क्रीडाक्षेत्रातील रणरागिणींना मानाचा मुजरा

    दिनांक :08-Mar-2020
|
मिलिंद महाजन
 
 
आधुनिक युगात महिलांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप सोडली आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान, अंतराळ सैन्यदल, राजकारण, शासन आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रात महिलांनी आपल्या बुद्धिचातुर्य, क्षमतेच्या जोरावर यशाचे शिखर गाठले. एवढेच नव्हे, तर त्या क्षेत्राचे नेतृत्व करत नवीन दिशा दाखविण्याचे कामही केले आहे. क्रीडा क्षेत्रातही अशा अनेक महिला खेळाडूंनी आपल्या क्रीडा नैपुण्य, क्षमता व कौशल्याच्या जोरावर यश संपादन केले आणि भारताचा लौकीक वाढविला आहे. 

womens_1  H x W 
 
 
कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि दृढनिश्चयतेच्या बळावर महिला खेळाडूंनी आपले ध्येय साध्य केले आणि अजूनही करण्यास प्रयत्नशील आहे. यशाच्या प्रवासात थोडीफार दुखापत झाली, तरी त्यावर मात करून पुन्हा नव्या उमेदीने, नव्या जोमाने पुन्हा लक्ष्याकडे वाटचाल करीत आहे.
 
 
विश्व बॅडिंमटन विजेती पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, कुस्तीपटू विनेश फोगाट, मिश्र मार्शल आर्टस्‌ची फायटर रितू फोगाट, सध्या टी-20 विश्वचषक गाजविणारी शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर, पूनम यादव, पॅरा बॅडिंमटनपटू मानसी जोशी, आठ वेळची विश्वविजेती बॉक्सर 38 वर्षीय एम.सी. मेरी कोम, टेनिसपटू सानिया मिर्झा, वेटलिफ्टर मीराबाई चानू, ॲथ्लिट द्युती चंद, स्वप्ना बर्मन, भारतीय हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, हॉकीपटू लालरेमसियामी, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, नेमबाज तेजस्विनी सावंत, मनू भाकेर, राही सरनोबत, अपूर्वी चंडिला, अंजुम मुदगिल, तिरंदाज दीपिका कुमारी यांच्यासारख्या महिला खेळाडू आपल्या जीवनप्रवासात जय-पराजयाची तमा न बाळगता अजूनही देशासाठी संघर्ष करीत आहेत.
 
 
पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू दीपा मलिक व ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीचे पदक जिंकणारी पहिली भारतीय कुस्तीपटू साक्षी मलिक यांच्यासारख्या खेळाडूंचा आदर्श ठेवूनच उदयोन्मुख युवा महिला खेळाडू क्रीडा क्षेत्रात पाऊल ठेवत आहे.
 
 
विश्व कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकत विनेशने टोकियो ऑलिम्पिकसाठी आपली पात्रता सिद्ध केली. कुस्तीकडून मिश्र मार्शल आर्टस्‌मध्ये पदार्पण करतानाच रितू फोगाटने मैदान गाजविले. आणि दोन आंतरराष्ट्रीय एमएमए लढती जिंकल्या. पहिली भारतीय एमएमए विश्वविजेती होण्याचे ध्येय तिने उराशी बाळगले आहे.
 
 
सोळा वर्षीय शफाली वर्माने सध्या सुरु असलेल्या महिलांच्या टी-20 विश्वचषकात दिमाखदार फलंदाजी केली. या कामगिरीच्या बळावरच आयसीसीच्या जागतिक टी-20 महिला क्रिकेट मानांकनात फलंदाजीमध्ये अव्वल स्थान पटकावले. पूनम यादवनेही साखळी फेरीत प्रभावी गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांमध्ये आपला धाक निर्माण केला. आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली असून आपल्या दमदार फलंदाजीच्या बळावर शफालीच भारताला विश्वचक जिंकून देईल अशी अपेक्षा आहे.
 
 
2019 सालची विश्वविजेती आणि रिओ ऑलिम्पिकचे रौप्यपदक विजेती बॅडिंमटनपटू पी. व्ही. सिंधू तसेच लंडन ऑलिम्पिकचे कांस्यपदक विजेती सायना नेहवाल यांची साहस, मनोबल आणि दृढनिश्चयता प्रशंसनीय आहे. कठोर परिश्रम आणि कौशल्याच्या बळावर सिंधू दुसर्‍यांदा, तर सायना चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी धडपडत आहे.
 
 
भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालने तर कमालच केली. एकीकडे भारतीय महिला हॉकी संघाला तब्बल 36 वर्षांनंतर 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळाली. मात्र कर्णधार राणी रामपालने आपल्या संघाचे मनोबल सांभाळत भारतीय संघाला सलग दुसर्‍यांदा ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळवून दिली. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळेच ती यंदाच्या जागतिक क्रीडा पुरस्काराची मानकरी ठरली. शिवाय तिला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचाही पुरस्कार मिळाला. अलीकडेच पी.व्ही. सिंधू आणि राणी रामपालला टाईम्सचाही पुरस्कार मिळाला. क्रीडा क्षेत्रातील या तमाम रणरागिणींना मानाचा मुजरा...