आत्मप्रज्ञ होणे म्हणजे अध्यात्म

    दिनांक :07-Mar-2020
|
वसंत मोरेश्र्वर दिढे(मामा)
 
 
अध्यात्म या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे. मोजक्या शब्दात अध्यात्म मांडता येणार नाही अन सांगताही येणार नाही. अध्यात्म हे जगायचे असते. अनुभवायचेही असते. जो अध्यात्म जगतो, त्याला मोक्ष प्राप्ती होते, हे निश्चित! आता अध्यात्म जगणे म्हणजे नेमके काय? तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे जे म्हणून कार्य करतो, ते सगळे मनापासून करावे, प्राामणिकपणे करावे, नि:स्वार्थ भावाने करावे, इतरांच्या कल्याणासाठी करावे, याला म्हणतात अध्यात्म जगणे! स्वत:साठी तर सगळेच जगतात. नोकरी करतात, पगार मिळवतात, मिळालेला पैसा स्वत:साठी आणि कुटुंबासाठी खर्च करून आनंद मिळवितात. हे तर सगळेच करतात. पण, आपल्यापैकी अनेक जण असे आहेत, जे इतरांसाठीही आपल्या कमाईतील काही भाग खर्च करून त्यांच्या चेहर्‍यावर आनंद निर्माण करतात. याला परमार्थही म्हणता येईल. अध्यात्म आणि परमार्थ यात मला तरी फार फरक दिसत नाही. प्रभू श्रीरामचंद्रांनी या भूतलावर कशासाठी अवतार घेतला होता हो? त्यांचा काही स्वार्थ होता का? अजीबात नाही. भूतलावर राहणार्‍या लोकांचे कल्याण करण्यासाठी प्रभू श्रीराम मनुष्य जन्म घेऊन आपल्यात अवतरले, आपल्यासारखेच राहिले. प्रसंगी त्यांनी 14 वर्षे वनवासही भोगला. प्रत्यक्ष राजगादी मिळत असतानाही त्याकडे पाठ फिरवून ते वनवासात गेले. त्यांचे जे जगणे होते, ते खरे अध्यात्म आहे. आता आपल्यापैकी कुणाला असे करायला जमेल? क्वचित एखाद्याला. मग, अध्यात्म जगायचे कसे? प्रामाणिक राहून, खरे बोलून, इतरांची सेवा करून, इतरांच्या चेहर्‍यावर आनंद निर्माण करून, इतरांची दु:खे हलकी करून, स्वकर्तव्ये पार पाडून अध्यात्म जगता येते की! 
 
pongal _1  H x
 
 
आपल्यात जे चेतना तत्त्व आहे ते जाणून घेणे, त्याचे मनन करणे आणि त्याचे दर्शन करणे अर्थात, स्वत:च्या बाबतीत जाणून घेणे वा आत्मप्रज्ञ होणे म्हणजे अध्यात्म होय. गीतेचा आठवा अध्याय जर आपण वाचला तर त्यात अध्यात्माचा अर्थ आपल्याला सापडेल. स्वत:चे स्वरूप अर्थात जीवात्मा यालाच अध्यात्म म्हटले गेले आहे. आत्मा हा त्या परमात्म्याचा अंश आहे, हे तर सर्वविदितच आहे. जेव्हा यासंदर्भात शंका येते, संशय येतो, अविश्वासाची भावना निर्माण होते, तेव्हा आपण अंतर राखून वागायला लागतो, स्वत:ला यशस्वी बनविण्यासाठी वेगळ्या प्रकारे प्रयत्न करायला लागतो, विशेषत: निरर्थक प्रयत्न करायला लागतो, तेव्हा परिणाम हा नकारात्मकच येतो, हे लक्षात घेतले पाहिजे. मातीपासून बनविलेली भांडी जर मातीपेक्षा वेगळी स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतील तर कोण काय करणार? हे तर केवळ अशक्य असते. मातीची भांडी स्वत:ची ओळख मातीपेक्षा वेगळी दाखवण्याचा प्रयत्न करूच शकत नाहीत. प्रयत्न केलाही तरी तो अयशस्वीच ठरणार. विचार करायला पाहिजे आपण सगळ्यांनीच या मुद्यावर, नाही का? त्या सर्वशक्तिमान परमात्म्याच्या निस्सीम प्रेमाचा एक अंश हा मुनष्यातही असतो. त्याची अनुभूती अनेकदा अनेक प्रसंगी आपल्याला येत असते. पण, कालांतराने आपण सांसारिक जबाबदार्‍यांमध्ये एवढे गुंतत जातो की आपल्याला त्याचा विसर पडत जातो.
 
 
सांसारिक बंधनांमध्ये आम्ही आनंदाचा शोध घेत असतो. परंतु, हळूहळू परमात्म्याचा अंश आपल्यातून लोप पावतो आणि पदरी निराशा पडते. त्यामुळे दीर्घकालीन आनंदाच्या जागी आपल्याला क्षणिक सुख तेवढे अनुभवास येते आणि पुन्हा आपण नैराश्यात ढकलले जातो. जेव्हा आपण क्षणिक संबंध, एखादी वस्तू यांना जवळ करतो, त्यांनाच आपले मानतो आणि आनंद साजरा करतो, त्यावेळी सतत आपल्यासोबत असणार्‍या शरीरालाही आपण सवयीचे गुलाम बनवतो आणि हीच बाब आपल्याला अध्यात्मापासून दूर नेत नैराश्याच्या खाईत ढकलत असते. पण, जेव्हा हे सत्य आपल्या लक्षात येते, तेव्हा आपण आयुष्याच्या अशा वळणावर येऊन थांबलो असतो, जिथे आता कशाचीही आस राहिलेली नसते. ईश्वर आपल्याला केव्हा घेऊन जाईल आणि मोक्षार्थ प्राप्त होईल, याची प्रतीक्षा आपण करीत असतो. पश्चात्तापाशिवाय आपल्या हाती काहीही उरत नाही. पण, पश्चात्ताप करून काही उपयोग नसतो. अशी स्थिती येऊ शकते याचे ज्ञान हे गुरूंकडूनच प्राप्त होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने गुरू करावा, गुरूकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळवावे. असे झाले तर संपूर्ण आयुष्यभर आपल्याला आनंदाचीच अनुभूती येईल, याची खात्री बाळगायला हरकत नाही.
 
जय श्रीराम!