते.
 
 
माझ्या आग्रहाखातर सर्वांनीच देहदान वचनपत्रावर स्वाक्षर्‍या केल्या, तरीही विचारमंथन सुरूच राहिलं. आपणही एक दिवस हे जग सोडून जाणार या विचारांची मानसिकता त्यांच्यामध्ये आली. ही घटना तीन वर्षांपूर्वीची. त्यानंतर माझ्या पत्नीसह सर्वच मुला-मुलींनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला. तेव्हापासून अवयवदान, देहदान या एकाच विषयावर ध्यास आणि अभ्यास सुरू झाला. ज्या गोष्टी माहीत नव्हत्या, त्या जाणून घेतल्या आणि पूर्णवेळ अवयवदान चळवळीला वाहून घेतलं.
 
 
देशाचे रक्षण करणारे सैनिक, अग्निशामक दलाचे कर्मचारी, पोलिस, गंभीर जखमी प्रवासी जेव्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल होतात, तेव्हा त्यांना वेगवेगळ्या अवयवांची गरज भासते. परंतु, त्यांना अवयव मिळत नाहीत म्हणून त्यांना प्राणास मुकावे लागते. अवयवदानाच्या बाबतीत आपल्या समाजात प्रचंड गैरसमज, ज्ञान आणि अंधश्रद्धा आहे, म्हणूनच सर्वसामान्य माणूस अवयवदान करण्यास पुढे येत नाही. त्याचे हे अज्ञान दूर करणे आणि अवयवदान चळवळीला पुढे नेणे हे सुज्ञ माणसाचे काम आहे. माणसाचा जीव वाचविणे हेच मोठे पुण्यकर्म आहे आणि हाच मोठा धर्म आहे. म्हणूनच अवयवदान, देहदान याची सुरुवात स्वतःपासून व्हावी.
 
•माधव अटकोरे
80875 65172