निर्भयाची आई, ‘तारीख पे तारीख’, होऊद्या!

    दिनांक :08-Mar-2020
|
डॉ. रंजन दारव्हेकर
 
 
आई, तुम्ही कशाला अश्रू घालवता? जगातले कुठलेही कोर्ट त्या चौघांना वाचवू शकणार नाही... ‘तारीख पर तारीख’, हा शब्द काही नवा नाही. तो विनोदानं, तिरस्कारानं, उपहासानं, टपोरीपणानं वाचायची आणि अनुभवायची सवय झाली आहे सार्‍या जगाला! ...पण प्रत्येक तारीख आली की त्या चार चेहर्‍यांवर कसं भय असतं. त्यांच्या पोटात कसा गोळा उठतो? एक नाही, दोन नाही तर पंधरा दिवस... म्हणजे पुढच्या तारखेपर्यंत आणि जसजसा क्षण जवळ येतो तसा तसा तो घट्ट होत जातो. अश्रू त्यांचे गळून डोळ्यांची विहीर कोरडी झाली आहे. तरी ते रडतात. आई, ते अश्रू नसतात रक्त हो ते! निर्भयाचं रक्त सांडलं त्यापेक्षा जास्त त्यांचं रक्त आटत, गोठत आहे. 
 
fashi _1  H x W
 
 
...आई तुमचा पोटचा गोळा गेला. नव्हे भारत मातेच्या पोटचा गोळा... त्या नालायकांनी गोळामोळा करून तो फेकला! त्यांना फाशी झाली की की विषय संपला. महिन्याभरात सर्व विसरून जातील; पण आज तुम्हाला जेवढा त्रास होतोय तसा त्रास भारतीय सर्व जातीच्या महिलेला होतोय! पुढच्या तारखेला त्यांच्यातली एखादी व्यक्ती भीतीने मरू शकते आणि पुढची तारीख येईल तेव्हा तिघं उरतील... उरु दे! पण, त्यासाठी तुम्ही अश्रू गाळू नका हो! तुम्ही लढलात सात वर्ष... वासनांध तारुण्यांत त्यांनी क्रूर असा गुन्हा केला. तुम्ही हिमतीनं लढलात, स्वत:च्या लेकीलाच नव्हे तर या देशांतल्या तमाम लेकींना न्याय मिळवून देण्यासाठी. जिवंतपणी ती जनावरं मेलेलीच आहेत. निदान त्यांच्या वकिलांची पोटं भरू द्या. जेवढी भिक ते वकील राष्ट्रपतींकडे मागत आहेत मागू द्या. तुम्ही तो आनंद घ्या... पण, त्या चौघांना मरेपर्यंत फाशी झालीच पाहिजे ही न्याय्य मागणी सोडू नका. लोक धमकी देतील, कुणी वशिला लावतील, कुणी अनेक संतांची उदाहरणे देतील... तुम्ही डगमगू नका! निर्भया गेली नाहीच. त्या चौघांच्या चेहर्‍यावर जे भय दिसतं, त्या भयातच निर्भया आहे; पण आता उरले आहेत अंतिम संस्कार... आपलं न्यायालय शेवटच्या सेकंदापर्यंतच नाही, तर शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना वेळ देईल. कारण सेकंदही मोठा असतो क्षणापेक्षा. आई, तुम्ही फक्त त्या क्षणाची वाट पहा. तुमचे युद्ध आहे त्या क्षणाशी..!
 
 
फाशी झाली की तुमच्या सोबत कोट्यवधी लोकांच्या डोळ्यातून अश्रू निघतील. हैदराबाद झालं लोक विसरले. कसाबलापण विसरले. पण... निर्भयाला कोणी विसरू शकत नाही! कारण, तारीख पे तारीख... तारीख पे तारीख होऊ द्या..!